पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला प्रतिष्ठेच्या पद्म पुरस्कारांसाठी नामांकन प्रक्रियेत सक्रियपणे सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.त्यासाठी अधिकाधिक प्रेरणादायी व्यक्तींना नामांकित करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. यावर्षीच्या पद्म पुरस्कारांसाठी नामांकन प्रक्रिया १५ सप्टेंबरपर्यंत सुरु आहे. मोदींनी विशेषतः तळागाळातील हिरोंचे महत्त्व अधोरेखित केले, ज्यांच्या जीवनातील प्रवासाने असंख्य लोकांना प्रेरणा दिली आहे.
समाजासाठी महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या तळागाळातील नायकांचे कार्य सर्वांपुढे आणण्याच्या महत्त्वावर मोदी यांनी भर दिला.नामांकन प्रक्रियेच्या पारदर्शक आणि सहभागात्मक दृष्टिकोनावर भर देत आतापर्यंत प्राप्त झालेल्या नामांकनांच्या संख्येबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला आणि अधिकाधिक लोकांनी प्रतिष्ठित पद्म पुरस्कारांसाठी पात्र उमेदवारांना नामनिर्देशित करण्याचे आवाहन केले आहे.
एक्सवरील पोस्टमध्ये पंतप्रधान म्हणाले, “गेल्या दशकात,आपण तळागाळातील असंख्य नायकांना #PeoplesPadma ने सन्मानित केले आहे. सन्मानित व्यक्तींच्या जीवन प्रवासाने असंख्य लोकांना प्रेरणा दिली आहे.त्यांच्या गौरवशाली कार्यात त्यांची जिद्द आणि दृढ निर्धार स्पष्टपणे दिसून येतो.ही संपूर्ण प्रणाली अधिक पारदर्शक आणि सहभागात्मक बनवण्याच्या भावनेने, आमचे सरकार विविध पद्म पुरस्कारांसाठी इतरांना नामनिर्देशित करण्यासाठी जनतेला आमंत्रित करत आहे.अनेक नामांकने आली आहेत याचा मला आनंद आहे.नामांकने पाठवण्याची शेवटची तारीख १५ सप्टेंबर आहे. मी अधिकाधिक लोकांना पद्म पुरस्कारांसाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांची नावे सुचविण्याचे आवाहन करतो.तुम्ही हे awards.gov.in वर करू शकता.”
पद्म पुरस्कारांसाठी नामांकन प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि सहभागी बनवण्यासाठी सरकारने नागरिकांकडून नामांकने मागवण्याची ही पद्धत सुरू केली आहे. मोदींनी सांगितले की, अनेक लोकांनी नामांकने सादर केली आहेत, पण अजूनही अधिक लोकांनी या प्रक्रियेत सहभागी व्हावे. पद्म पुरस्कार हे भारतातील सर्वात मानाच्या नागरी पुरस्कारांपैकी एक आहेत आणि ते दरवर्षी प्रजासत्ताक दिनी जाहीर केले जातात.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -
Awaz Marathi WhatsApp Group
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter