सर्वात आधी समजून घेऊ, रायटिंग ऑन द वॉल म्हणजे (Writing on the wall) काय? याचा शब्दशः अर्थ म्हणजे काय बदलत आहे आणि काय नाही, लोकांना काय हवे, काय नको हे जाणून घेण्यासाठी भिंतींकडे पाहणे. भिंती आपल्याला सांगतात म्हणजेच त्यावरील जाहिराती किंवा जाहिरात विरहित तर क्वचित भग्न भिंती या आपल्याला त्या राज्याच्या अर्थव्यवस्थेबद्दल आणि महत्त्वाच्या बदलांबद्दल लगेचच कल्पना देतात. विशेषतः काश्मीरमध्ये काही चांगले बदल पाहायला मिळतील. यापैकी एक गोष्ट तुम्ही थेट या भिंतीवर पाहू शकता. इतर दोन गोष्टी पाहण्यासाठी तुम्हाला खोलात जावे लागेल.
बदलती तरुणाई
पहिली गोष्ट म्हणजे काश्मीरमध्ये मोठ्या संख्येने असलेला तरुणवर्ग. या तरुण वर्गाने आपल्या डोक्यातून किमान सध्या काही काळासाठी तरी कट्टरतावाद, फुटीरतावाद, राग आणि द्वेषाचे राजकारण बाजूला ठेवले आहे. पण हे सगळे संपलेले आहे, असे मानणे चुकीचे ठरेल. हे सर्व अजूनही आहे आणि जेव्हा या तरुणांना कोणाबद्दल विश्वास वाटतो, तेव्हा त्यांच्याशी या सर्व गोष्टींबद्दल मोकळेपणाने बोलतात. सध्या त्यांचे प्राधान्य शिक्षण, स्पर्धा, नोकरी आणि करिअर यालाच आहे.
दुसरी गोष्ट म्हणजे पाकिस्तान. पाकिस्तानमधील राजकीय संघर्ष आर्थिक पतन या काही प्रमुख मुद्द्यांबद्दल बोलता येईल. आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानचे घटते सामर्थ्य आणि भारताच्या सामर्थ्यातील वाढ या एकाच वेळी घडलेल्या घटनांत याचे मूळ दिसून येते. आणि तिसरी गोष्ट, सुरक्षा यंत्रणांना सामरिक पातळीवर आणि तळागाळापर्यंत शस्त्रांपासून लोकांना दूर ठेवण्यात यश मिळाले आहे. प्रत्येकाला हे माहीत आहे की, काश्मीर खोऱ्यात मोठ्या प्रमाणावर शस्त्रे उपलब्ध आहेत आणि ते वापरण्यासाठी प्रशिक्षित आणि प्रवृत्त झालेलेही बरेच जण आहेत. पण तो मार्ग बंद झालेला आहे. आता लोकांना शस्त्रे मिळणे आणि शस्त्रांना हाताळणारे मिळणे दोन्हीही बंद झाले आहे.
भारताच्या बहुतांश भागात विशेषतः उत्तरेकडील राज्यांमध्ये तेथील भिंतींवर विविध कोचिंग क्लासेसचे मोठमोठे फलक पाहायला मिळतात. पण हे फलक काश्मीरमध्ये जितक्या ठळकपणे दिसतात, तितके देशात इतरत्र कुठेही दिसत नाहीत. विविध क्लासेसच्या जाहिराती येथील खांबांवर, झाडांवर, भिंतींवर चिकटवलेल्या अथवा अडकवलेल्या पाहायला मिळतात.
प्रत्येकाला यूपीएससी, ‘नीट’, जेईई अशा परीक्षांमध्ये यश मिळवायचे आहे, देशभरातील तरुण जे करतात, ते करायचे आहे. यापैकी अनेक फलकांवर यशस्वी विद्यार्थ्यांचे फोटो लावलेले आहे. ही काश्मीरची दगडफेक करणाऱ्यांनंतरची पिढी आहे. हे काश्मीर खोऱ्याचे नवे भविष्यही आहे. जर तुम्ही अजून काश्मीर म्हणजे फुटीरतावादी, अतिरेक्यांसोबतचे संघर्ष अशाच गोष्टींमध्ये रमत असाल, तर तुमच्या विचारांची दिशा चुकत आहे. जर इतकी हजारो मुले - मुली या शैक्षणिक स्पर्धेत उतरू पाहत आहेत आणि उर्वरित देशातील करिअर शोधू इच्छित असतील, तर हा खूप मोठा बदल आहे.
