महाराष्ट्रात मुस्लीम आरक्षण आणि वक्फ बोर्डच्या प्रश्न आता जोर पकडताना दिसत आहे. असदुद्दीन ओवेसी यांचा पक्ष एआयएमआयएमने सोमवारी (२३ सप्टेंबर) छत्रपती संभाजीनगर ते मुंबईपर्यंत शक्तीप्रदर्शनात राष्ट्रध्वजासह तिरंगा संविधान रॅली काढली.
छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार इम्तियाज जलील, वारिस पठाण आणि आदी नेत्यांच्या नेतृत्वाखाली ही यात्रा काढण्यात आली. या रॅलीत इतर राजकीय आणि सामाजिक गटांसह, मुस्लिम समाजातील १२,००० हून अधिक लोकांचा सहभाग दिसून आला. नांदेड, मराठवाडासह महाराष्ट्रातील सर्व भागातील मुस्लीम तरुण या यात्रेत उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.
छत्रपती संभाजीनगरपासून निघालेली या रॅलीने मुंबईकडे प्रस्थान केले खरे, परंतु पोलिसांनी मुंबईत प्रवेश नाकारल्याने रॅली मुलुंड नाका येथे थांबवण्यात आली. मात्र, आंदोलकांनी शांततापूर्ण पद्धतीने तिथेच आपला निषेध नोंदवला आणि अधिकाऱ्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले.
छत्रपती संभाजीनगर येथून 'तिरंगा संविधान रॅली' नावाने सुरू झालेल्या या आंदोलनात मराठवाड्यातील विविध भागातून शेकडो वाहने समृद्धी द्रुतगती मार्गाने मुंबईच्या दिशेने गेली. संपूर्ण शहरात ३,००० हून अधिक अधिकाऱ्यांसह मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त आणि वाहतूक विभाग तैनात होता. यावेळी हजारोंमध्ये मोठी वाहने सहभागी झाली होती, ज्यात खाजगी बसेस आणि मिनी ट्रकचा समावेश होता. दलित आणि मराठा समाजातील कार्यकर्ते आणि इतर लहानमोठे पक्ष रॅलीत सामील झाले होते, ज्यामुळे या आंदोलनाचे स्वरूप आणखी व्यापक झाले
या रॅलीत इम्तियाज जलील यांनी रॅली दरम्यान शांततेचे आणि संविधानाच्या मूल्यांचे पालन करण्याचा संदेश दिला. रॅलीत सहभागी लोकांनी संविधान आणि राष्ट्रध्वजाच्या आधारावर राष्ट्रीय एकतेचा संदेश दिला. तसेच महाराष्ट्रातील महाराष्ट्रातील जाती आणि धर्माच्या आधारे वाढत चाललेल्या विभाजनाबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली. नितेश राणे यांच्या वादग्रस्त विधानांनंतर पोलिसांकडून कारवाई होत नसल्याचा त्यांनी निषेध केला आणि द्वेषयुक्त भाषण आणि जातीय तेढ रोखण्यासाठी कठोर कायदे करण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले.
मुंब्रा येथे पोहोचल्यानंतर मुंबईकडे जात असताना जलील म्हणाले, "आम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री (फडणवीस) यांना निवेदन देण्यासाठी मुंबईला जात आहोत, ज्यांच्याकडे गृहखात्याचाही कार्यभार आहे. आम्ही त्यांना आठवण करून देऊ की कायद्याचे रक्षण करणे त्यांचे कर्तव्य आहे. आमचा निषेध रामगिरी महाराज आणि नितेश राणे यांच्या विरोधात आहे, ज्यांच्यावर जातीय भावना भडकावल्याबद्दल आणि द्वेषपूर्ण भाषणांसाठी यापूर्वीच अनेक एफआयआर दाखल आहेत."