'मुस्लीम पर्सनल लॉ'चा महाआघाडीला पाठिंबा

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 10 h ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय वातावरण तापले आहे. सत्ताधारी महायुती आणि विरोधी महाविकास आघाडी यांना पाठिंबा देणाऱ्या विविध संघटनांनी आपल्या भूमिका स्पष्ट केल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर, ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड या देशातील सर्वात मोठ्या मुस्लिम संघटनेने निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीला पाठिंबा जाहीर केला आहे.

ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डचे सदस्य मौलाना सज्जाद नोमानी यांनी 'मविआ' च्या २६९ उमेदवारांना समर्थन देत मुस्लिम समुदायाला आघाडीच्या उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे. तसेच, मराठा व इतर ओबीसी उमेदवारांसह २३ मुस्लिम उमेदवारांनाही समर्थन देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डच्या या निर्णयामुळे महाविकास आघाडीला मोठा राजकीय फायदा होण्याची शक्यता आहे. या निर्णयानंतर भाजपने महाविकास आघाडी आणि काँग्रेसवर निशाणा साधला आहे.

भाजपने काँग्रेसवर दुहेरी भूमिकेचा आरोप करत म्हटले की, 'बटेंगे तो कटेंगे' सारख्या घोषणांना काँग्रेस विरोध करते, परंतु मुस्लिम संघटनांकडून मिळणाऱ्या अशा पाठिंब्याला मात्र विरोध करत नाही. याआधी उलेमा बोडनिही महाविकास आघाडीला पाठिंबा दिला होता. आता ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या या घोषणेमुळे राज्यातील राजकीय वातावरण अधिक तापले आहे.

महाराष्ट्रात २८८ विधानसभेच्या जागांसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. अशा वेळी ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या पाठिंब्यामुळे मुस्लिम मतदार आघाडीच्या बाजूने एकत्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजप आणि महाविकास आघाडीत रंगलेली ही निवडणूक आणखी तीव्र होण्याची चिन्हे असून 'मुस्लिम पर्सनल'च्या भूमिकेमुळे निवडणुकीतील रंगत वाढली आहे.