काहीही गृहित धरू नका
या भिंती आपल्याला काय बदललेले नाही आणि कोणत्या प्रकारचा तणाव अद्याप आहे, याचीही साक्ष देतात. काश्मीरमधील सामार्थ्यवान लोक ज्या भागात राहतात, त्या गुपकार रस्त्यावर एकदा चालून पाहा. प्रत्येक घर म्हणजे एक किल्ला आहे. या घरांना १८ फुटांहून अधिक उंचीच्या काँक्रिटच्या भिंती आहेत. या भिंतींच्या वर मजबूत पत्रे ठोकलेले आहेत, त्यावर तारेचे कुंपण घातलेले आहे. या गोष्टीत आता लगेच काही बदल होईल, असे वाटत नाही. याबद्दल मला फारुख अब्दुल्ला यांनी जवळपास दोन तास एका झाडाखाली बसून मार्गदर्शन केले.
गोष्टी बऱ्यापैकी सुधारल्या आहेत, ते म्हणाले, ‘‘आता हिंसा होत नाही, पण याचा अर्थ असा नाही की येथील तरुणांमध्ये राग नाही. त्यांना दिल्ली खुनशी वाटते. अनेक जणांना तुरुंगात डांबले आहे. दूरच्या राज्यातील कारागृहांमध्ये कैद केले आहे. मी शांतपणे त्यांचे बोलणे, ऐकत होतो, समजून घेत होतो, त्याचा अर्थ लावत होतो. शांतता आहे, ठीक आहे. पण त्या शांततेचा फायदा काय होत आहे? गोष्टी सुधारल्या आहेत, लोक शांततेचे कौतुक करत आहेत आणि पाकिस्तानबद्दलचे भ्रमही आता नष्ट झाले आहेत. पण तरीही काहीही गृहित धरू नका.
आणखी एक कॉम्रेड
काश्मीरमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची विचारधाराही असेल, असा विचारही तुम्ही केला नसेल त्या विचारधारेचे काश्मीरमधील एक ज्येष्ठ नेते म्हणजे महम्मद युसूफ तरिगामी. तेही एक रंजक जीवनचरित्र लिहू शकतात. त्यांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला काश्मीरमध्ये अनेक वर्षांपासून जिवंत ठेवले आहे. त्यांनी राज्यात पक्षाला विजयही मिळवून दिला आहे. १९६७ मध्ये जेव्हा सहा दिवसांच्या युद्धामुळे पॅलेस्टाईन जळत होते, तेव्हा त्या विरोधातील निषेधामध्ये सहभागी झाल्यामुळे त्यांना पहिल्यांदाच डाव्या चळवळीतील कार्यकर्ता म्हणून ओळखले गेले. अनेकदा त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला होता. त्यांनी काश्मीरमधील सुधारणांचे कौतुक केले आणि कायद्याबद्दल आदर असणे महत्त्वाचे आहे, हे अधोरेखित केले.
भारतातील सर्वात अवघड काम
भारतातील सर्वात अवघड काम काय आहे? सर्वात आव्हानात्मक, धोकादायक ? थोडक्यात उत्तर म्हणजे जम्मू आणि काश्मीरचे राज्यपाल (आताचे नायब राज्यपाल)असणे. येथील विद्यमान नायब राज्यपाल मनोज सिन्हा, पूर्व उत्तर प्रदेशातील गाझीपूरचे धोतर घातलेले राजकारणी आणि बुद्धिमान नेते आहेत. निवडून आलेले विधानसभा नसलेल्या केंद्रशासित प्रदेशाचे मुख्य प्रशासक म्हणून, ते कदाचित देशातील सर्वात शक्तिशाली अधिकारी आहेत. गोष्टी सुधारण्यासाठी त्यांनी केलेल्या कृतींबद्दल ते सांगतात. आघाडीच्या फुटीरतावादी नेत्यांच्या जवळच्या कुटुंबातील सदस्यांना नोकरी नाकारणे, हरताळ आणि दगडफेक यातून मिळालेल्या मोबदल्यात फुटीरतावाद्यांच्या कुटुंबांना नोकऱ्या आणि करार कशाप्रकारे प्रस्तावित केले जात होते, याचा संदर्भ देत ते म्हणतात, ‘पूर्वी संघर्ष अशा प्रकारे सोडवले गेले. पण ते आता संपले आहे. त्यांचा प्रशासनाने कसून शोध घेतल्यानंतर असे सर्व कर्मचारी शोधून काढले आणि त्यांना काढून टाकण्यासाठी घटनेच्या कलम ३११ चा वापर केला.’
