जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यासाठी AIMIM प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानवर कडाडून टीका केली. ओवैसी यांनी पाकिस्तानबद्दल बोलताना शहबाज शरीफ यांच्यावर निशाणा साधला आहे. काल २७ एप्रिलला बोलताना त्यांनी सांगितले की पाकिस्तान भारतापासून अर्ध्या शतकाने मागे आहे. याशिवाय ओवैसी यांनी पाकिस्तानची तुलना ISIS दहशतवाद्यांशी केली.
महाराष्ट्रातील परभणी येथे वक्फ (दुरुस्ती) कायद्याविरोधात जनसभेला संबोधित करताना ओवैसी यांनी हल्ल्यासाठी पाकिस्तानवर जोरदार हल्ला चढवला. पाकिस्तानी नेत्यांच्या धमक्यांनाही त्यांनी कचरा म्हटले आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले, "तुम्ही भारतापासून फक्त अर्धा तास मागे नाही, तर अर्ध्या शतकाने मागे आहात. तुमच्या देशाचे बजेटही आमच्या लष्करी बजेटच्या बरोबरीचेही नाही."
पाकिस्तान म्हणजे ISIS - ओवैसी
ओवैसी पुढे म्हणाले, "पाकिस्तान सतत सांगत असतो की त्यांच्याकडे अणुबॉम्ब आहेत. पण लक्षात ठेवा, दुसऱ्या देशात घुसून निष्पाप लोकांना मारले, तर कोणताही देश गप्प बसणार नाही. पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांना मारण्यापूर्वी त्यांचा धर्म विचारला. "
ते पुढे म्हणतात, "तुम्ही कोणत्या धर्माबद्दल बोलता? तुम्ही ख्वारिजपेक्षाही वाईट आहात. तुमचे हे कृत्य दाखवते की तुम्ही ISIS चे वारस आहात."
पाकिस्तान दहशतवाद्यांना प्रशिक्षण देते - ओवैसी
पाकिस्तान अनेक वर्षांपासून भारताला लक्ष्य करण्यासाठी दहशतवाद्यांना प्रशिक्षण देत आहे, असे ओवैसी म्हणाले. आंतरराष्ट्रीय कायदे भारताला पाकिस्तानच्या हवाई दलावर नाकेबंदी लादण्याची आणि हॅकर्सद्वारे त्यांचे इंटरनेट हॅक करण्याची परवानगी देतात, असेही त्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला आर्थिकदृष्ट्या कमकुवत करण्यासाठी पावले उचलावीत, अशी मागणीही त्यांनी केली.
कश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग - ओवैसी
ओवैसी म्हणतात, "कश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे. काही टीव्ही अँकर्स कश्मिरींविरुद्ध बोलतात ही बाब अतिश लज्जास्पद आहे. कश्मीर आपला अविभाज्य भाग असेल, तर कश्मिरीही आपले आहेत. त्यांच्यावर संशय कसा घेता? एका कश्मिरीने दहशतवाद्यांशी लढताना प्राण गमावले. दुसऱ्या कश्मिरीने जखमी मुलाला पाठीवर घेऊन ४० मिनिटे चालत त्याचा जीव वाचवला."