कॉंग्रेसने मुस्लिमांना केवळ आमची भीती दाखवली - नितीन गडकरी

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 5 d ago
नितीन गडकरी
नितीन गडकरी

 

‘काँग्रेसने मुस्लिमांनाही विनाकारण आमची भीती दाखवत मतदान करून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, काँग्रेसने आजपर्यंत मुस्लिमांना काय दिले? एखादी चहाची टपरी, टायरचे दुकान! मात्र, मी स्वतः माझ्या मतदारसंघात ‘अंजुमन ए इस्लाम’ या संस्थेला इंजिनिअरिंग कॉलेज दिले व मुलांना इंजिनिअर बनवा, डॉक्टर बनवा, असे सांगितले. जातीपातीत, धर्मपंथात न अडकता देशासाठी काम करा. आम्ही देश हितासाठीच काम करतो,’ असे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे भाजप उमेदवार राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रचारासाठी धाराशिव जिल्ह्यातील नळदुर्ग येथे गुरुवारी गडकरी यांची सभा झाली. ‘आपण मतदान करताना जात न पाहता विकास करणारा, शेतकरी हितासाठी झटणारा, सुशिक्षित तरुण यांचे भले करणारे पाहा. चांगले रस्ते निर्माण करणाऱ्यांना मतदान करा’, असे आवाहन त्यांनी केले.

महाराष्ट्रात मंत्रिपदाच्या कार्यकाळात केलेले ५५ उड्डाणपूल, मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग याचे दाखले गडकरी यांनी दिले. महाराष्ट्रातील सर्व तीर्थक्षेत्र जोडण्याचे भाग्य केंद्रीय मंत्री झाल्यानंतर मिळाल्याचे सांगितले. भाषणादरम्यान इथेनॉल, बायोडिझेल, शेतकऱ्यांच्या आर्थिक समृद्धीसाठी तंत्रज्ञानाचा वापर याबाबत काम करणे आवश्यक असल्याचे सांगत नागपूर येथील आपल्या कामाचा दाखला गडकरी यांनी दिला. सभेस भाजप जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे, भाजपचे ॲड. मिलिंद पाटील, सुनील चव्हाण, अर्चना पाटील, यांच्यासह महायुतीचे स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.

राज्यघटना कोणीही बदलू शकत नाही
‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बनवलेली राज्यघटना कोणीही बदलू शकत नाही. उलट १९७५ मध्ये काँग्रेसने तसा प्रयत्न केला होता. मात्र, नंतरच्या काळात जनता पक्षाचे सरकार आल्यानंतर काँग्रेसचा राज्यघटना बदलण्याचा डाव हाणून पाडला. घटनेचे मूलभूत तत्त्व कोणीही बदलू शकत नाही, हे केशवानंद भारती खटल्यामध्ये ११ जणांच्या खंडपीठाने सिद्ध केले आहे,’ असे गडकरी यांनी सांगितले.

‘पालखी मार्ग करण्याचे भाग्य मला मिळाले’
मंगळवेढा - काँग्रेसच्या काळात ग्रामीण भागात जाण्यासाठी रस्ते नव्हते. पंढरपूरला पायी जाणाऱ्या वारकऱ्यांच्या सोयीसाठी १२ हजार कोटींचा पालखी मार्ग करण्याचे भाग्य मला मिळाल्याचे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी येथे केले.

पंढरपूर - मंगळवेढ्यातील महायुती उमेदवार आमदार समाधान आवताडे यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आमदार आवताडे, माजी आमदार प्रशांत परिचारक, शशिकांत चव्हाण आदी उपस्थित होते.

गडकरी म्हणाले, की भांडवली बाजारातून पैसे उभे करत पुणे-मुंबई महामार्गासह ५५ उड्डाणपूल केले. देशात पैसे उपलब्ध आहे पण प्रामाणिकपणे काम करणारे लोक नाहीत. देश बदलला पाहिजे, जनतेला सुसह्य जीवन जगता आले पाहिजे. प्रत्येक गावातील शेतकऱ्यांचा शेतमाल योग्य दराने विकला गेला पाहिजे. गावाला रस्ते, पिण्याचे पाणी मिळाले पाहिजे. प्रधानमंत्री ग्राम सडक योजना आमच्या संकल्पनेतून उभी राहिली.

देशातला शेतकरी आपल्याला इंधन देऊ शकतो. शेतकऱ्यांच्या उसापासून तयार केलेल्या इथेनॉलवर आमची गाडी चालते. याचा शेतकऱ्यांनाही फायदा होईल.तंत्रज्ञानात बदल होत आहे. ग्रामीण भाग समृद्ध झाला तर शहरात गर्दी होणार नाही. शेतकरी आत्महत्या करणार नाहीत, असेही ते म्हणाले.