देशाच्या इतर भागांप्रमाणे ‘सामान्य’
पुरावा पुन्हा भिंतीवरून दिसून येतो तो म्हणजे काश्मीरच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक केंद्रात, श्रीनगरचा लाल चौक. लाल चौकातून झेलम नदीकडे जाणाऱ्या विचित्र मार्गांपैकी एक असलेल्या न्यू मार्केटमध्ये मला ‘ई-टेंडरिंग’ असे चिन्ह असलेले एक दुकान दिसले. आत, मालक, समोर चार कॉम्प्युटर स्क्रीन आणि कीचेनसारखे दिसणारे दोन ढीग, पण प्रत्यक्षात ते डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्रे घेऊन बसले आहेत. हा व्यवसाय लोकांना ई-निविदा भरण्यास मदत करतो आणि त्याच्या ग्राहकांनी शेकडो प्रमाणपत्रे त्याच्याकडे सोपवली आहेत. तो मला सांगतो की, तो पूर्वी कपड्यांचा व्यवसाय करत असे. ते म्हणतात, इथे २०० रुपये प्रति ई-निविदा मिळतात. त्यात कपड्यांपेक्षा अधिक फायदा आहे. जुन्या व्यवसायाचे काय झाले? मी विचारले. त्याच दुकानात आता ई-टेंडरिंगचा व्यवसाय आहे, असे त्याने सांगितले. तो म्हणला, जम्मू-काश्मीरचा अबकारी महसूल फक्त सहा कोटी रुपये होता. आता ते ३६५ कोटी झाले आहे. कसे? कारण त्याने दारूच्या परवान्याचा पर्याय पुढे केला. आता दारूची १४ दुकाने आहेत आणि त्याला आणखी दुकाने हवी आहेत. देशाच्या इतर भागांप्रमाणेच ते ‘सामान्य’ ठिकाण असावे.
खोऱ्यात ७७ वर्षांचा रक्तपात
मी बातमीदारीच्या नियमांपैकी एक अत्यंत बदनाम गोष्ट वापरत आणि माझ्या ड्रायव्हरला विचारले की, खोऱ्यात इतके नवीन बांधकाम, इतकी समृद्धी कशी आली? आता ही छान घरे बांधणाऱ्या सर्वांनी, ‘दोन्ही बाजूंनी’ पैसे कमावले आहेत. खरे तर त्यात काय चूक आहे हे देखील त्याने सांगितले. या दशकांतील सर्वात फायदेशीर व्यवसाय असा आहे ज्याला आपण संघर्ष उद्योजकता म्हणू शकतो. भारत आणि पाकिस्तान, लष्करे, मुत्सद्दी, परंतु सर्वात महत्त्वाचे म्हणजे गुप्तचर संस्था, खोऱ्यात ७७ वर्षे रक्तपात चालला होता. दोघांकडे वितरित करण्यासाठी भरपूर रोकड होती आणि भारताच्या बाजूने राजकारणी, व्यापारी आणि सरकारी अधिकाऱ्यांच्या पिढ्यांनी केंद्राने या समस्येवर फेकत असलेला पैसा अगदी साफ केला आहे. जवळजवळ सर्व काश्मिरी राजकारणी आणि त्यांच्या घराण्यांना या संघर्षाचा फायदा झाला आहे. अब्दुल्लांशिवाय कोणीही आपण भारतीय असल्याचे स्वेच्छेने सांगणारे आढळले नाहीत आणि भारताचा अविभाज्य भाग असल्याशिवाय काश्मीर खोऱ्याचे भविष्य नाही. इतरांना संदिग्धतेत फायदा मिळतो. पण आता त्यात काही बदल होत आहेत.
