हाथरसमध्ये प्रमाणापेक्षा तिप्पट गर्दीमुळे झाली चेंगराचेंगरी

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 4 d ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

भोले बाबा ऊर्फ साकार हरी नारायण यांच्या सत्संगानंतर झालेल्या चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या १२१ झाली असल्याचे उत्तर प्रदेश पोलिसांनी आज सांगितले. या प्रकरणी आयोजकांविरोधात ‘एफआयआर’ची नोंद झाली आहे. केवळ ८० हजार जणांसाठी परवानगी दिली असताना त्या मर्यादित जागेत प्रत्यक्षात अडीच लाख लोक जमा झाले होते, असे उघडकीस आले आहे. पुरावे लपविणे आणि वस्तुस्थिती लपवून ठेवणे, असे आरोप आयोजकांवर ठेवण्यात आले आहेत.

फुलराई गावात झालेल्या चेंगराचेंगरीनंतर घटनास्थळी आणि रुग्णालयांच्या आवारात मृतांचे नातेवाईक आक्रोश करत होते. काही मृतदेहांची ओळख पटलेली नाही. अनेक लोक मृतांमध्ये आपले कोणी नाही ना, याचा शोध घेत होते. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जखमींची रुग्णालयात जाऊन विचारपूस केली आणि त्यांच्याकडून माहिती घेतली. मृतांची संख्या १२१ झाली असून त्या महिलांची संख्या ११० हून अधिक आहे. मंगळवारी चेंगराचेंगरीनंतर घटनास्थळावर मृतदेहांचे ढीग दिसत होते, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या घटनेत जखमी असलेल्यांची संख्या २८ असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिले आहेत.

पोलिसांनी आयोजकांविरोधात गुन्ह्याची नोंद केली असली तरी प्रवचनकार साकार हरी नारायण यांचे नाव ‘एफआयआर’मध्ये नाही. तक्रारीत मात्र त्यांचे नाव आहे. घटनेनंतर ते फरारी आहेत. त्यांच्या निवासस्थानाभोवती पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सत्संगासाठी परवानगी घेताना आयोजकांनी किती भाविक येतील, याबाबत जाणूनबुजून चुकीची माहिती दिली, असा आरोप ‘एफआयआर’मध्ये करण्यात आला आहे. आयोजकांनी केवळ ८० हजार जणांसाठी परवानगी घेतली होती. प्रत्यक्षात प्रवचनाला अडीच लाख लोक आले होते. वाहतूक नियमनातही आयोजकांनी साह्य केले नाही आणि घटनेनंतर अनेक पुरावे लपवून ठेवले, असा आरोप ठेवण्यात आला आहे. ‘एफआयआर’मध्ये पोलिस आणि प्रशासनावर कोणताही ठपका ठेवलेला नाही.

आरोपी व कलम
‘एफआयआर’मध्ये आयोजक असलेल्या मुख्य सेवादार देवप्रकाश मधुकर आणि इतर आयोजकांचे नाव आहे. भारतीय न्याय संहिता कलम १०५ (सदोष मनुष्यवध), कलम ११० (सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न), कलम १२६ (२) (बेकायदा ताबा), कलम २२३ (प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग) आणि कलम २३८ (पुरावे नष्ट करणे) याअंतर्गत गुन्ह्याची नोंद झाली आहे.
 
चेंगराचेंगरीमागील कारण
जखमी भाविक आणि प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी दोन वाजता प्रवचन देऊन भोले बाबा त्यांच्या मोटारीतून परतत असताना त्या मोटारीच्या मागे अनेक जण धावले. अनेकजण त्यांच्या पायाखालची माती गोळा करण्यासाठी वाकले. यावेळी गर्दीचा जोर प्रचंड असल्याने माती गोळा करण्यासाठी खाली वाकलेले लोक इतरांच्या धक्क्याने पडले आणि इतर लोंढा त्यांच्या अंगावरून पुढे जात राहिला. या गर्दीतून बाहेर पडण्याचा काही जणांनी प्रयत्न केला. मात्र, भोले बाबांच्या सेवेकऱ्यांनी त्यांच्या हातातील काठीने लोकांना रोखून धरले. त्यामुळे लोक दबले गेले.