राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. काल (२८ ऑक्टोबर) मातब्बर नेत्यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपआपल्या मतदारसंघात शक्तिप्रदर्शन करता उमेदवारी अर्ज दाखल केला. यानंतर उमेदवारी अर्ज दाखल करतानाचे फोटो सोशल मिडियावर फिरू लागले. यामध्ये चर्चा झाली ती अजित पवारांची. त्यामागे कारणदेखील तसेच होते. अजित पवारांचा उमेदवारी अर्ज भरताना यांच्यासोबत महिला भगिनी आणि पुरुषांमध्ये फक्त एक कार्यकर्ता दिसून आले. हे मुस्लिम कार्यकर्ते होते शौकत कोतवाल.
कोण आहेत शौकत कोतवाल
शौकत कोतवाल हे बारामतीतील सुपा गावाचे राहवासी आहेत. त्यांनी या गावाचे माजी सरपंच म्हणून आणि ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम केले आहे. याशिवाय त्यांनी बारामतीच्या मार्केट कमिटिचे सभापति म्हणून देखील काम पहिले आहे. सुप्यातील अजित पवारांचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे.
आवाज मराठीने शौकत कोतवाल यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणतात, “ मी एका गरीब घरातील अजितदादांचा सच्चा कार्यकर्ता आहे. गेल्या चाळीस वर्षांपासून मी अजितदादांसोबत आहे. त्यांनी राज्यातील आणि बारामती मतदारसंघातील मुस्लिम समाजाची भरपूर कामे केली आहेत. मुस्लिमांसाठी दफनभूमी आणि दर्गांच्या सुशोभीकरणाचे काम त्यांनीच केले आहे.”
ते पुढे म्हणतात, “ अजित पवार यांनी आठव्यांदा विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी अर्ज दाखल करताना त्यांनी माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला सोबत घेतले. याचा मला आणि समाजाला निश्चितच आनंद झाला आहे. त्या क्षणी मी भारावून गेलो होतो. गेल्या अनेक वर्षांपासून दादांसोबत काम केले त्याचे हे फळ आहे असे मी समजतो. कोणत्याही प्रकारचा जातिभेद न करता अजितदादा मुस्लिम समाजाचे काम करतात. यामुळे मुस्लिम समाजही त्यांच्या पाठीशी असतो.”
बारामतीतील सुप्याच्या दर्ग्याला तीर्थक्षेत्र म्हणून मान्यता...
बारामतीतील सुपा गावात हजरत ख्वाजा शाहमन्सूर आरीफ बिल्लाह यांचा दर्गा आहे. सुपा गावाचे ग्रामदैवत म्हणून या दर्गेकडे पहिले जाते. बारामती आणि आसपासच्या शहरातील भाविक मोठ्या संख्येने याठिकाणी येत असतात. गेल्या काही महिन्यांपूर्वी या दर्गाचा तीर्थ क्षेत्रामध्ये समावेश करण्यात आला. याविषयी बोलताना शौकत कोतवाल सांगतात, “ गेल्या वर्षभरात अजित पवार यांनी साधारणतः एक कोटी रुपयांचा निधी या दर्गाच्या कामासाठी दिला आहे. टप्याटप्याने हा निधी मिळाला असून यातूनच दर्ग्याच्या डागडुजीचे काम सुरू आहे.”
मुस्लिमांना सोबत घेण्याचा अजित पवारांचा प्रयत्न
अजित पवार हे सातत्याने मुस्लिम समाजाला सोबत घेण्याचे प्रयत्न करत आहेत. नुकतेच राज्य सरकारने मौलाना अबुल कलाम आझाद शिष्यवृत्ती योजनेचे पैसे वाढवले. तसेच मदारशांमधील शिक्षकांच्या पगारात देखील वाढ केली. त्यामध्ये अजित पवारांची मोठी भूमिका होती असे बोलले जाते. याशिवाय त्यांच्या पक्षाने इद्रीस नायकवडी यांना विधानपरिषदेवर संधी देत मुस्लिम समाजाची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला आहे.
येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत अल्पसंख्यांक विशेषतः मुस्लिम समाजाची मते निर्णायक ठरतील असे राजकीय विश्लेषक सांगतात. त्या अनुषंगाने मुस्लिम मते कशी मिळतील याचा विचार सर्वच नेतेमंडळी करत आहेत. बारामतीत मराठा आणि धनगर समाजाचे प्राबल्य आहे. परंतु अल्पसंख्यांक समाजाचेदेखील मोठे मतदान तिथे आहे. त्यामुळे अजित पवार यांचे धार्मिक आणि जातीय समीकरण जुळवण्याचा प्रयत्न यशस्वी होणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -
Awaz Marathi WhatsApp Group
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter