पृथ्वीवरील नंदनवन शांती आणि सौहार्दाच्या दिशेने अग्रेसर - पंतप्रधान मोदी

Story by  आवाज़ मराठी | Published by  Saurabh Chandanshive • 1 Months ago
पंतप्रधान नरेंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी

 

भारतानं पाकिस्तानविरुद्ध झालेल्या कारगिल युद्धात विजय मिळवला होता, याला आज २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्त जम्मू आणि काश्मीरच्या द्रास इथं कारगिल वॉर मेमोरियलला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी शहीदांना आदरांजली वाहिली तसंच पाकिस्तानला एक इशाराही दिला.

जम्मू आणि काश्मीर राज्याला विशेष राज्याचा दर्जा देणारं कलम ३७० हटवण्याला आता पाच वर्षे पूर्ण झाली आहेत. पण इथल्या दहशतवादी कारवाया थांबलेल्या नाहीत, सातत्यानं इथं अनेकदा दहशतवादी हल्ले होत आहेत. यामध्ये भारतीय जवानांना हौतात्म पत्करावं लागत आहे. यापार्श्वभूमीवर आज द्रास इथं बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला मोठा इशारा दिला आहे.

कारगिल वॉर मेमोरिअल येथे झालेल्या मेळाव्याला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारताने 25 वर्षांपूर्वी कारगिल युद्ध केवळ जिंकलं नाही, तर 'सत्य, संयम आणि सामर्थ्या'चं दर्शन घडवलं आहे. भूतकाळातील सर्व नापाक प्रयत्नांमध्ये पाकिस्तान अयशस्वी ठरला होता, पण आता दहशतवाद आणि प्रॉक्सी अर्थात तिसऱ्याच्या मदतीनं भारताविरुद्ध कारस्थानं करण्याचा प्रयत्न करत आहे.

पाकिस्तान आपल्या इतिहासातून काहीही शिकलेला नाही. आज मी अशा ठिकाणाहून बोलत आहे जिथं दहशतवादाचे सूत्रधार थेट माझा आवाज ऐकू शकतील. मला दहशतवादाच्या या समर्थकांना सांगायचे आहे की, त्यांचे नापाक इरादे कधीच सफल होणार नाहीत. आमचे सैनिक दहशतवादाला चिरडून टाकतील. पूर्ण ताकदीने शत्रूला चोख प्रत्युत्तर दिलं जाईल, असंही पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.
 
काश्मीर आणि कलम ३७० कलमाविषयी काय म्हणाले पंतप्रधान?
यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले, "विकासाच्या मार्गात येणाऱ्या प्रत्येक आव्हानाला भारत पराभूत करेल. काही दिवसांतच म्हणजे ५ ऑगस्टला कलम ३७० रद्द होऊन ५ वर्षे पूर्ण होतील. आता जम्मू आणि काश्मीर नव्या भविष्याविषयी बोलत आहे, मोठ्या स्वप्नांबद्दल चर्चा करत आहे... लडाख आणि जम्मू-काश्मीरमध्ये पायाभूत सुविधांच्या विकासाबरोबरच पर्यटनाचाही विकास झाला आहे. काश्मीरमध्ये अनेक दशकांनंतर सिनेमा हॉल सुरू झाला आहे.  पस्तीस वर्षांनंतर प्रथमच श्रीनगरमध्ये मोहरमच्या ताजियाची मिरवणूक काढण्यात आली. पृथ्वीवरील नंदनवन वेगाने शांतता आणि सौहार्दाकडे वाटचाल करत आहे..."