दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल ८ फेब्रुवारीला जाहीर झाला. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने बहुमत मिळवले आहे. भाजपाला ४८ आणि आम आदमी पक्षाला २२ जागा मिळाल्या. तर काँग्रेसला एकही जागा मिळालेली नाही. यामुळे दिल्लीमध्ये भाजप सरकार स्थापन करणार हे स्पष्ट झालं आहे. निवडणुकीतील भाजपाच्या विजयामुळे राजकीय हालचालींना वेग आला असून लवकरच दिल्लीमध्ये नवीन सरकार स्थापन होण्याची शक्यता आहे.
दिल्ली सचिवालयात प्रवेश बंदीचे आदेश
आम आदमी पक्षाचा पराभव होताच दिल्लीच्या उपराज्यपाल व्ही. के. सक्सेना यांनी दिल्ली सचिवालयात प्रवेश बंदीचे आदेश दिले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, हे आदेश दिल्लीतील सरकारी कागदपत्रे आणि डेटाची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी देण्यात आले आहेत. आम आदमी पक्षाच्या १० वर्षांच्या सत्ताकाळातील निर्णय आणि संदिग्ध कागदपत्रांचा अभ्यास करण्यासाठी हे उपाय घेतले असल्याचे सांगितले जात आहे.
सचिवालयाच्या सुरक्षेसाठी अधिक कडक उपाययोजना करण्यात आली आहे. कोणत्याही व्यक्तींना सचिवालयात प्रवेश करण्यापूर्वी त्यांच्या ओळखीची आणि भेटीचा उद्देश पडताळणी करूनच प्रवेश दिला जाणार आहे.
दिल्लीतील सर्वांगीण विकास करणार - पंतप्रधान मोदी
दिल्ली विधानसभेच्या निकालानंतर भाजपकडून जल्लोष सुरू करण्यात आला. प्रधानमंत्री मोदी यांनी नेहमीप्रमाणे पक्ष कार्यालयात कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी त्यांनी 'आपला भ्रष्टाचारी आणि काँग्रेसला परजीवी म्हणत त्यांनी निशाणा साधला. तसेच दिल्ली विधानसभेच्या पहिल्या अधिवेशनात कॅगचा अहवाल मांडला जाईल आणि भ्रष्टाचाराची कसून चौकशी केली जाईल असे सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यमुनेच्या स्वच्छतेचे आश्वासन देताना म्हणाले, “हे काम कठीण, जास्त वेळ चालणार आहे. गंगा नदीचे काम राजीव गांधींच्या काळापासून सुरू आहे. कितीही वेळ लागला, कितीही शक्ती लागली तरीही यमुना नदीची सेवा करणार.” यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले.
ते पुढे म्हणाले, “, दिल्लीच्या जनतेने आज स्पष्ट केले आहे की दिल्लीचा खरा मालक जनताच आहे. ज्यांना दिल्लीचा मालक होण्याचा घमंड होता त्यांना दिल्लीने नाकारले. दिल्लीच्या जनादेशाने राजकारणामध्ये खोटेपणाला कोणताही थारा नाही, हे स्पष्ट केले. जनतेने आपच्या शॉर्टकटच्या राजकारणाचे शॉर्टसर्किट केले. दिल्ली फक्त एक शहर नाही तर दिल्ली हा लघु भारत आहे. एक भारत श्रेष्ठ भारताच्या विचाराला दिल्ली जगते. दिल्लीत दक्षिण भारत, पूर्व, पश्चिम भारत अशा सर्व भागातील लोक आहेत. दिल्ली विविधतेने नटलेल्या भारताचे लघुरूप आहे. याच दिल्लीने भाजपला प्रचंड आशीर्वाद दिला. दिल्लीचा सर्वांगीण विकास होईल आणि लोकांचे जीवन अधिक समृद्ध करण्यासाठी आम्ही कोणतीही कसर सोडणार नाही."
मनीष सिसोदिया आणि अरविंद केजरीवाल यांचा पराभव
दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाचे उमेदवार माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा पराभव झाला आहे. आम आदमी पार्टीसह सर्वांसाठीच हा मोठा धक्का आहे. पराभवावर प्रतिक्रिया देताना पक्षाचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले, “आम्ही पराभव स्वीकारला आहे. जनतेने दिलेल्या मताचा आम्ही अंदर करतो. त्यांनी आम्ही विरोधी पक्षाची जबाबदारी दिली आहे. ही जबाबदारी आम्ही नेटाने पार पाडू. तसेच सत्तेतून दूर राहत जनतेची सेवा करू.”
अण्णा हजारे फॅक्टर
दिल्ली निवडणुकीच्या वेळी अण्णा हजारे यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर आरोप केले होते. त्याचा फटका केजरीवाल यांना बसला आहे. आप च्या परभवावर बोलताना समाजसेवक अण्णा हजारे यांनी सांगितले, “ केजरीवाल यांची प्रतिमा दारुच्या मुद्द्यावरून खराब झाली. यामुळे त्यांना कमी मते मिळाली. निवडणुकीत उमेदवाराचे आचरण आणि चारित्र्य स्वच्छ असावे लागते.”
भाजपच्या विजयाची चर्चा: मुख्यमंत्री कोण?
भाजपाने दिल्लीमध्ये जोरदार विजय मिळवल्यानंतर मुख्यमंत्री पदावर कोणाला बसवले जाईल, यावर चर्चा सुरु झाली आहे. भाजप नेते प्रवेश वर्मा यांच्या नावाची सध्या बरीच चर्चा सुरु आहे. वर्मा यांनी 'आप'चे प्रमुख नेते आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा पराभव केला असून त्यांच्याकडे दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाचा प्रबळ दावेदार म्हणून पाहिलं जात आहे. प्रवेश वर्मा हे दिल्लीतील पंजाबी आणि जाट समुदायाचा प्रमुख चेहरा म्हणून ओळखले जातात. ते दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते साहिब सिंग वर्मा यांचे सुपुत्र आहेत.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -
Awaz Marathi WhatsApp Group
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter