'BSNL’चा पुन्हा वाढू लागला ‘संचार’

Story by  आवाज़ मराठी | Published by  Pradnya Shinde • 1 Months ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

जिओ, वोडाफोन-आयडिया आणि एअरटेल या खासगी कंपन्यांनी आपल्या रिचार्ज प्लॅनच्या दरात मोठी वाढ केली. त्याचा परिणाम ग्राहकांच्या खिशावर झाला आहे. मात्र, या दरवाढीचा फायदा सरकारी टेलिकॉम कंपनी असलेल्या ‘बीएसएनएल’ला होत आहे. मागील २० दिवसांत तब्बल २५ हजार ग्राहकांनी खासगी कंपनीच्या सेवेतून बीएसएनएलमध्ये (भारत संचार निगम लिमिटेड) सिम पोर्ट केले आहे. वाढत्या ग्राहकांच्या प्रतिसादामुळे बीएसएनएलला पुन्हा अच्छे दिन आले आहेत.

जून महिन्यात खासगी कंपन्या जिओ, एअरटेल आणि वोडाफोन- आयडिया यांनी अचानक आपल्या रिचार्ज प्लॅनची रक्कम वाढवली. त्याचा थेट फायदा आता बीएसएनएलला मिळत आहे. मागील काही वर्षांपासून या खासगी कंपन्यांनी रिचार्ज दर कमी करून दर्जेदार सेवा ग्राहकांना दिल्या होत्या. त्यामुळे बीएसएनएल कंपनीचे अनेक ग्राहक कमी झाले होते. मात्र २८ जूनला सर्व खासगी कंपन्यांनी रिचार्ज प्लॅनचे दर २५ ते ३५ टक्क्यांपर्यंत वाढविल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसत आहे. त्यामुळे ग्राहकांनी पुन्हा बीएसएनएलला पसंती दर्शवण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्यातील दररोज साधारणपणे तीनशे ते चारशे ग्राहक बीएसएनएलला जोडले जात आहेत.

नेटवर्क सुधारण्यावर भर
ग्राहकांना बीएसएनएलची दर्जेदार सेवा देण्यासाठी जिल्ह्यात ४५० हून अधिक टॉवर्स आहेत. तसेच ग्रामीण भागात नव्याने १७ टॉवर्स उभारण्याचे काम सुरू आहे. शहरातील सर्वच टॉवर्सद्वारे उच्च फोर-जी सेवा देण्यात येत आहे. ग्रामीण भागातील काही तालुके, दुर्गम भागात मात्र अद्याप फोर-जी सेवा पोचलेली नाही. येत्या तीन ते चार महिन्यांत जिल्‍हाभरात फोर-जी सेवा ग्राहकांना देण्याची बीएसएनएलची योजना आहे.

टाटासोबत पुढील वर्षात ५ -जी सेवा
बीएसएनएलचे मार्केटिंग विभागाचे जनरल मॅनेजर कोळपकर म्हणाले, टाटा सन्सचे युनिट तेजस नेटवर्क्स बीएसएनएलसाठी देशातच नेटवर्क उपकरणे बनवणार आहे. फोर-जी सेवा सुरू केल्यानंतर, बीएसएनएल वर्षभरात ५-जी सेवा सुरू करण्याच्या तयारीत आहे. बीएसएनएलची फोर जी सेवा सर्वत्र सुरळीत झाल्यानंतर ५-जी सेवा लगेच सुरू केली जाईल. सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ टेलीमॅटिक्सने यासाठी टीसीएससोबत करार केला आहे, ज्यामध्ये रेडिओ उपकरणे आणि फोर-जी कोर उपकरणे बनवली जातील.

"गेल्या महिनाभरात बीएसएनएलच्या ग्राहकसंख्येत मोठी वाढ झाली आहे. दर्जेदार सेवा तसेच फोर-जी कनेक्टिव्हिटी वाढविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. शहरातील बहुतांश भागात फोरजी सेवा सुरू करण्यात आली आहे. लवकरच ५ जी सेवादेखील बीएसएनएल सुरू करणार आहे. ग्राहक वाढले म्हणून बीएसएनएल दरवाढ करणार नाही."
— राजेंद्र कोळपकर, जनरल मॅनेजर, मार्केटिंग विभाग, बीएसएनएल
 
 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter