महाराष्ट्राची लोकसंस्कृती विविधतेने बहरलेली आहे. यात लोककला, नृत्य आणि संगीताचा समावेश आहे. महाराष्ट्राला लोकसंगीताचा मोठा इतिहास आहे. याच लोकसंगीताचे गौरवशाली पान म्हणजे पोवाडा. अस म्हटलं जातं महात्मा फुले यांनी शिवरायांच्या समाधीचा शोध लावल्यानंतर शिवरायांवरती पोवाडा लिहाला.
महाराष्ट्राच्या मातीतील शाहिरीची आणि पोवाड्याची पोवाड्याची परंपरा जपण्यात आणि लोककलेला प्रोत्साहन देण्यात छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते आजतागायत असंख्य लोकांनी योगदान दिलं आहे. आजवर महाराजांवरती अनेक पोवाडे लिहले गेले. त्यातीलच एक पोवाडा म्हणजे समाजवादी शिवराय. हा पोवाडा लिहाला तो संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील प्रमुख कार्यकर्ते शाहीर अमर शेख यांनी.
शाहीर अमर शेख यांनी उभ्या केलेल्या सुहृदयी लोककल्याणकारी समाजवादी शिवरायांविषयी आपण या लेखातून जाणून घेणार आहोत.
सूर्य नव्हता शिवबा जन्मले । विश्व आनंदले ।
गाउं लागले । चराचर होऊन् शिवबाचे भाट ॥
आग्ळा होता त्याच्या गाण्याचा घाट ।
काढलि शाहिरानं त्यातुनच वाट ॥
अमर शाहीर शिवबाचा भाट ।
ही दर्जेदार रचना आहे शाहीर अमर शेख यांची. शाहीर अमर शेख यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचे नेतृत्व केलं. आपल्या पहाडी आवाजातून आणि तडाखेबंद शाहिरीतुन त्यांनी महाराष्ट्र धर्माची ज्योत जागवली.
स्वातंत्र्य चळवळीतील आद्य क्रांतिकारक म्हणून शाहीर अमर शेख यांचं नाव घेतलं जातं. आपल्या दर्जेदार रचनांनी शाहीरांनी समाजमन ढवळून काढलं होतं. त्यांच्या अनेक रचना गाजल्या आहेत. या रचनांपैकी एक रचना होती ती ‘समाजवादी शिवराय’ या पोवाड्याची. हा पोवाडा शाहीरांनी छत्रपती महाराजांच्या जीवनावर लिहाला आहे.
शाहीर अमर शेख यांनी या पोवाड्यात छत्रपती शिवाजी महाराज कसे राजे होते याचं वर्णन केलं आहे.
१८ पगड जातींना सोबत घेत हिंदवी स्वराज्य निर्माण करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती अवघ्या काही दिवसांवर आली आहे. दरवर्षी १९ फेब्रुवारीला देशभर महाराजांचा जयंती साजरी केला जातो.
डॉ. अजीफ नदाफ यांनी शाहीर अमर शेख यांच्या पोवाडे, लोकगीतं आणि कवितांचं संकलन केलं आहे. त्यांनी काही काळ अमर शेख यांच्यासोबत काम देखील केलं आहे.
शिवाजी महाराजांचं वर्णन समाजवादी शिवछत्रपती असं का केलं आहे असं विचारल्यावर ते म्हणतात, “शाहिरी परंपरेप्रमाणे शिवाजी महाराजांच्या पोवाड्यातून अमर शेखांनी त्यांचं चरित्र सांगितलंच आहे. त्याच बरोबर त्यांच्या कार्यपद्धतीचे बारकावे आणि तत्कालीन समाजजीवनावर त्यांचा काय प्रभाव होता हे देखील मांडलं आहे. संपूर्ण समाजासाठी समान न्याय देणारा हा राजा होता म्हणून या पोवाड्याच नाव शाहिर अमर शेखांनी समाजवादी शिवछत्रपती असं केलं आहे.”
पोवाड्यातील काही रचना आणि त्यांचा अर्थ
शाहीर अमर शेख यांनी शिवाजी महाराज यांची स्तुती करताना लिहतात.
शिवबा सरजा राजा होतो, भुमिहीना प्रेम कवळितो, त्यांना
जमिन मिळवुनी देतो, मिळवून बियाणं देतो, भू लागवडीला आणितो
याचा अर्थ शिवाजी महाराज हे केवळ राजे नव्हते, तर भूमिहीनांवर प्रेम असलेले, त्यांना त्यांचा हक्क देणारे बी-बियाणं मिळवून देऊन शेतकऱ्यांची जमीन फुलवून देणारे प्रजाहितदक्ष राजे होते.
