गडचिरोलीत नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई

Story by  आवाज़ मराठी | Published by  Saurabh Chandanshive • 1 Months ago
छत्तीसगड बोर्डर
छत्तीसगड बोर्डर

 

नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई करताना सुरक्षा जवानांनी आज चकमकीमध्ये बारा नक्षलवादी ठार झाले. महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील जंगलात आज दुपारी दोनच्या सुमारास झालेल्या या चकमकीत एक उपनिरीक्षक जखमी झाले. जवानांच्या सी-६० पथकाच्या या यशाबद्दल राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाधान व्यक्त केले आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील जारावंडी क्षेत्रांतर्गत येत असलेल्या जंगल परिसरात सी-६० पथकाचे जवान आणि पोलिस नक्षलविरोधी अभियान राबवित होते. यावेळी इंटला गावाजवळील जंगलात लपून बसलेल्या नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार सुरू केला. सुरक्षा जवानांनी तातडीने प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली. यावेळी जोरदार चकमक होऊन बारा नक्षलवादी मारले गेल्याचे पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी सांगितले. या चकमकीत एक पोलिस उपनिरीक्षक जखमी झाले. त्यांना उपचारासाठी नागपूर येथे हलविण्यात आले आहे.

मारल्या गेलेल्या बारा नक्षलवाद्यांपैकी दोघांची ओळख पटली आहे. टिपागड (ता. कोरची) दलमच्या विभागीय समितीचे सदस्य लक्ष्मण आत्राम, विशाल आत्राम यांचा समावेश आहे. बाकीच्या दहा नक्षलवाद्यांची ओळख पटली नसून ती पटविण्याचे काम सुरु आहे.

सहा तास सुरु होते थरारनाट्य
जवान व नक्षलवाद्यांमध्ये दुपारी सुरू झालेली चकमक रात्री आठवाजेपर्यंत, म्हणजे सुमारे सहा तास सुरू होती. या थरारनाट्यानंतर परिसरात शोधमोहिम घेतली असता बारा नक्षलवाद्यांचे मृतदेह आढळून आले. जवानांनी घटनास्थळावरून तीन एके-४७ रायफली, दोन बंदुका, एक कार्बाईन, एक एसएलआर, सात स्वयंचलित शस्त्रे हस्तगत केली.

५१ लाखांचे बक्षीस
नक्षलविरोधी कारवाईदरम्यान मागील काही वर्षांत झालेली ही सर्वांत मोठी चकमक असून गडचिरोली पोलिसांच्या कामगिरीची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशंसा केली आहे. त्यांनी सी- ६० जवानांना ५१ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.