मालेगाव,
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा निकाल काल लागला. महाराष्ट्राच्या जनतेने महायुतीला अभूतपूर्व विजय मिळवून दिला. अशातच सर्वांचे लक्ष लागून राहिले होते ते सर्वाधिक मुस्लीम मतदार असणाऱ्या मालेगाव मध्ये विधानसभेवर. विशेष म्हणजे या मतदारसंघाची मतमोजणी सर्वात उत्कंठावर्धक ठरली. क्षणक्षणाला मतदानाचा लोलक झुलता होता. पहिल्या काही फेरीत 'इस्लाम' पक्षाचे माजी आमदार आसिफ शेख आघाडीवर होते. पंधराव्या फेरीनंतर त्यांच्या आघाडीला एमआयएमचे उमेदवार आमदार मौलाना मुफ्ती मोहम्मद इस्माईल यांनी सुरुंग लावला. काट्याची टक्कर झालेल्या या ठिकाणी फेरमतमोजणी नंतर मौलाना मुफ्ती विजयी झाले.
८० टक्क्याहून अधिक मुस्लीम लोकसंख्या असणाऱ्या मालेगाव मध्यची ही लढाई नेमकं कोण जिंकणार याविषयी अगदी शेवटच्या क्षणापर्यंत उत्सुकता ताणली गेली होती. शेवटी मौलाना मुफ्ती मोहम्मद इस्माईल (एआयएमआयएम) यांना १ लाख ९ हजार ६५३ मिळाल्याचे जाहीर झाले. तर नवख्या 'इस्लाम' पक्षाकडून लढणारे आसिफ शेख अवघ्या १६२ मतांनी मागे राहिले. त्यांना १ लाख ९ हजार ४९१ मते पडली.
मालेगाव मध्ये विजय साकारताना महाराष्ट्रात एआयएमआयएमचे खाते उघडत मौलानांनी आपली जागा कायम राखली. ते सलग दुसऱ्यांदा विजयी झाले. यापूर्वी त्यांनी एक वेळा विजय संपादन केला असल्याने ते तिसऱ्यांदा सभागृहात प्रवेश करणार आहे. विधानसभा निवडणुकीत अंतिम क्षणी मौलाना मुफ्ती यांची प्रकृती बिघडली. आजारपणामुळे त्यांना सहानुभूती मिळाली. मुफ्तीसारखे सर्वोच्च धार्मिक पद, इदगाहचे इमाम, शहरातील मतदारांमध्ये असलेला आदर व धार्मिक पगडा, गुन्हेगारीला प्रखर विरोध या बाबी त्यांच्या विजयाला हातभार लावून गेल्या.
याउलट अपक्ष उमेदवार माजी आमदार आसिफ शेख प्रचारात त्यांच्यावरील गुन्हेगारी विषयक आरोपांना उत्तर देण्यात गुरफटले. त्यांच्या उत्तरांनी मतदारांचे समाधान होवू शकले नाही. याशिवाय मोमीन (अन्सारी) समाजाची एकगठ्ठा मते मौलाना मुफ्ती यांच्याकडे एकवटली. समाजवादी पार्टीच्या शान ए हिंद यांच्यामुळे मोमीन मतांचे विभाजन होईल हा शेख यांचा कयास खोटा ठरला. मतदार संघातून सलग पाचवेळा निवडून येण्याचा विक्रम करणारे आणि माजी मंत्री राहिलेले निहाल अहमद यांच्या कन्या शान ए हिंद यांना निवडणुकीत त्यांना अवघी ९ हजार ५८० मते मिळाली. तर काँग्रेसच्या एजाज बेग यांना अवघी ७ हजार ४८५ मते मिळाली.
याउलट दखणी समाजाचे व शहरात काही भागात मोठे प्राबल्य असलेल्या युनूस ईसा परिवाराची मौलाना मुफ्ती यांना खंबीर साथ मिळाली. शहरातील गुन्हेगारीला 'इस्लाम' पक्ष स्थापन करणाऱ्या आसिफ शेख यांचा आणि त्यांच्या कुटुंबीयांचा वरदहस्त आहे हा प्रचार मतदारांच्या मनावर बिंबवण्यात मौलाना मुफ्ती यशस्वी झाले. त्याचा मोठा फटका शेख यांना बसला. या आरोपांमुळे शहरातील यंत्रमाग कारखानदार मौलानांच्या पाठीशी राहिले. यावेळी प्रचारात विकास कामाऐवजी वैयक्तिक टीका टिप्पणीवर भर दिसला.
नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांच्याशी असलेल्या सलोख्याचे संबंधाचा फायदा काही प्रमाणात मौलानांना झाला असे म्हटले जात आहे. मालेगाव बाह्य मतदारसंघात विक्रमी विकासकामे झाली. आगामी महापालिका निवडणुकीत ते सहकार्य करतील मध्य मतदारसंघात त्यांच्या पाठबळावर कामे मार्गी लागतील हा प्रचारही मौलानांच्या कामी आला. याउलट आसिफ शेख यांनी भुसे यांना थेट विरोध केल्याने काहींना ते रुचले नाही. भुसे हे विरोधक असले तरी त्यांच्या विकासकामांचे मध्य मधील मुस्लीम मतदारदेखील कौतुक करतात.
मतदारसंघात मंजूर असलेली महत्त्वपूर्ण कामे करण्यासाठी संधी हवी हा प्रचार व अंतिम टप्प्यातील काही विकासकामांचा शुभारंभ मौलाना मुफ्ती मोहम्मद इस्माईल यांना लाभदायक ठरला. यामुळे गत निवडणुकीत त्यांच्या समवेत असलेल्या शान ए हिंद व एजाज बेग यांनी विरोधात दंड थोपटत निवडणूक लढवूनही मौलाना मुफ्ती यांनी बाजी मारली. या दोघांचा फारसा प्रभाव दिसला नाही. दोघे दहा हजारी मनसबदार ठरले. तथापि अत्यल्प मतांनी झालेला आसिफ शेख यांचा पराभव त्यांच्यासह कार्यकर्त्यांना हुरहूर लावून गेला.
'एआयएमआयएम'प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी केले अभिनंदन
मौलाना मुफ्ती मोहम्मद इस्माईल यांच्या विजयाने 'एआयएमआयएम'ला महाराष्ट्रात आपले खाते उघडता आले आहे. पक्षाने राज्यात ११६ उमेदवार उभे केले होते. मात्र केवळ मालेगाव मध्यच्या जागेवरच त्यांना विजय मिळवता आला आहे. या विजयाबद्दल मौलाना मुफ्ती मोहम्मद इस्माईल यांचे 'एआयएमआयएम'प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी अभिनंदन केले आहे. आपल्या ट्वीटमध्ये ते लिहितात, "दुसऱ्यांदा निवडून आल्याबद्दल मी मुफ्ती इस्माईल साहेबांचे अभिनंदन करतो. आम्हाला मोठ्या संख्येने मतदान करणाऱ्या महाराष्ट्राच्या जनतेचाही मी विशेष आभारी आहे."