NEET प्रकरणात CBIकडून दोघांना अटक

Story by  आवाज़ मराठी | Published by  Saurabh Chandanshive • 7 d ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

नीट पेपर लीक प्रकरणामध्ये सीबीआयचा तपास सुरु आहे. गुरुवारी तपास संस्थेने आपल्या स्तरावर पहिली अटक केली आहे. CBI ने मनीष प्रकाश आणि आशुतोष कुमार या दोघांना अटक केली आहे. मनीषला चौकशीसाठी बोलावण्यात आलेलं होतं, त्यानंतर त्याला अटक केली.

सीबीआयने अटकेची अधिकृत माहिती मनीषच्या पत्नीला फोनवरुन दिली. दुसरीकडे सीबीआयने पेपर लीक प्रकरणातील दोन आरोपी चिंटू आणि मुकेशला रिमांडमध्ये घेतलं आहे. दोन्ही आरोपींना बेऊर जेलमधून नेत त्यांची वैद्यकीय तपासणी केली.

पेपर लीक प्रकरणात सीबीआयने कसून चौकशी सुरु केली आहे. सीबीआयच्या दोन टीम नालंदा आणि समस्तीपूरमध्ये आहेत. तर एक टीम हजारीबाग येथे पोहोचली आहे. ओएसीस शाळेच्या मुख्याध्यापकांसह आठ लोकांची सीबीआय चौकशी करत आहे.

दरम्यान, नीट प्रकरणानंतर आणखी एका याचिकेवरुन NTA ला सुप्रीम कोर्टाने नोटीस पाठवली आहे. या याचिकेवरही ८ जून रोजी सुनावणी होणार आहे. ही याचिका एका कोचिंग सेंटरने दाखल केली आहे. ज्यावर कोर्टाने आपल्या कोणत्या मुलभूत अधिकारांना धक्का बसला? असा प्रश्न उपस्थित केला. त्यावर याचिकाकर्त्याने, विद्यार्थ्यांनी आमच्या क्लासच्या माध्यमातून अभ्यास केला आहे. त्यामुळे त्यांच्या अधिकारांकडे लक्ष देणं आमचं काम आहे, असं म्हटलं.

NEET-UG प्रकरणातील मुख्य सूत्रधार मानला जाणाऱ्या संजीव कुमार मुखिया हा उत्तर प्रदेश कॉन्स्टेबल भरती परीक्षेसह पाच प्रमुख पेपर लीक प्रकरणांमध्ये सहभागी होता अशी माहिती आहे. संजीव मुखिया देशातील विविध परीक्षांमध्ये ब्ल्यूटूथ उपकरणे वापरून सॉल्व्हर्सना बसवायचा. मुखिया स्वतः दिल्लीत ब्लूटूथ उपकरणे खरेदी करण्यासाठी येत असे.

मुखियाच्या टोळीकडे असे तज्ज्ञ आहेत जे परीक्षेचे पेपर असलेले सीलबंद बॉक्स अशा प्रकारे फोडू शकायचा की, त्यांनी केलेल्या छेडछाडीचा कोणालाही संशय यायचा नाही. मात्र आता त्याचे सगळे कारनामे एक-एक करुन बाहेर येऊ लागले आहेत.