वांद्रे पूर्वचे आमदार झीशान सिद्दीकी यांचा अजित पवार गटात प्रवेश

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 15 h ago
अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत वांद्रे पूर्वचे आमदार झीशान सिद्दीकी यांचा प्रवेश
अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत वांद्रे पूर्वचे आमदार झीशान सिद्दीकी यांचा प्रवेश

 

वांद्रे पूर्वचे कॉंग्रेसचे विद्यमान आमदार झीशान सिद्दीकी यांच्या अजित पवार गटात प्रवेशामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे. झीशान काँग्रेसचे एक सक्रिय आणि युवा नेते म्हणून ओळखले जातात. त्यांनी आपला पक्ष सोडून अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) गटात प्रवेश केला आहे. वडील बाबा सिद्दिकी यांनीही कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देत अजित पवार गटात प्रवेश केला होता. मात्र काही दिवसांपूर्वीच त्यांची निर्घृण हत्या करण्यात आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला होता. या पार्श्वभूमीवर झीशान यांच्या पक्षांतराला विशेष महत्त्व आहे. 

झीशान सिद्दीकी मुंबईतील वांद्रे पूर्व विधानसभा क्षेत्रातील एक लोकप्रिय युवा नेता आहेत. त्यांना स्थानिक स्तरावर मोठे जनाधार आहे. वडिलांच्या निधनानंतर सहानुभूतीची लाट त्यांच्याबाजूने असणार आहे. त्यामुळे त्यांच्या जाण्यामुळे काँग्रेसला धक्का बसला आहे. त्यामुळे हा निर्णय महाराष्ट्रातील सत्ता आणि राजकीय समीकरणांवर प्रभाव टाकू शकतो. 

ताज्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर झीशान सिद्दीकींनी स्पष्ट केले की, त्यांनी हा निर्णय लोकांच्या भल्यासाठी घेतला आहे.  अजित पवार यांचे धोरण त्यांच्या दृष्टिकोनाशी अधिक सुसंगत आहे. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वात मतदारसंघातील समस्यांचे निराकरण करण्यासाठी हा पर्याय निवडल्याचे सांगितले. ते म्हणाले, "महाविकास आघाडीने उमेदवारांची यादी जाहीर केली. वांद्रेमध्ये काँग्रेसचा विद्यमान आमदार असतानाही ती जागा शिवसेना (UBT) ला देण्यात आली हे अत्यंत दुर्दैवी आहे.गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांचा माझ्याशी संपर्क होता. पण त्यांची माझी फसवणूक करण्याची योजना होती. मात्र या कठीण काळात अजित पवार, प्रफुल पटेल, सुनील तटकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने माझ्यावर विश्वास ठेवला. मी त्यांचा आभारी आहे."

ते पुढे म्हणाले, "माझ्या वडिलांचे अपूर्ण स्वप्न होते की आम्ही ही जागा पुन्हा जिंकावी आणि लोकांच्या हक्कांसाठी लढावे. लोकांसाठी लढत असल्यामुळे त्यांची हत्या करण्यात आली. माझ्या धमन्यांमध्ये त्यांचेच रक्त आहे. मी त्यांचं स्वप्न पूर्ण करेन. बंद्रा पूर्व मतदारसंघात विक्रमी मतांनी विजय मिळवेन."

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter