आमदार रईस खान यांनी नार्वेकरांच्या ट्वीटवर घेतला 'हा' आक्षेप

Story by  आवाज़ मराठी | Published by  Saurabh Chandanshive • 19 d ago
शरद पवार, उद्धव ठाकरे आणि नाना पटोले
शरद पवार, उद्धव ठाकरे आणि नाना पटोले

 

लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळालेल्या महाविकास आघाडीचा राज्यातील विधानसभा निवडणुकीत दारूण पराभव झाला आहे. शिवाय या निवडणुकीत महाविकास आघाडीला हिंदू मतदारांनी डाववल्याचं बोललं जात आहे.

खुद्द ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील शिवसेना हिंदुत्वापासून दुरावल्याचा अपप्रचार खोडून काढण्याचे आदेश शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे) पदाधिकारी आणि माजी नगरसेवकांना दिले आहेत. त्यामुळे हिंदू मतदार ठाकरेंच्या शिवसेनेपासून दुरावल्याचे संकेत उद्धव ठाकरेंनीच दिले आहेत.

शिवाय भाजपकडूनही ठाकरेंनी हिंदुत्व सोडल्याचा प्रचार मोठ्या प्रमाणात केला जातो. याचा फटका विधानसभेप्रमाणे आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत बसू नये यासाठी आता ठाकरेंच्या शिवसेनेकडून 'हिंदुत्वा'चा नारा देण्यात आला आहे. अशातच आता ठाकरेंच्या शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी शुक्रवारी एक्सवर केलेल्या एका पोस्टमुळे महाविकास आघाडीत नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

कारण नार्वेकर यांनी बाबरी मशिद विध्वंसाच्या घटनेचं समर्थन करणारी पोस्ट शेअर केली आहे. मात्र त्यांच्या या पोस्टवर काँग्रेस नेते रईस शेख यांनी आक्षेप घेत निषेध नोंदवला आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेची निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून शिवसेना हिंदुत्वाचा मुद्दा जवळ करत आहे. मात्र, काँग्रेसचा मात्र याला विरोध असल्याचं रईस शेख यांच्या पोस्टवरून दिसून येत आहे.

शेख यांनी नार्वेकरांच्या पोस्टला रिपोस्ट करत धर्मनिरपेक्ष मतदारांनी आपल्याला मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिल्याची आठवण करून दिली आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं, "आपल्याला आठवण करून देतो की शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला मागील दोन निवडणुकांमध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत धर्मनिरपेक्ष मतदारांनी मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला आहे.

भारताच्या इतिहासातील त्या काळ्या दिवसाचे अशा प्रकारे गौरवीकरण अयोग्य आणि अनावश्यक आहे. अशा प्रकारच्या गौरवीकरणाचा मी तीव्र निषेध करतो." शेख यांच्या या ट्विटमुळे आता हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.