'ॲक्ट ईस्ट' धोरणाचा ब्रुनेई भागीदार - पंतप्रधान मोदी

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 11 d ago
नरेंद्र मोदी सुलतान बोल्किया यांच्याशी चर्चा करताना
नरेंद्र मोदी सुलतान बोल्किया यांच्याशी चर्चा करताना

 

भारत व ब्रुनेईमध्ये राजनैतिक संबंध प्रस्थापित होऊन ४० वर्षे झाल्याच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्रुनेईचा दौरा केला. त्यांनी बुधवारी ब्रुनेईचे सुलतान हाजी हसनल बोल्किया यांची भेट घेऊन विविध मुद्द्यांवर द्विपक्षीय चर्चा केली. दोन्ही देशांतील व्यापारी संबंध अधिक व्यापक करण्यावर दोन्ही नेत्यांनी यावेळी चर्चा केली. भारताच्या 'अॅक्ट ईस्ट' धोरणाचा ब्रुनेई हा महत्त्वाचा भागीदार असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीने सांगण्यात आले.
  
ब्रुनेईला भेट देणारे मोदी हे पहिले भारतीय पंतप्रधान आहेत. सुलतान बोल्किया आणि त्यांच्या कुटुंबीयांनी 'इस्ताना नुरुल इमान' या अधिकृत निवासस्थानी त्यांचे स्वागत केले. तेथेच या दोन्ही नेत्यांमध्ये याच राजमहालात चर्चा झाली. "महाराज सुलतान हाजी हसनल बोल्किया यांना भेटून आनंद झाला. आम्ही अनेक मुद्यांवर विस्तृत चर्चा केली. दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्याबाबतही आम्ही बोललो. व्यापारी व व्यावसायिक संबंध आणि नागरिकांमधील आदान-प्रदान आणखी विस्तारणार आहे," असे मोदी यांनी 'एक्स'वरील पोस्टमध्ये म्हटले आहे. 

सुलतान यांना उद्देशून पंतप्रधान म्हणाले, "आम्ही एकमेकांचा भावनांचा आदर करतो. मी १४० कोटी भारतीयांच्या वतीने आणि ब्रुनेईच्या ४० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त ब्रुनेईतील जनतेचे अभिनंदन करतो. आमच्यातील संबंध अनेक दशकांपासून आहेत आणि दिवसेंदिवस दोन्ही देशांमधील हे संबंध अधिक दृढ होत आहेत. २०१८ मध्ये प्रजासत्ताकदिनी मुख्य अतिथीच्या रूपात तुमच्या भारताला भेटीची आठवण आम्ही अभिमानाने आजही काढतो." पंतप्रधानपदाच्या तिसऱ्या कार्यकाळात ब्रुनेईत येण्याची संधी मिळाल्याबद्दल मोदी यांनी आनंद व्यक्त केला. दोन्ही देश त्यांच्या द्विपक्षीय संबंधांचा ४० वा वर्धापनदिन साजरा करीत आहे, हा सुखद योगायोग आहे, असेही ते म्हणाले.

सिंगापूरमधील मोदींचे जल्लोषात स्वागत
सिंगापूर : ब्रुनेईचा दौरा करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बुधवारी सिंगापूरला आगमन झाले. सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वाँग यांनी त्यांना सिंगापूर भेटीचे निमंत्रण दिले होते. गेल्या ११ वर्षांतील हा त्यांचा पाचवा अधिकृत दौरा आहे. मोदी यांच्या स्वागतासाठी येथील भारतीय समुदायाने गर्दी केली होती. हॉटेलमध्ये पोहोचल्यावर अनिवासी भारतीयांनी त्यांचे मोठ्या जल्लोषात वाजतगाजत स्वागत केले. यावेळी अनेकांनी त त्यांची स्वाक्षरी घेतली.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter