डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर काँग्रेसच्या वतीने भाजपवर जोरदार टीका करण्यात आली होती, त्या आरोपांना प्रत्युत्तर म्हणून भाजपने आगामी वर्षभर 'संविधान पर्व' साजरे करण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपच्या संघटनात्मक निवडणुकांबाबत आज झालेल्या संघटन पर्व कार्यशाळेत २५ डिसेंबर २०२४ ते २५ डिसेंबर २०२५ असे संपूर्ण वर्षभर 'अटल जयंती सुशासन पर्व' आणि 'संविधान पर्व' साजरे करण्याचे ठरले.
भाजपच्या संघटनात्मक निवडणुकांबाबत आज पक्षाच्या दिल्ली येथील मुख्यालयात आढावा बैठक झाली. या बैठकीला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, राष्ट्रीय सरचिटणीस (संघटन) बी. एल. संतोष यांच्यासह पक्षाचे सर्व सरचिटणीस, प्रदेशाध्यक्ष, राज्यांचे सरचिटणीस, संघटनात्मक निवडणूक प्रक्रियेचे प्रमुख विनोद तावडे आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीमध्ये, १५ जानेवारीपर्यंत ५० टक्के राज्यांमध्ये तालुका, जिल्हा आणि प्रदेशपातळीवरील निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचे उद्दिष्ट भाजपने ठरविले आहे. पक्षाच्या घटनेनुसार किमान ५० टक्के राज्यांमध्ये संघटनात्मक निवडणूका झाल्यानंतरच राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी निवडणूक होते.
विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा कार्यकाळ २०२३ मध्ये संपुष्टात आला असला तरी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन त्यांना वर्षभराची मुदतवाढ देण्यात आली होती, त्यापार्श्वभूमीवर जानेवारीच्या अखेरीस नवीन राष्ट्रीय अध्यक्षांची घोषणा अपेक्षित आहे. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना, भाजपचे लडाखमधील नेते पीटी कुंजांग यांनी सांगितले, "अटल बिहारी वाजपेयी यांची जन्मशताब्दीनिमित्त त्यांची जयंती संपूर्ण वर्षभर साजरी करण्याचे ठरले आहे. तसेच डॉ. आंबेडकर यांची बदनामी करणाऱ्या काँग्रेसच्या आरोपांना प्रत्युत्तर म्हणून आगामी वर्षभर संविधान पर्व साजरे केले जाणार आहे.
महाराष्ट्रातील नेत्यांचा सत्कार
■ या कार्यशाळेत महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या यशाबद्दल प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांचा नड्डा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. "महाराष्ट्रात भाजपचे दीड कोटी सदस्य करू," असा निर्धार बावनकुळे यांनी यावेळी व्यक्त केला. राज्यात १ ते १५ जानेवारी सदस्य नोंदणी अभियान राबविणार असून, १२ जानेवारीला शिर्डी येथे महाराष्ट्र प्रदेश भाजप महाअधिवेशन घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.