अल्पसंख्यांक दिनाबद्दल शासनाने जनजागृती करावी मुस्लिम कार्यकर्त्यांचे मत

Story by  Fazal Pathan | Published by  Fazal Pathan • 2 h ago
प्रातिनिधिक चित्र
प्रातिनिधिक चित्र

 

येत्या दि. १८ डिसेंबर २०२४ला संपूर्ण जगभर अल्पसंख्यांक हक्क दिन साजरा करण्यात येणार आहे. या दिवसाचे औचित्य साधून अल्पसंख्यांकांच्या अधिकाराची माहिती त्यांना देणे आवश्यक आहे.  या अनुषंगाने राज्यासह देशातील मुस्लिम कार्यकर्त्यांनी शासकीय पातळीवर मोठ्या प्रमाणात अल्पसंख्यांक हक्क दिन साजरा करण्यात यावा, अशी मागणी केली आहे. तसेच अल्पसंख्यांक दिन साजरा न झाल्यास प्रतीकात्मक आंदोलन करण्याचा इशारादेखील  दिला आहे.   

अल्पसंख्यांक समाजाच्या सांविधानिक हक्कांचे रक्षण करण्यासाठी अल्पसंख्यांक  दिनं साजरा केला जातो.  अल्पसंख्याक समाजासाठी शासनाने अमलात आणलेल्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती व त्यांचा लाभ कसा मिळवता येतो, याबाबत माहिती देण्यात येते. अल्पसंख्याक समाजातील लोकांना शासकीय योजनांचा लाभ घेताना आलेल्या अडचणी सोडवण्यासाठी या दिवशी मार्गदर्शन केले जाते. मुस्लिम समाजात विविध शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोचवून समाजाला प्रगतिपथावर नेण्यासाठी शासन सहकार्य आवश्यक आहे, असे मत मुस्लिम समाजातील काही मान्यवरांनी व्यक्त केले. 

अल्पसंख्यांकांना शासकीय योजनांची माहिती आवश्यक 
अल्पसंख्यांक आयोग राज्य आणि राष्ट्र या दोन्ही पातळीवर काम करत आहे. केंद्र आणि राज्य सरकार अल्पसंख्यांकांसाठी अनेक योजना राबवत असते. अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, मौलाना अबुल कलाम आझाद महामंडळाद्वारे आर्थिक सहकार्य, मदरसा आधुनिकीकरण, शैक्षणिक संस्थांमध्ये पायाभूत सुविधा योजना, उच्च शिक्षण घेणाऱ्यांसाठी वसतिगृहे, सूक्ष्म पतपुरवठा योजना यांसारख्या अनेक  योजनांचा यात समावेश आहे. मात्र तरीही त्याचा म्हणावा तितका लाभ अल्पसंख्यांक विशेषतः मुस्लिम समाजाला होत नाही. अनेकांना तर या योजनाच माहिती नाहीत. 

अल्पसंख्याक समाजासाठी राबवल्या जाणाऱ्या योजनांची माहिती देण्यासाठी, त्यांच्या अधिकाराचे रक्षण करण्यासाठी अल्पसंख्यांक दिन सर्व स्तरावर साजरा व्हायला हवा. शासकीय योजनांचा लाभ घेताना मुस्लिम समाजातील नागरिकांना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी, विविध योजनांची माहिती देण्यासाठी शासनाने जनजागृती करण्याची गरज आहे.  

याविषयी बोलताना अल्पसंख्याक आयोगाचे सदस्य वसीम बुरहान म्हणतात, “शासनाने अल्पसंख्यांक समाजासाठी अल्पसंख्यांक आयोगाची स्थापना केली आहे. अल्पसंख्यांक विशेषतः  मुस्लिम समाजाने विविध शासकीय योजनांची माहिती घ्यावी. अल्पसंख्याक समाजासाने सरकारी योजनांचा लाभ घेतल्यास नक्कीच अल्पसंख्याक समाजाला प्रगतीची दिशा मिळेल.” 

सामाजिक कार्यकर्ते रफिक सय्यद म्हणतात, “मुस्लिम समाजातील विद्यार्थी, उद्योजक आणि व्यावसायिकांसाठी शासन अर्थसाहाय्य करत आहे. तसेच विविध सवलती मिळवण्यासाठी कौशल्य विकासासाठी रोजगाराभिमुख प्रशिक्षण, मौलाना आर्थिक विकास महामंडळ, शैक्षणिक कर्ज योजना अशा इतर अनेक योजना राबवत आहे. या योजनांचा लाभ मिळवताना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी अनेकांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही. जर सर्व स्तरावर अल्पसंख्यांक दिन साजरा झाला तर ते मार्गदर्शन मिळण्यात मदत होईल.” 
 
अल्पसंख्यांक दिनाविषयी बोलताना सामाजिक कार्यकर्ते रमीज शेख म्हणतात, “अल्पसंख्याक हक्क दिन हा अतिशय महत्त्वाचा  दिवस आहे. मोठ्या प्रमाणात जर अल्पसंख्यांक दिन साजरा झाला तर वैयक्तीक तसेच समाजाची प्रगती साधण्यासाठीच्या योजनांचा लाभ मिळवताना येणारे अडथळे दूर करण्यासाठी मदत मिळेले. तसेच मुस्लिम समाजाला या दिवसाचे महत्व समजण्यासाठी शासनाने जनजागृती करण्याची गरज आहे.”

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter