देशभरात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. यंदाच्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रबोवो सुबियांतो उपस्थित राहिले. हे भारतीय-इंडोनेशियन संबंधांच्या दृढतेचे प्रतीक होते. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय युद्ध स्मारकाला भेट देऊन पुष्पहार अर्पण करत शहिदांना आदरांजली वाहिली. त्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू राष्ट्रध्वज फडकवून प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याची सुरुवात केली. यावेळी राज्यपाल, केंद्रीय मंत्री, वरिष्ठ अधिकारी आणि हजारो नागरिक उपस्थित होते.
दरवर्षी स्वातंत्र्य आणि प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने दिल्लीतील कर्तव्य पथावर पथसंचलन केले जाते. यावर्षी देखील कर्तव्यपथावर आज १६ राज्य, केंद्रशासित प्रदेश, तसेच केंद्र सरकारच्या १० मंत्रालयांनी आपले चित्ररथ सादर केले. कर्तव्यपथावर सादर केलेले चित्ररथ विविध राज्यांच्या सांस्कृतिक धरोहरांचा, विविधतेत एकतेचा आणि भारताच्या विविधतेतील ऐतिहासिक महत्त्वाचा प्रतिकात्मक प्रदर्शन होते. यावेळी भारताच्या एकात्मतेचे आणि बहुलतेचे विशेष दर्शन घडले.
त्याचबरोबर, कर्तव्यपथावरील संचलनात इंडोनेशियाचे मार्चिंग पथक आणि बँड पथकदेखील सहभागी झाले होते. या सहभागाने भारतीय-इंडोनेशियन मैत्रीला एक नवा आयाम दिला. यावेळी इंडोनेशियाच्या विविध लष्कर दलातील १९० अधिकारी, सैनिक उपस्थित होते. हे भारत-इंडोनेशिया सहकार्याचे प्रतीक बनले आणि दोन देशांमधील दीर्घकालीन सामरिक, सांस्कृतिक आणि राजनैतिक संबंधांचे महत्व अधोरेखित केले.
मोदींनी दिल्या शुभेच्छा
युद्ध स्मारकावर आदरांजली वाहिल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कर्तव्यपथावर स्वागत करण्यात आले. पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात ७६ व्या प्रजासत्ताक दिनाच्या सर्व भारतीय नागरिकांना शुभेच्छा दिल्या. त्यांनी यासंदर्भात सोशल मिडियावर एक विशेष पोस्टही केली. ते म्हणाले, “आज आपण प्रजासत्ताक म्हणून ७५ गौरवशाली वर्षे साजरी करत आहोत. आपली विकासयात्रा लोकशाही, प्रतिष्ठा आणि ऐक्याच्या मूल्यांवर आधारलेली असेल, हे सुनिश्चित करणाऱ्या सर्व संविधान निर्मात्यांना यानिमित्त आम्ही वंदन करतो. हा राष्ट्रीय उत्सव आपल्याला संविधानातील मूल्यांचे संरक्षण करण्याच्या आणि एक बलशाली व समृद्ध भारतासाठी काम करण्याच्या आपल्या प्रयत्नांना बळकटी देवो.”
पंतप्रधानांनी प्रजासत्ताकदिनाचे फोटो केले शेअर
प्रजासत्ताक दिन पार पडल्यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काही फोटो त्यांच्या सोशल मिडियावर शेअर केले. फोटो शेअर करताना मोदी म्हणाले, “प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आपल्या राज्यांच्या समृद्ध परंपरांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आकर्षक चित्ररथातून भारताच्या विविधतेतील एकतेचे जिवंत दर्शन जगाने पहिले आहे. तसेच परेडमधून सांस्कृतिक वारसा आणि लष्करी सामर्थ्याचे दर्शन घडले. कर्तव्य पथावरील ही सकाळ खरोखरच संस्मरणीय होती.”
प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने झालेल्या लष्करी संचलनामध्ये लष्करी शौर्य आणि समृद्ध सांस्कृतिक वारसा यांचा अनोखा संगम देशवासियांना पाहायला मिळाला. भारताच्या सामर्थ्याचे आणि प्रगतीचे प्रतीक असलेल्या तंत्रज्ञानाचे आणि लष्करी साधनांचे प्रदर्शन देखील यात केले गेले. 'ब्रह्मोस', 'पिनाक' आणि 'आकाश' यासारख्या काही अत्याधुनिक संरक्षण साधनांद्वारे आपल्या लष्करी सामर्थ्याची ओळख जगाला करून दिली. यामुळे भारतीय संरक्षण क्षेत्रात होणाऱ्या प्रगतीचे आणि आत्मनिर्भरतेचे संकेत मिळाले. याशिवाय, लष्कराची युद्ध पाळत यंत्रणा ‘संजय’ तर डीआरडीओची जमिनीवरून जमिनीवर मारा करणारी ‘प्रलय’ यासारखी क्षेपणास्त्रे देखील यावेळी सादर करण्यात आली. हे सर्व आपल्या लष्करी सामर्थ्याचे द्योतक ठरले.