भारताचे सरन्यायाधीश संजीव खन्ना हे लवकरच निवृत्त होणार असून, सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने नुकतीच सरन्यायाधीशपदासाठी न्यायाधीश भूषण गवई यांच्या नावाची शिफारस केली आहे. गवई हे ५२वे सरन्यायाधीश म्हणून १४ मे ला शपथ घेणार आहे. राष्ट्रपती द्रोपती मुर्मू त्यांना सरन्यायाधीश पदाची शपथ देतील. यानिमित्ताने त्यांच्या कारकिर्दीचा घेतलेला आढावा.
न्या. भूषण गवई यांचा जन्म २४ नोव्हेंबर १९६० रोजी अमरावती येथे झाला. न्या. भूषण गवई हे केरळ आणि बिहारचे माजी राज्यपाल तसेच दिवंगत रिपब्लिकन नेते रा. सू. उपाख्य दादासाहेब गवई यांचे ज्येष्ठ सुपुत्र आहेत. १६ मार्च १९८५ रोजी ते बार असोसिएशनमध्ये रुजू झाले. १९८७पर्यंत त्यांनी उच्च न्यायालयाचे माजी महाधिवक्ता आणि दिवंगत न्यायाधीश राजा एस. भोसले यांच्यासोबत काम केले. त्यानंतर १९८७ ते १९९० या काळात मुंबई उच्च न्यायालयात स्वतंत्रपणे वकिली केली.
न्या. भूषण गवई हे नागपूर व अमरावती महापालिका तसेच अमरावती विद्यापीठाचे स्थायी वकील होते. १९९० नंतर, त्यांनी मुख्यतः मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासमोर वकिली केली. घटनात्मक कायदा आणि प्रशासकीय कायद्यात त्यांची तज्ज्ञता आहे. नागपूर महानगरपालिका, अमरावती महानगरपालिका, अमरावती विद्यापीठ, विविध स्वायत्त संस्था आणि महामंडळे आणि विदर्भातील विविध नगरपरिषदांची बाजू त्यांनी विविध प्रकरणांमध्ये मांडले.
ऑगस्ट १९९२ ते जुलै १९९३ पर्यंत त्यांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात साहाय्यक सरकारी वकील आणि अतिरिक्त सरकारी वकील, तर १७ जानेवारी २००० रोजी त्यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती झाली. १४ नोव्हेंबर २००३ रोजी त्यांना उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून बढती मिळाली व १२ नोव्हेंबर २००५ रोजी मुंबई उच्च न्यायालयाचे कायमस्वरूपी न्यायाधीश झाले. उच्च न्यायालयाच्या मुंबई, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि पणजी खंडपीठावर विविध पीठांचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे. २४ मे २०१९ रोजी त्यांना सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून बढती झाली.
सरन्यायाधीश होणारे तिसरे सदस्य
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश होणारे न्या. गवई हे नागपूर बार असोसिएशनचे तिसरे सदस्य आहेत. याआधी न्या. महम्मद हिदायतुल्ला आणि शरद बोबडे हे सरन्यायाधीश झाले होते.