अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या वर्षपूर्तीनिमित्त ११ ते १३ जानेवारी या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मागील वर्षी रामजन्मभूमीवरील मंदिरात राममूर्तींची स्थापना करण्यात आली होती.
त्या कार्यक्रमाला ज्या निमंत्रितांना येथे उपस्थित राहता आले नव्हते त्यांना यंदाच्या कार्यक्रमाला विशेष निमंत्रण देण्यात आले आहे. त्याशिवाय ११० जणांना या कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आले असल्याचे श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या वतीने सांगण्यात आले.
अयोध्येतील अंगद टिला येथे सुमारे पाच हजार जणांची व्यवस्था होईल एवढ्या मोठ्या तंबूची उभारणी करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे येथे येणाऱ्या सर्व भाविकांनाही या कार्यक्रमामध्ये सहभागी होता येणार आहे.
चार विविध ठिकाणी कार्यक्रम
प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या वर्षपूर्ती निमित्त राममंदिर परिसरामध्ये चार वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मंदिर परिसरातील यज्ञमंडप येथे दररोज सकाळी आठ ते ११ आणि दुपारी दोन ते सायंकाळी पाच पर्यंत वेदमंत्रपठण श्रीराम मंत्र जप यांसह विविध स्तोत्रांचे पठण होणार आहे. राममंदिराच्या प्रार्थना मंडप येथे दुपारी तीन ते पाच या कालावधी दरम्यान गायन सेवा सादर होणार आहे. त्याचप्रमाणे मंदिर प्रांगणात सायंकाळी सहा ते रात्री नऊ दरम्यान श्रीरामलल्ला समोर मंगल गायन होणार आहे. तसेच भक्त निवास येथे संगीतमय श्रीराम चरित मानस पाठाचे आयोजन करण्यात आले आहे.
पाच हजार जणांची व्यवस्था
मंदिर परिसराजवळील अंगद टिला येथे तब्बल पाच हजार जणांची व्यवस्था होईल एवढ्या मोठ्या तंबूची उभारणी करण्यात येत असून, येथे दुपारी दोन ते साडेतीन या वेळात राम कथा आणि साडेतीन ते सायंकाळी पाच या कालावधीमध्ये श्रीरामचरित मानस ग्रंथावर प्रवचनांचे आयोजन करण्यात आले आहे. या कालावधीत भाविकांना भोजन प्रसादही देण्यात येणार आहे. अशी माहिती श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या वतीने देण्यात आली आहे.
तिथीनुसार सोहळा साजरा करणार
अयोध्येत रामजन्मभूमीवर बांधण्यात आलेल्या राममंदिरामध्ये मागील वर्षी २२ जानेवारी रोजी राममूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली होती. भारतीय कालगणनेनुसार त्या दिवशी पौष शुद्ध द्वादशी ही तिथी होती. त्यामुळे याच तिथीला यंदा अयोध्येमध्ये राममूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा वर्षपूर्ती कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे पौष शुद्ध द्वादशी ही तिथी प्राणप्रतिष्ठा द्वादशी म्हणून साजरी केली जाणार असल्याचेही श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सचिव चंपत राय यांनी सांगितले आहे.