जनजागृतीसाठी संविधान मंदिर प्रेरणादायी - उपराष्ट्रपती धनकड

Story by  आवाज़ मराठी | Published by  Pradnya Shinde • 2 d ago
उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांनी एल्फिन्स्टन तांत्रिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात रविवारी संविधान मंदिराचे उद्घाटन केले. या वेळी उपराष्ट्रपतींच्या पत्नी सुदेश धनकड, राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आदी उपस्थित होते.
उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांनी एल्फिन्स्टन तांत्रिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात रविवारी संविधान मंदिराचे उद्घाटन केले. या वेळी उपराष्ट्रपतींच्या पत्नी सुदेश धनकड, राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आदी उपस्थित होते.

 

"भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असून, भारतीय राज्यघटना ही सर्वार्थाने वैशिष्ट्यपूर्ण आहे. भारतीय राज्यघटनेबाबत नवीन पिढीत जागृतीसाठी संविधान मंदिर नक्कीच प्रेरणादायी ठरेल," असे प्रतिपादन उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांनी केले. एल्फिन्स्टन तांत्रिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे कौशल्य विकास विभागांतर्गत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयांतर्गत ४३४ औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये संविधान मंदिर लोकार्पण सोहळा झाला. 

यावेळी उपराष्ट्रपती यांच्या पत्नी डॉ. सुदेश धनकड, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन, कौशल्य विकासमंत्री मंगलप्रभात लोढा, कौशल्य विकास विभागाचे सचिव गणेश पाटील, विकास आयुक्त प्रदीपकुमार डांगे, कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक सतीश सूर्यवंशी उपस्थित होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर येथून दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे उपस्थित होते. उपराष्ट्रपती जगदीप धनकड म्हणाले, "भारतीय संस्कृतीचे सार आपल्या संविधानात सामावले आहे. राज्यघटनेचा गाभा आपण समजून घेणे गरजेचे आहे. या संविधानाचे महत्त्व नव्या पिढीला समजावे, यासाठी असे उपक्रम खूप गरजेचे आहेत."

बेरोजगारी कमी होईल !
राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन म्हणाले, "आपल्या राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे १९०४ ते १९०७ या काळात जेथे शिक्षण झाले त्या ठिकाणी आपण उभे आहोत, याचा अभिमान वाटतो. एल्फिन्स्टन टेक्निकल हायस्कूल ही पहिली शाळा आहे, ज्या शाळेने देशातील आजच्या कौशल्य विकास विभागाचा पाया घातला. अनेक नावीन्यपूर्ण योजना कौशल्य विकास विभागाने सुरू केल्या आहेत, त्यामुळे बेरोजगारी कमी होण्यास मदत होत आहे."