शहरांची नावे बदलली तरी मतदारसंघाना नावे मात्र पूर्वीचीच

Story by  Fazal Pathan | Published by  Fazal Pathan • 30 d ago
प्रातिनिधिक चित्र
प्रातिनिधिक चित्र

 

राज्यात विधानसभा निवडणुकांची घोषणा होताच राजकीय वातावरण तापले आहे.  कालपासून उमेदवारांचे अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. येत्या २० नोव्हेंबर राज्यात सर्वत्र मतदान पार पडणार आहे. 

निवडणूका  जाहीर झाल्यानंतर विविध राजकीय मुद्यांवर चर्चा सुरु  झाली आहे. अशातच एका गोष्टीने सर्वांचे लक्ष वेधले. अनेक वर्षांच्या मागणीनंतर आणि काहीशा विरोधानंतर राज्यातील औरंगाबाद आणि उस्मानाबाद या शहरांची नावे बदलली असली तरी मतदारसंघाची नावे मात्र तीच ठेवण्यात आली आहेत. यामुळे मतदारांमध्ये काहीसा संभ्रम निर्माण झाला आहे. तर काही नागरिक यावर नाराजी व्यक्त करताना दिसत आहे. 

नेमका संभ्रम काय?
औरंगाबाद आणि उस्मानाबाद या दोन शहरांच्या नावावरून गेली अनेक दशके झाली वाद सुरू आहे. या दोन शहरांच्या नामांतराचा निर्णय भाजप-शिवसेना युतीत १९९७ मध्ये घेण्यात आला होता. त्यावेळी या निर्णयासंदर्भात अधिसूचना देखील काढण्यात आली होती. परंतु सरकारच्या या निर्णयाला न्यायालयात आव्हान मिळाले. हे प्रकरण कोर्टात असताना राज्यात सत्तांतर झाले आणि या प्रकरणाचा निर्णय घेण्यात आला नाही. 

यानंतर महाविकास आघाडीच्या काळात मंत्रिमंडळाच्या बैठकीत औरंगाबादचे संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशिव असे नामांतर करण्याबाबत निर्णय घेण्यात आला होता. मात्र तेव्हाही सत्तांतर झाले. युतीच्या सरकारने या निर्णयाला प्रथमतः स्थगिती दिली. परंतु पुन्हा हाच निर्णय घेऊन संभाजीनगर नावापुढे छत्रपती अशी उपाधी लावली आणि औरंगाबादचे ‘छत्रपती संभाजीनगर’ व उस्मानाबादचे ‘धाराशिव’ असे नामांतर करण्याचा निर्णय घेतला. 

मात्र काही नागरिकांनी आणि संघटनांनी या निर्णयाला कडाडून विरोध केला होता. त्यांनी या निर्णयाविरोधात कोर्टात धाव घेतली. मात्र सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारचा निर्णय कायम ठेवला. त्यावेळी न्यायमूर्ती म्हणाले होते, “महाराष्ट्र सरकारच्या या निर्णयात आम्ही हस्तक्षेप करू शकत नाही”.  

शहराची नावे बदली तरी आयोगाकडून मतदारसंघाची नावे तशीच...  
औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहरांच्या नावावरून वाद-विवाद झाल्यानंतर राज्य सरकारने नामांतराचा निर्णय जाहीर केला. या निर्णयाला कोर्टाने देखील दुजोरा दिला. मात्र निवडणूक आयोगाकडून  निवडणुकीमध्ये मतदारसंघाची नावे पूर्वीप्रमाणेच वापरण्यात आली. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीतही औरंगाबाद आणि उस्मानाबाद हीच नावे वापरण्यात आली होती. 

नोव्हेंबर २०२३ मध्ये राज्य निवडणूक आयोगाने शहरांची नावे बदलल्यानंतर मतदारसंघाची नावे बदलण्यात यावी यासाठी  केंद्रीय निवडणूक आयोगाशी पत्र  व्यवहार केला होता. पत्राला अनुसरून केंद्रीय निवडणूक आयोगाने उत्तरदेखील दिले आहे. 

याविषयी बोलताना छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी म्हणतात,  “ निवडणूक आयोगाने मतदारसंघांबाबत आजवर जो पत्रव्यवहार केला आहे, त्यानुसार मतदारसंघांची नावे जुनीच असतील. त्या येणाऱ्या काळात काही बदल झाले तर निश्चितपणे कळविण्यात येईल.” 

कधी बदलणार मतदारसंघाची नावे?
कोणत्याही मतदारसंघाचे नाव बदलण्यासाठी त्या मतदारसंघाची पुनर्रचना करावी लागते. पुनर्रचनेनंतर औरंगाबाद जिल्ह्यातील नऊ पैकी तीन मतदारसंघांच्या नावात बदल होणार आहे. यामध्ये औरंगाबाद मध्य, औरंगाबाद पश्चिम, औरंगाबाद पूर्व मतदारसंघाचा समावेश आहे. 

परिसीमन आयोगाच्या नियमांनुसार  २०२६ मध्ये मतदारसंघाची नावे बदलण्यात येणार आहेत. मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर छत्रपती संभाजीनगर मध्य, छत्रपती संभाजीनगर पश्चिम, छत्रपती संभाजीनगर पूर्व अशी नावे होणार आहेत.

यासोबतच अहमदनगर जिल्ह्यातील अहमदनगर शहर मतदारसंघाचे नाव अहिल्यानगर शहर तर उस्मानाबाद मतदारसंघाचे नाव धाराशिव होणार आहे.  

अशी केली जाते मतदारसंघाची पुनर्रचना  
कोणत्याही मतदारसंघाची पुनर्रचना ही स्वायत्त असलेल्या पुनर्रचना आयोगामार्फत केली जाते. हा आयोग निवडणूक आयोगाच्या सहकार्याने काम करतो असतो. संविधानाच्या कलम ८२ नुसार प्रत्येक जनगणनेनंतर संसदेला मतदारसंघ पुनर्रचनेचा कायदा लागू करावा लागतो. हा कायदा लागू झाल्यावर पुनर्रचना आयोगाची स्थापना केली जाते. लोकसंख्येतील बदल लक्षात घेऊन मतदारसंघांची पुनर्रचना केली जाते. निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी औरंगाबाद आणि उस्मानाबाद या शहरांची नावे बदलली असली तरी मतदारसंघाची नावे २०२६ पर्यंत कायम राहणार आहेत.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter