भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा
वक्फ कायद्यात केलेल्या सुधारणांची माहिती देण्यासाठी देशव्यापी जनजागृती मोहीम राबविण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. येत्या २० एप्रिल रोजी या मोहिमेची सुरुवात होणार असून, ५ मे रोजी त्याची सांगता होईल.
सुधारित वक्फ कायद्याला विरोध करत विविध शहरांमध्ये आंदोलन झाले होते तर 'इंडिया' आघाडीतील काही पक्षांसह मुस्लिम संघटनांनी यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर कायद्यातील मुस्लिम सुधारणा समाजासाठी कशा लाभदायक आहेत, ते जनजागृती मोहिमेच्या माध्यमातून भाजप पटवून देणार आहे.
सुधारित 'वक्फ कायद्याच्या अनुषंगाने काँग्रेस तसेच त्याचे अन्य सहयोगी पक्ष लोकांमध्ये संभ्रम पसरवत आहेत. या पक्षांच्या हेतूचा पर्दाफाश करणे हेही मोहिमेचे उद्दिष्ट आहे,' असे भाजपकडून सांगण्यात आले आहे. जनजागृती मोहीम राबविण्याच्या अनुषंगाने राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी गुरुवारी एक कार्यशाळा घेत पक्षाच्या प्रमुख नेत्या-कार्यकत्यांना मार्गदर्शन केले.
लांगुलचालनाचे राजकारण डोळ्यासमोर ठेवत काँग्रेस आणि त्याच्या सहयोगी पक्षांनी वक्फ कायद्याच्या संदर्भात अपप्रचार चालविला असल्याचा आरोप नड्डा यांनी यावेळी केला. त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांनी मुस्लिम समाजामध्ये जाऊन 'इंडिया' आघाडीच्या नेत्यांचे पितळ उघडे पाडावे आणि कायद्याची सविस्तर माहिती द्यावी, असेही नड्डा यांनी या वेळी बैठकीत सांगितले.
कार्यशाळेत संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी सहभाग घेतला होता. यावेळी त्यांनी कार्यशाळेत वक्फ सुधारणांबद्दल सविस्तर माहिती दिली. या कार्यशाळेसाठी प्रत्येक राज्यातील तीन ते चार नेत्यांना पाचारण केले होते. यात प्रत्येक राज्यातील अल्पसंख्याक मोर्चाच्या अध्यक्षांचा समावेश होता. वक्फ कायद्याच्या अनुषंगाने या अध्यक्षांनी त्यांच्या राज्यांत जिल्हानिहाय कार्यशाळा घेण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले. वक्फ कायद्याची माहिती देण्याच्या अनुषंगाने मुस्लिम समाजाशी संवाद साधण्याची संधी मिळेल, असाही भाजपचा होरा आहे.