बुद्धांचा संदेश हाच मानवतेचा मार्ग - पंतप्रधान मोदी

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 2 h ago
नरेंद्र मोदी
नरेंद्र मोदी

 

बुद्धाचा संदेश हा मानवतेचा मार्ग आहे. युद्धापासून लांब राहत मानवतेची सेवा केली तर जग वाचू शकते," असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधिधम्म दिवसानिमित्त विज्ञान भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात केले. भगवान बुद्धांचा अधिधम्म, त्यांची वाणी आणि शिक्षण ज्या पाली भाषेच्या माध्यमातून जगाला प्राप्त झाली, त्या पाली भाषेला अलीकडेच अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला असल्याचे मोदी यांनी नमूद केले. 

पंतप्रधान मोदी म्हणाले की, अधिधम्म दिवस हा करुणा आणि सद्भावनेची आठवण करून देतो. याआधी २०२१ मध्ये कुशीनगर येथे अशा प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन झाले होते आणि त्यावेळी हजर राहण्याची संधी मला मिळाली होती. 

आधीच्या सरकारांकडून दुर्लक्ष देशाच्या सांस्कृतिक वारशाकडे आधीच्या सरकारांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप मोदी यांनी यावेळी केला. ते म्हणाले, "भाषा, साहित्य, कला आणि अध्यात्म यासारखे सांस्कृतिक स्तंभ देशाची ओळख निश्चित करत असतात. प्रत्येक देश मोठ्या अभिमानाने आपला हा वारसा जपत असतो. दुर्दैवाने भारत आपला सांस्कृतिक वारशा संरक्षित करण्यात मागे पडला होता."

स्वातंत्र्यपूर्वकाळा आक्रमणकर्त्यांनी देशाची ओळख मिटविण्याचा प्रयत्न केला तर स्वातंत्र्यानंतर येथील राज्यकत्यांनी गुलामीच्या मानसिकतेकडे दुर्लक्ष केले, असा दावाही त्यांनी यावेळी केला. "आतामात्र भारत गुलामगिरीच्या हीन भावनेपासून मुक्त होऊन स्वाभिमानाने तसेच आत्मगौरवाने वाटचाल करीत आहे," असे प्रतिपादन मोदी यांनी यावेळी केले.

जगाला बुद्ध दिला
भारताने जगाला बुद्ध दिला आहे, हे मी संयुक्त राष्ट्रसंघात सांगितले होते. शांततेसारखे दुसरे मोठे कसलेही सुख नाही. जगाला युद्धामुळे नाही तर बुद्धामुळे समस्यांची उत्तरे मिळू शकतात, त्यामुळे बुद्धापासून शिका आणि युद्धापासून दूर रहा, असे माझे जगाला सांगणे आहे," असे प्रतिपादन पंतप्रधान मोदी यांनी केले. 

'प्राचीन कलाकृती परत आणल्या'
"ऐतिहासिक गोष्टींना संरक्षित आणि सुरक्षित करण्याची मोहीम सरकारने सुरू केली आहे. मागील १० वर्षांत सहाशेपेक्षा जास्त प्राचीन कलाकृती, मूर्ती आणि अवशेष विविध देशांतून परत आणले गेले आहे. यात बौद्ध धर्माशी संबंधित अनेक वस्तूंचा समावेश आहे," असे मोदी म्हणाले. शरद पौर्णिमा आणि वाल्मीकी जयंतीचे औचित्य साधत त्यांनी देशवासीयांना यावेळी शुभेच्छा दिल्या. 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter