वक्फ संसदीय समितीच्या बैठकीत पुन्हा खडाजंगी

Story by  आवाज़ मराठी | Published by  Pradnya Shinde • 2 Months ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

वक्फ दुरुस्ती विधेयकाच्या छाननीसाठी नेमलेल्या संयुक्त संसदीय समितीमध्ये (जेपीसी) सत्ताधारी 'एनडीए' आणि विरोधातील 'इंडिया' आघाडीच्या खासदारांची खडाजंगी आजच्याही बैठकीत दिसून आली. बैठकीमध्ये कर्नाटक सरकार आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याविषयीच्या कथित वादग्रस्त टिपणीला विरोधक खासदारांनी जोरदार आक्षेप घेतला. तसेच मुस्लिमांशी संबंधित वक्फ विधेयकावर मतप्रदर्शनासाठी 'जेपीसी'ने हिंदू जनजागृती समिती व सनातन संस्थेला बोलावल्यावरून 'इंडिया' आघाडीच्या खासदारांनी तीव्र नाराजी दर्शवून समितीच्या कामकाजावर बहिष्कार टाकला.

भाजपचे खासदार जगदंबिका पाल यांच्या अध्यक्षतेखालील 'जेपीसी'ची आज बैठक झाली. आज झालेल्या बैठकीमध्ये वक्फ विधेयकावर चर्चा करण्यासाठी कर्नाटकच्या अल्पसंख्याक आयोगाचे माजी अध्यक्ष अन्वर मणिप्पाडी, हिंदू जनजागृती समिती तसेच सनातन संस्थेलाही बोलावण्यात आले होते. 

बैठकीत मणिप्पाडो यांनी केलेल्या सादरीकरणावरून गोंधळ झाला. मणिप्पाडी यांनी कर्नाटकातील वक्फ मालमत्तांशी संबंधित गैरव्यवहार प्रकरणात मल्लिकार्जुन खर्गे तसेच रहेमान खान आणि अन्य नेत्यांची नावे घेतली. मणिप्पाडी यांनी खर्गे यांच्यावर अनावश्यक टिपणी केल्याचा आरोप करत काँग्रेसचे गौरव गोगोई, द्रमुकचे ए राजा, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अक्षाचे अरविंद सावंत, 'एमआयएम'चे असदुद्दीन ओवेसी यांच्यासह अन्य विरोधी पक्षांच्या खासदारांनी सभात्याग केला. या बैठकीनंतर खासदार सावंत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना समितीचे कामकाज नियमबाह्य पद्धतीने सुरू असल्याची नाराजी व्यक्त केली. चर्वेसाठी हिंदू जनजागृती समिती आणि सनातन संस्थेला बोलावण्यावरूनही विरोधी खासदारांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटली आहे.

हिंदुत्ववादी संस्थांना का बोलावले ?
• मुस्लिमांशी संबंधित कायद्याबाबत चर्चेसाठी हिंदुत्ववादी संस्थांच्या सदस्यांना का बोलावले जात आहे, असा सवाल विरोधी खासदारांचा होता. खासदार ओवेसी यांनी यावर आक्षेप घेणारे पत्र जगदंबिका पाल यांना दिले.