निवडणूकीनिमित्त दिग्गज नेत्याचा महाराष्ट्रात मुक्काम

Story by  आवाज़ मराठी | Published by  Pradnya Shinde • 18 h ago
निवडणूकीनिमित्त दिग्गज नेत्याचा महाराष्ट्रात मुक्काम
निवडणूकीनिमित्त दिग्गज नेत्याचा महाराष्ट्रात मुक्काम

 

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुण्यात सभा होणार असून, त्यासाठी भाजपने तयारी सुरू केली आहे. ही सभा १२ नोव्हेंबरला स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर होणार आहे.

विधानसभा निवडणुकीचे अर्ज भरल्यानंतर आता बंडखोरांना माघारीसाठी तयार करण्याचे प्रयत्न सर्वच राजकीय पक्षांकडून सुरू आहेत. चार नोव्हेंबरनंतर खऱ्या अर्थान प्रचाराला सुरुवात होणार आहे. यावेळी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपकडून राष्ट्रीय स्तरावरचे नेते राज्याच्या विविध भागांत सभा घेणार आहेत. पंतप्रधान मोदी राज्यभरात सुमारे १० सभा घेणार आहेत. त्यातील एक सभा पुणे शहर व जिल्ह्यातील उमेदवारांसाठी होणार आहे. १२ नोव्हेंबरला ही सभा पुण्यात होण्याची शक्यता आहे. त्यासाठी स्थान निश्चिती करणे व अन्य तयारीला सुरुवात केली असल्याचे भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

प्रस्तावित सभा
पंतप्रधान नरेंद्र मोदी-८
अमित शहा-२०
नितीन गडकरी- ४०
देवेंद्र फडणवीस -५०
चंद्रशेखर बावनकुळे-४०
योगी आदित्यनाथ- १५

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आज ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली. पक्षाच्या प्रचाराची भिस्त प्रामुख्याने पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्यावर असेल.

स्टार प्रचारकांमध्ये प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात तसेच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा समावेश आहे. माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे राष्ट्रीय प्रमुख राहिलेले दलित नेते नितीन राऊत यांना मात्र या यादीत स्थान मिळालेले नाही.

काँग्रेसतर्फे ४० स्टार प्रचारकांची यादी निवडणूक आयोगाला मंगळवारी कळविण्यात आली. या यादीमध्ये काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी, संघटना सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल, राज्याचे प्रभारी रमेश चेन्नीथला, विभागनिहाय निरीक्षक म्हणून नियुक्ती झालेले माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत, सरचिटणीस मुकुल वासनिक, अविनाश पांडेय, छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल, पंजाबचे माजी मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी यांचा त्यात समावेश आहे. या व्यतिरिक्त कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, तेलंगणचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी, सचिन पायलट, रणदीप सुरजेवाला, कन्हैय्याकुमार, जिग्नेश मेवानी, सलमान खुर्शिद, महिला कॉंग्रेसच्या अध्यक्षा अलका लांबा तसेच अन्य नेत्यांनाही पक्षाने प्रचारासाठी सांगितले आहे. मुंबई प्रदेश काँग्रेसच्या प्रमुख वर्षा गायकवाड, खासदार प्रणिती शिंदे, इम्रान प्रतापगढी, सतेज पाटील, नसीम खान, विलास मुत्तेमवार, भाई जगताप, विश्वजीत कदम, अमित देशमुख हे देखील स्टार प्रचारक असतील.

भाजपकडून आधीच घोषणा
भाजपने याआधीच राज्यातील विधानसभा स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. या यादीत पंतप्रधान
नरेंद्र मोदी, भाजपचे अध्यक्ष जे.पी नड्डा, गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथसिंह, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान, आसामचे मुख्यमंत्री हिमांता विश्व सरमा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह ४० नेत्यांच्या नावांचा या यादीत समावेश आहे. दिवाळीनंतर पंतप्रधान मोदींच्या राज्यभरात प्रचारसभा होणार आहेत.

राहुल गांधी सहा नोव्हेंबरला राज्यात
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे व विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे येत्या ६ नोव्हेंबरला महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत. त्याच दिवशी सकाळी नागपूर येथे संविधान सन्मान संमेलन आयोजित करण्यात आले असून सायंकाळी मुंबईतील बीकेसीत महाविकास आघाडीची गॅरंटी जाहीर केली जाणार आहे. या कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील उपस्थित राहणार आहेत.