केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज (१ फेब्रुवारी) यंदाचा अर्थसंकल्प सादर केला. यावर राजकीय वर्तुळातून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. या अर्थसंकल्पावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही प्रतिक्रिया दिली आहे. पंतप्रधान मोदींनी या अर्थसंकल्पाचे स्वागत करताना म्हटले, "हा अर्थसंकल्प प्रत्येक भारतीयाची स्वप्ने पूर्ण करणारा आहे. या बजेटमुळे देशातील नागरिकांची बचत वाढणार असून, सर्वसामान्य नागरिकांसाठी अनेक फायदे होणार आहेत.”
पंतप्रधान मोदी म्हणाले, "साधारणपणे बजेटचा फोकस सरकारच्या खजिन्यात कशी वाढ होईल यावर असतो. पण हा अर्थसंकल्प त्याच्या अगदी उलट आहे. हा अर्थसंकल्प देशाच्या नागरिकांचा खिसा कसा भरणार आहे. हा अर्थसंकल्प सामान्य माणसाला सशक्त करणारा आहे.”
आत्मनिर्भर भारताला गती मिळेल
पंतप्रधान मोदींनी अर्थसंकल्पावर बोलताना सांगितले, आत्मनिर्भर भारताच्या स्वप्नाला गती मिळवण्यासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय या बजेटमध्ये आहेत. यामध्ये शिप बिल्डिंग आणि पर्यटन क्षेत्राला दिलेले प्रोत्साहन तसेच ५० महत्त्वाच्या पर्यटन स्थळांवर हॉटेल्स तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे रोजगाराच्या संधी निर्माण होतील आणि देशातील इन्फ्रास्ट्रक्चरला बळ मिळेल.
शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या घोषणा
पंतप्रधान मोदींनी बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या घोषणा केल्याचेदेखील सांगितले. ते म्हणाले, "पीएम धनधान्य कृषी योजनेत १०० जिल्ह्यांमध्ये सिंचन आणि इन्फ्रास्ट्रक्चरचा विकास केला जाईल. तसेच, किसान क्रेडीट कार्डची लिमिट ५ लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.”
मध्यमवर्गीयांसाठी मोठा दिलासा
या अर्थसंकल्पात मध्यमवर्गीयांसाठी महत्त्वाची घोषणा केली गेली आहे. १२ लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असलेल्या व्यक्तींना करमुक्त करण्यात आले आहे. याशिवाय गिग वर्कर्ससाठी ई-श्रमकार्डाची नोंदणी करण्यात येणार आहे. यामुळे त्यांना आरोग्य सुविधा आणि इतर योजना मिळतील.
रोजगार आणि गुंतवणुकीला चालना
पंतप्रधान मोदींनी बजेटमध्ये रोजगाराच्या संधींना महत्त्व दिल्याचे सांगितले. यामुळे देशात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आकर्षित होईल आणि विकासाची गती वाढेल. "या बजेटामुळे सर्वसामान्य नागरिकांची बचत वाढेल आणि त्यांना आर्थिक सशक्तता मिळेल," असे पंतप्रधान म्हणाले.
भारताच्या विकासाच्या प्रवासात महत्त्वाचा टप्पा
पंतप्रधान मोदींनी या अर्थसंकल्पाला "भारताच्या विकासाच्या प्रवासातील महत्त्वाचा टप्पा" म्हणून संबोधले. "हा अर्थसंकल्प देशातील १४० कोटी नागरिकांची स्वप्ने पूर्ण करणारा आहे. यामुळे प्रत्येक भारतीयाचा आत्मविश्वास वाढेल आणि आत्मनिर्भर भारताचे ध्येय साध्य होईल," असे त्यांनी सांगितले.
महत्त्वाच्या घोषणांचा समावेश
याव्यतिरिक्त, अर्थमंत्र्यांनी ३६ औषधांवरील करात सूट देण्याची घोषणा केली आहे. यामुळे औषधांच्या किमती कमी होणार आहेत, तसेच शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या योजनांची अंमलबजावणी होणार आहे. याशिवाय, प्रत्येक जिल्हा रुग्णालयात कॅन्सर डे केअर सेंटर सुरू करण्याचा निर्णयही घेतला गेला आहे.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -
Awaz Marathi WhatsApp Group
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter