पश्चिम बंगालमधील 'जमात-उल-रईन' या मुस्लिम संघटनेने आयोजित केलेला सामुदायिक विवाहसोहळा
देशात धार्मिक सौहार्दाच्या आणि एकेतेचे दर्शन घडवणाऱ्या अनेक घटना घडत असतात. नुकतीच पश्चिम बंगालमध्ये एक एकतेचा संदेश देणारी घटना घडली आहे. मुस्लिम बहुल व्यापारिक संघाने पाच हिंदू मुलींच्या सामूहिक विवाहाचे आयोजन केले. यामुळे सामाजिक सहयोग आणि एकतेचे दर्शन घडले. मुस्लिम बहुल संघाने विवाहसोहाळ्यांमध्ये हिंदू परंपरा जपली जाईल याचे विशेष लक्ष दिले होते. हिंदू परंपरेनुसार विवाह सोहळे पार पडले.
सामाजिक एकता आणि बंधुभावाला प्रोत्साहन देण्यासाठी पश्चिम बंगालच्या 'जमात-उल-रईन' या मुस्लिम संघाने विवाहसोहळ्याचे आयोजन केले होते. यावेळी त्यांनी परिसरातील पाच गरीब हिंदू मुलींची निवड केली. या मुलींचे कुटुंब लग्नाचा खर्च उचलू शकत नव्हते. त्या पाच हिंदू मुलींचा सामूहिक विवाह करून मुस्लिम संघाने त्यांच्या कुटुंबाला आधार देण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच हे कार्य करून त्यांनी प्रेमाचा आणि ऐक्याचा संदेश दिला आहे.
हिंदू मुलींच्या विवाहसोहळ्यानिमित्त या मुस्लिम संघटनेने मच्छवा फूल मंडी येथील त्यांची दुकाने बंद ठेवली होती. विवाहसोहळ्याचे आयोजन करण्याचे या संस्थेचे दुसरे वर्ष आहे. 'जमात-उल-रईन' ही मुस्लिम संघटना गेल्या अनेक वर्षांपासून समाज उपयोगी कार्यक्रम घेत आहेत. निराधारांना आधार देणे, कोणताही जात धर्म न पाहता मुलींच्या शिक्षणासाठी, लग्नासाठी मदत करण्याचे काम ही संघटना करते. तसेच इतरही उपक्रम या संघटनेच्या वतीने घेतले जातात.
लग्न झालेल्या या मुलींना मुस्लिम संघटनेच्या वतीने ‘भगवत गीता’, कपाट, कपडे, भांड्यांसह नवविवाहितांना लागणाऱ्या सर्व आवश्यक गोष्टी देण्यात आल्या आहेत. या लग्नात व्यापारी, समाजसेवक आणि विविध धार्मिक समुदायाचे लोक उपस्थित होते. या संघटनेने उपस्थितांसाठी स्नेहभोजनाची देखील व्यवस्था केली होती.
याविषयी बोलताना जमात-उल-रईन संघाचे अध्यक्ष मोहम्मद सोहराब म्हणतात, “आम्ही समाजात एकता आणि बंधुभाव वाढवण्यासाठी सकारात्मक पाऊले उचलत आहोत. समाजाला सध्या प्रबोधनाची गरज आहे. आमच्या संघटनेत आमचे काही हिंद भाऊ देखील आहेत. आम्ही सर्वजण मिळून समाजकार्य करत असतो. सामूहिक विवाहाच्या आयोजनात कोणत्याही धर्मात न अडकता आम्ही निराधार मुलींचा विचार करतो. त्यांना एक चांगले सुखकर आयुष्य देण्यासाठी परायत्न करतो. यामुळे आम्हाला आनंद आणि समाधान मिळते.”
पुढे ते म्हणतात, “सुरुवातीला आमच्या संघटनेत फक्त मुस्लिम नागरिक होते. परंतु आमचे कार्य बघून हिंदू बांधव देखील आमच्या सोबत आले. आम्हाला हिंदू धर्माबद्दल आदर आहे. त्यांच्या सोबत येण्याने सर्वसमावेशक अशी आमची संघटना झाली. आता आम्ही सर्वजण समाजकार्यात योगदान देतो.”
या मुलींचा झाला विवाह
-
अनुश्री मिस्त्री यांचा विवाह प्रणय मंडल यांच्याशी झाला.
-
सुजाता घोष यांचा विवाह बेला दुर्गा नगर येथील व्यक्तीसोबत झाला.
-
सोनाली सरदार यांचा विवाह चित्तरंजन बयान यांच्याशी झाला.
-
वली मौमिता सिंह यांचा विवाह दिलीप कोला यांच्याशी झाला.
-
ललिता मिस्त्री यांचा विवाह कृष्णकांत भुइयां यांच्याशी झाला.
या विवाहसोहळ्याविषयी बोलताना संस्थेचे सदस्य म्हणतात, “मुस्लिम आणि हिंदू दोन्ही समुदायातील गरीब लोक त्यांच्या मुलींच्या लग्नाचा खर्च घेऊ शकत नाही. त्यामुळे असे कार्यक्रम आयोजित होणे गरजेचे आहे. या उपक्रमांच्या मध्यमातून सर्व जाती धर्मातील गरजूंना मदत मिळते.”
संस्थेतील इतर सदस्यही या विवाहसोहळ्यात सहभागी झाले होते. यामध्ये मुहम्मद अकरम, मुहम्मद मुमताज, शाहिद अहमद खान, बिलाल अहमद, आमिर इश्तियाक, संजय सरकार उपस्थित होते. संस्थेच्या पुढील कामाविषयी माहिती देताना संजय सरकार म्हणाले, “आम्ही गेल्या काही वर्षांपासून काम करत आहे. परंतु ही आमची फक्त सुरुवात आहे. भविष्यात विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम आम्ही राबवणार आहोत. या कार्यक्रमांचा उद्देश समाजाच्या विविध वर्गांना एकत्र आणून, त्यांना धर्म, जात, आणि पंथाच्या पलीकडे जाऊन मदत करण्याचा आहे.”
पश्चिम बंगालमधील ही मुस्लिम संघटना समाजातील एकतेला प्राथमिकता देत आहे. हिंदू आणि मुस्लिम बांधवांना एकत्र आले समाजातील एकता आणखी मजबूत होईल. मोठ्या प्रमाणात समाजकार्य होऊ शकते. या संघटनेच्या वतीने आयोजित उपक्रम राज्याच्या आणि देशाच्या विविध भागात राबवले गेले पाहिजे. यामुळे धार्मिक भेदभाव कमी होईल आणि सामाजिक भान जपले जाईल.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -
Awaz Marathi WhatsApp Group
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter