राज्यात आता भाजपचा मुख्यमंत्री होणार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आज महायुतीच्या सत्ता वाटपाचा फॉर्म्युला निश्चित करण्यात आला. यात भाजपच्या वाट्याला सर्वाधिक २० ते २२ मंत्रिपदे येणार असून शिवसेनेच्या १२ जणांना संधी मिळेल. राष्ट्रवादी काँग्रेसच्या ९ ते १० जणांची मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता आहे.
भाजपसह तिन्ही पक्षांनी नव्या मंत्रिमंडळात तरुण आमदारांना संधी द्यावी असा सल्ला भाजप श्रेष्ठींकडून देण्यात आला. येत्या दोन डिसेंबर रोजी नव्या मंत्रिमंडळाचा वानखेडे स्टेडियमवर शपथविधी पार पडेल अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
या मंत्रिमंडळामध्ये गृहखाते हे फडणवीस यांच्याकडे तर अर्थ खाते हे अजित पवार यांच्याकडे राहू शकते. राज्यात विधानसभा निवडणुकीचा निकाल लागूनही अद्याप नव्या मंत्रिमंडळाचे गठण झालेले नाही. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली.
यावेळी प्रामुख्याने मंत्रिमंडळातील तिन्ही पक्षांच्या खाते वाटपाचा मुख्य मुद्दा चर्चेच्या केंद्रस्थानी होता. महाराष्ट्रातील मंत्रिमंडळात जास्तीत जास्त ४३ जणांना संधी मिळू शकते. यात भाजपला सर्वाधिक मंत्रिपदे मिळतील अशी आशा आहे. याबद्दल दोन्ही पक्षांनी सहमती दर्शविली आहे.
एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात सर्वाधिक आमदार असतानासुद्धा भाजपच्या वाट्याला केवळ १० मंत्रिपदे आली होती. यामुळे भाजपच्या आमदारांमध्ये अन्याय झाल्याची भावना होती. ही नाराजी यावेळी भाजपच्या आमदारांमध्ये राहणार नाही याची काळजी वरिष्ठ नेत्यांकडून घेण्यात येईल. यामुळे भाजपच्या वाट्याला २० ते २२ मंत्रिपदे येतील असे बोलले जाते.
श्रीकांत शिंदे उपमुख्यमंत्री होणार?
महायुतीतील अन्य दोन घटक पक्षांपेक्षा शिवसेनेतील तिढा अधिक जटिल असल्याचे मानले जाते. शिंदे यांचे मुख्यमंत्रिपद गेल्यानंतर ते लगेच उपमुख्यमंत्री होणार काय? हा प्रश्न चर्चेत आला आहे. शिंदे लगेच उपमुख्यमंत्रिपद स्वीकारण्यास फारसे उत्सुक नसल्याचे सांगण्यात आले. यामुळे त्यांच्याजागी कोण? हा प्रश्न कायम आहे. यात डॉ. श्रीकांत शिंदे यांना उपमुख्यमंत्रिपद किंवा गृहमंत्रिपद मिळावे अशी मागणी शिंदे यांच्याकडून झाल्याचे समजते.
डॉ. शिंदे यांना उपमुख्यमंत्रिपद देण्यास भाजप व अजित पवारही फारसे उत्सुक नाहीत. शिवसेनेतील १२ आमदारांना मंत्रिपदे देण्यास भाजपची संमती आहे. परंतु उपमुख्यमंत्रिपदाबाबत मात्र अद्यापही स्पष्टता झालेली नाही.उपमुख्यमंत्रिपदासाठी अजित पवार यांचे नाव निश्चित असल्याचे मानले जाते. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर अजित पवार यांचे भाजपशी चांगलेच सूर जुळले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला ९ ते १० खाती येण्याची शक्यता आहे.
तर ज्येष्ठांना संधी नाही
भाजपच्या श्रेष्ठींनी महायुतीतील घटक पक्षांच्या तिन्ही नेत्यांना तरुणांना सर्वाधिक संधी द्या असा सल्ला दिला आहे. त्यामुळे ७५ वर्षांपेक्षा अधिक वय झालेल्या नेत्यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता कमी होत आहे. केंद्रीय मंत्रिमंडळातही हाच फॉर्म्युला निश्चित केला होता. तरुणांना अधिक संधी द्यावी अशी भावना भाजपने व्यक्त केली. हा फॉर्म्युला निश्चित झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक ज्येष्ठ नेत्यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता नाही.
शिंदे यांनी दावा सोडलेला नाही - सामंत
मुंबई - राज्याच्या मुख्यमंत्रिपदाचे गूढ कायम असताना एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाचा दावा सोडलेला आहे असे म्हणता येणार नाही असे विधान आज शिवसेनेचे नेते उदय सामंत यांनी केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. शिंदे यांनी केवळ निर्णयाचे अधिकार पंतप्रधान मोदींना दिले असल्याचे सामंत यांनी म्हटले आहे.
‘महायुतीला २०१९ मध्येही चांगले बहुमत मिळाले होते. सत्तेसाठी ३५ दिवस आम्ही फिरत राहिलो तेव्हा युती तुटली. संवेदनशील मनाचे आणि बाळासाहेबांचे विचार पुढे नेणारे एकनाथ शिंदे यांनी युती कायम टिकावी यासाठी पाऊल उचलले. आम्ही त्यांच्यासोबत काम करतो, याचा आम्हाला गर्व आहे. जनतेची काहीही इच्छा असली तरी अंतिम निर्णय हा मोदी घेतील असे शिंदे बोलले आहेत. यामुळे विरोधकांची कोल्हेकुई थांबली आहे.
विरोधी पक्षनेताही बनवू न शकणाऱ्यांनी आता शिंदे यांच्यावर बोलू नये. महाविकास आघाडीचे काही आमदार शिंदे यांच्या संपर्कात आहेत हे मी ठामपणे सांगतो. भविष्यात खासदारही संपर्कात येतील,’ असे मंत्री सामंत यांनी सांगितले. सरकार स्थापन होईपर्यंत काही गोष्टी गोपनीय ठेवल्या पाहिजेत त्या आपण ठेवू यात असेही त्यांनी सांगितले.
एका बाजूला उदय सामंत यांनी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदावरील दावा अद्याप सोडला नसल्याचे विधान केले असतानाच शिरसाट यांनी शिंदे उपमुख्यमंत्रिपद स्वीकारणार नसल्याचे वाटते असे म्हटले आहे. केंद्रात कॅबिनेट मंत्रिपद घेऊन ते सरकारमध्येच राहतील असा अंदाज शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी व्यक्त केला आहे.