पेरावं तेच पीक येतं । जगाची रीत ।
नवं न्हाई त्यात । शहाजीनं पराक्रम पेरला ॥
शिवाजी सरजा अवतरला । मराठयाचा भाग्योदय झाला जी जी जी ॥
या काव्यरचनेचा अर्थ सांगताना शाहीरविशारद डॉ.आझाद नायकवडी म्हणतात, "पेरावं तेच पीक येतं म्हणजे पेरावे तेच उगवते ही जागाची रीत आहे. त्यात काहीही नवीन नाही. शहाजीराजे आणि जिजाऊंनी शिवाजी महाराजांच्या रूपाने पराक्रम पेरला आहे. या दोघांनी महाराजांना स्वराज्याचे तोरण बांधण्यासाठी तयार केलं. त्यांच्यामुळे हिंदवी स्वराज्य उभा राहील. शहाजीराजे आणि जिजामाता यांच्या संस्कारामुळे शिवरायांनी स्वराज्य घडवलय. शिवाजी महाराजांच्या जन्मामुळे मराठ्यांचा भाग्योदय झाला आहे."
आजही हवा मज असाच शिवबा माझा ।
तो समाजवादी महाराष्ट्राचा राजा ।
तो राजा कसला लोकशाहीचा कलिजा ।
तो असुनि राजा पर समाजवादी सरजा ।
मुजरा माझा त्या महान संस्कृतिबुरुजा ।
भागवीत होता आधी जनतेच्या गरजा ।
नफ्यासाठी धडपडे त्यास म्हणे तू मर जा।
ठावं न्हवता विसावा फक्त ठावं होती प्रजा ।
सारी हयात घोडयावर गेली।
काया झिजवली ।
प्रजा सुखी केली।
कीर्ती पसरली ।
अशी फुलवेली।
पुनः उगवली नाही बघा राजे ॥
या काव्यरचनेचा अर्थ सांगताना ते म्हणतात, "शाहीर अमर शेख यांनी या काव्यात शिवाजी महाराजांची समाजवादी भूमिका दर्शवण्याचा प्रयत्न केला आहे. जाती धर्माच्या सर्व भिंती सोडून शिवरायांनी समाजवाद जपला असं ते संगतात. भागवीत होता आधी जनतेच्या गरजा म्हणजे शाहीर म्हणतात, शिवरायांनी प्रजेलाच आपलं मानलं होतं. प्रजेच्या हितासाठी महाराजांनी 'रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावता कामा नये' असं फर्मान मावळ्यांना दिलं होतं. रयतेच्या सुखात महाराजांनी स्वतःच सुख मानलं होतं."
पुढे शाहरांनी सांगितले, "रयतेसाठी शिवाजी महाराजांनी सर्वांना सोबत घेऊन स्वराज्य निर्माण केलं. महाराजांनी प्रजेच्या सुखासाठी हयात घालवली आहे. प्रजा सुखी केली."
वीरांच्या पराक्रमांचं , सामर्थ्याचं , गुण कौशल्यांचं काव्यात्मक वर्णन म्हणजे पोवाडा. ‘पोवाडा’ महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचा लोकगीतांचा अविभाज्य भाग आहे. पोवाडा छत्रपती शिवाजी महाराजांच्या वीरतेची आणि शौर्याची गाथा सांगण्याचे माध्यम बनला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा लढा हा परिवर्तनासाठी होता. प्रजेला सन्मानाने जगता यावे यासाठी त्यांनी स्वराज्य निर्माण केले. महाराजांनी 18 पगड जातींना सोबत घेऊन सामाजिक आणि धार्मिक एकतेचा संदेश दिला आहे. ‘समाजवादी शिवराय’ पोवाड्याच्या माध्यमातून शाहीर अमर शेख यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची छवी ठळकपणे सर्वांपर्यंत पोहचवली. या पोवाड्यात त्यांनी पराक्रम, संघर्ष, आणि स्वराज्य स्थापनेच्या संकल्पना मांडल्या आहेत. शिवाजी महाराजांचा समाजवादी दृष्टिकोण येणाऱ्या कित्तेक पिढ्यांसाठी अनुकरणीय आहे.
- फजल पठाण