राजकीय आखाडे
काश्मीरमध्ये नवा राजकीय वर्ग उभा करण्यासाठी मोदी सरकारला पाच वर्षांचा कालावधी लागला, पण त्यात अपयश आले. काश्मीर खोऱ्यातील तीन जागांवर उमेदवारही उभे केलेले नाहीत, इतके मोठे हे अपयश आहे. तुम्ही माझ्यावर अंगावर येत ‘काँग्रेसलाही जमले नाही’ असे म्हणण्यापूर्वी, मी तुम्हाला आठवण करून देतो की त्या पक्षाचा सहयोगी असलेल्या नॅशनल कॉन्फरन्सला काश्मीर खोऱ्यातील तीन जागांचे वाटप करण्यात आले आहे. पंचायती निवडणुका घेण्यात यश मिळाले असते तरच केंद्राने तळागाळातील नवे राजकारण उभे केले असते. पण त्यासाठी अनुसूचित जाती-जमातींना आरक्षण देण्यासाठी कायद्यात दुरुस्ती करावी लागली असती. त्यासाठी संसदेच्या माध्यमातून घटनात्मक बदलाची गरज होती. पाच वर्षांत नवी दिल्लीत कोणालाही ते करायला वेळ मिळाला नाही.नवे पक्ष निर्माण करण्यासाठी आणि प्रस्थापित पक्षांचा मुकाबला करण्यासाठी ते स्थानिक चेहरा शोधत होते.
याचा प्रत्यक्ष पुरावा म्हणून गृहमंत्री अमित शहा काय म्हणतात ते पहा, तुम्हाला हव्या त्या कोणालाही मत द्या, परंतु नॅशनल कॉन्फरन्स (अब्दुल्ला), पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी, मुफ्ती) किंवा काँग्रेसला नाही. याचा अर्थ असा की, प्रचंड यशस्वी उद्योजक, माजी मुफ्ती निष्ठावंत आणि मंत्री अल्ताफ बुखारी यांनी स्थापन केलेल्या अपनी पार्टीला मत द्या. बुखारी हे कृषी विज्ञानाचे पदवीधर आणि पदविका धारक आहेत. काश्मीर खोऱ्यात त्यांचे व्यवसाय आहेत, पण त्यांची बहुतेक संपत्ती इतर ठिकाणाहून येते. अनेक काश्मिरी, वृद्ध आणि तरुण, तुम्हाला सांगतील की त्यांचा पक्ष भाजपचा सहकारी पक्ष आहे. काश्मीर खोऱ्यातील सर्वोच्च मौलवी मीरवाइज मोहम्मद उमर फारुक हे अजूनही कोणत्या ना कोणत्या नजरकैदेत आहेत.
मी त्यांच्याशी फोनवर बोललो आणि ते म्हणाले की, त्यांना भेटायला आवडेल, पण परवानगी मिळणार नाही. कारण त्याचा संवाद जवळच्या नातेवाईकांपुरता मर्यादित आहे. शेख अब्दुल रशीद, ज्यांना मुख्यतः इंजिनिअर रशीद म्हणून ओळखले जाते. ते दहशतवाद्यांना आर्थिक मदत केल्याच्या आरोपाखाली ते पाच वर्षांपासून तुरुंगात आहेत. ते तिहारमध्ये राहून बारामुल्ला मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या मागे मोठा जनसमुदाय पाहायला मिळतो. यावेळी मतदारांचा अभूतपूर्व प्रतिसाद हा १९९६ पासून सर्वत्र सर्वाधिक आहे आणि बारामुल्लामध्ये मिळालेला आतापर्यंतचा सर्वाधिक प्रतिसाद काहीतरी सांगू पाहत आहे. आत्तातरी सर्व काही छान आहे पण म्हणून याचा अर्थ काश्मीर खोऱ्यातील सर्व समस्या संपल्या, अशा निष्कर्षाप्रत येण्याची घाई करू नका. या मतदानाने शांत झालेल्या लोकांना व्यक्त होण्याची संधी दिली आहे. ही ताण कमी करण्याची एक मोठी प्रक्रिया आहे आणि याचे काम अजूनही सुरू आहे.
(अनुवाद : वैष्णवी कारंजकर)
- शेखर गुप्ता