देशातील नागरिकांच्या कल्याणासाठी अनेक सरकारी संस्था आणि समित्या काम करत आहेत. या संस्था समाजातील विविध घटकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी, त्यांचा सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक विकास साधण्यासाठी प्रयत्नशील असतात. यापैकी काही समित्या विशेषतः अल्पसंख्याक समुदायांसाठी काम करतात. पण या संस्था आणि त्यांच्या कामाबद्दल नागरिकांना पुरेशी माहिती नसते. त्यापैकी एक समिती म्हणजे महाराष्ट्र सरकारने २००९मध्ये स्थापन केलेली ‘अल्पसंख्यांक कल्याण समिती’.
गेल्या महिन्यात राज्य सरकारचे अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडले. हे अधिवेशन झाल्यांनातर लगेचच महायुती सरकारने विधिमंडळाच्या विविध समित्यांच्या प्रमुखांची यादी जाहीर केली. यामध्ये अनेक नव्या लोकांना संधी देण्यात आली. यामध्ये अल्पसंख्यांक कल्याण समितीची जबाबदारी अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार मुरजी पटेल यांच्यावर सोपवण्यात आली.
अल्पसंख्याक कल्याण समितीविषयी
अल्पसंख्याक कल्याण समिती ही महाराष्ट्र विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांतील सदस्यांची एक संयुक्त समिती आहे. ही समिती अल्पसंख्याक समुदायांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक उन्नतीसाठी कार्य करते. २०११ च्या जनगणनेनुसार, देशातील अल्पसंख्याकांचं प्रमाण एकूण लोकसंख्येच्या सुमारे १९.३% आहे. या समुदायांच्या कल्याणासाठी महाराष्ट्रातही विशेष प्रयत्नांची गरज होती. त्यामुळे २५ ऑगस्ट २००९ रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत ‘अल्पसंख्याक कल्याण समिती’ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर १४ डिसेंबर २००९ रोजी ही समिती स्थापन करण्यात आली.
अल्पसंख्याक कल्याण समितीचे कार्ये
अल्पसंख्याक कल्याण समिती ही विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहांतील सदस्यांची एक संयुक्त समिती आहे. ही समिती अल्पसंख्याक समुदायांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक विकासासाठी काम करते. अल्पसंख्यांक समाजातील प्रत्येक व्यक्तीला या योजनांचा लाभ मिळावा आणि त्यांचं जीवन सुधारावं तसेच अल्पसंख्याकाच्या विकासासाठी राज्य शासन राबवित असलेल्या विविध कल्याणकारी योजनांमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी, विविध योजनांमध्ये काही त्रुटी असतील त्यावर काय उपाय करता येईल यावर ही समिती लक्ष ठेवते.
तसेच समिती अल्पसंख्याक विकास योजनांची अंमलबजावणी, त्यांमधील त्रुटी आणि उपाययोजना यावर लक्ष केंद्रित करते. अल्पसंख्याक समुदायांचा सर्वांगीण विकास साधणं, सरकारच्या कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणं आणि या योजनांचा लाभ समाजापर्यंत पोहोचतोय की नाही हे तपासणं हा या समितीचा उद्देश आहे.
ही समिती सरकारच्या विविध योजनांचा आढावा घेऊन त्यांना अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी राज्य सरकारला योग्य त्या सूचना करू शकते. यासाठी दोन्ही सभागृहांना या विषयीची माहिती आणि अहवाल सादर करणे आवश्यक आहे.
समितीच्या मध्यमातून ही कामं होणं आवश्यक
अल्पसंख्यांक कल्याण समितीच्या माध्यमातून विशेषतः मुस्लिमांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक उन्नतीसाठी काम होणं आवश्यक आहे. मुंबईतील सामाजिक कार्यकर्त्या फातीमा खान म्हणतात, “शिक्षण हाच प्रगतीचा पाया आहे. ग्रामीण भागात आणि झोपडपट्ट्यांमध्ये शिक्षणाचा अभाव आजही आहे. मुस्लिम समाजातील मुलांना शिक्षण मिळाले तर समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्यास मदत होईल. यासाठी सरकारने शिष्यवृत्ती, मोफत शिक्षण सुविधा, मुलींसाठी विशेष शाळा आणि व्यावसायिक प्रशिक्षण केंद्रांची स्थापना केली पाहिजे.”
याविषयी बोलताना उद्योजक आसिफ शेख सांगतात, “मुस्लिमांचे शिक्षणासोबत आर्थिक सशक्तीकरण होणे आवश्यक आहे. बहुतेकवेळा मुस्लिम मुलांना नोकऱ्या किंवा काम मिळत नाही. त्यांना सामाजिक किंवा धार्मिक भेदभावाला सामोरं जावं लागत. मग तरुण वर्ग छोटा मोठा व्यवसाय करण्याच्या मार्गावर येतात. फ्रूटचे गाडे, बाजी मंडई विकतात. त्यातून त्यांची उपजीविका होत असली तरी ते आर्थिक सुबत्ता मिळवू शकत नाही. म्हणून सरकारने मुस्लिम समाजातील तरुणांना रोजगार द्यावा. शिवाय उद्योग करणाऱ्या पाठबळ द्यावं.”
संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात अठरापगड जातीच्या कार्यकर्त्यांनी योगदान दिले. पुरोगामी महाराष्ट्र म्हणून या राज्याची ओळख आहे. परंतु अलीकडे काही घटनांमुळे या ओळखीला गालबोट लावण्याचे प्रयत्न झाले. याविषयी मुस्लिम समाजात काहीशी अस्वस्था पहायला मिळते.
अल्पसंख्यांक कल्याण समिती ही मुस्लिम समाजाच्या सांविधानिक हक्काचे रक्षण करेल अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत. याविषयी बोलताना गफुर कादर म्हणतात, “महाराष्ट्राची परंपरा ही एकोप्याची राहिली आहे. आजवर सामाजिक आणि धार्मिक सौहार्दाची अनेक उदाहरणे महाराष्ट्राने देशापुढं ठेवली आहेत. मागील काळात घडलेल्या घटना या आदर्शवत नाहीत. परंतु या घटनांमधून धडा घेऊन आपण एकोप्याची परंपरा जपली पाहिजे. यासाठी ही समिती पुढाकार घेऊन काम करेल.”
२०११ च्या आकडेवारीनुसार राज्यात अल्पसंख्यांक समाजाची लोकसंख्या १९ टक्क्यांहून अधिक आहे. यामध्ये मुस्लिम समाजाची लोकसंख्या अधिक आहे. ही बाब लक्षात घेऊन अल्पसंख्यांक कल्याण समितीने सामाजिक समतेच्या दृष्टीने ठोस पावले उचलणे आवश्यक आहे. तर मुस्लिम समाजाचा या समितीवरचा विश्वास कायम राहील.
अल्पसंख्यांक कल्याण समितीत कोण?
अल्पसंख्यांक कल्याण समिती प्रमुख म्हणून मुरजी पटेल यांची निवड करण्यात आली आहे. तर सदस्य म्हणून नरेंद्र मेहता, महेश बालदी, मिहिर कोटेचा, राजन नाईक, कुमार आयलानी, अब्दुल सत्तार, सना मलिक, सचिन पाटील, हास्न खान, साजिद खान पठाण आणि निमंत्रित सदस्य म्हणून मुफ्ती मोहम्मद इस्माईल अब्दुल खालिक यांची निवड करण्यात आली आहे.
-फजल पठाण