आजपासून देशभरात शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ होत आहे. घटस्थापनेपासून नऊ दिवस चालणाऱ्या या उत्सवाचा देशभरात जल्लोष अन् उत्साह पाहायला मिळत आहे. अनेक दुर्गा मंडळे देवीच्या आगमनासाठी सज्ज झाली आहेत तर घरोघरी घटस्थापनेची तयारी सुरु आहे. आजपासून नऊ दिवस देवीची पूजा, आरती, गरबा असा कार्यक्रम पाहायला मिळणार असून राज्यभरातील नवदुर्गेच्या मंदिरांमध्ये भाविकांनी पहाटेपासून मोठी गर्दी केली आहे.
तुळजाभवानी मंदिर गर्दीने फुलले..
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या मंदिरात आज पासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात होत आहे. देवीच्या गाभाऱ्यात दुपारी बारा वाजता तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या हस्ते सपत्नीक विधिवत पूजा करून घटस्थापना करण्यात येणार आहे. पहाटेच मंचकी निद्रा संपून देवी सिंहासनावर विराजमान झाली असून पुढील नऊ दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये देवीच्या विविध अलंकार पूजेसह रोज रात्री छबिना निघणार आहे. राज्यासह देशभरातील लाखो भाविक तुळजापुरात दाखल होत आहेत. त्यामुळे तुळजापूर नगरी भाविकांनी फुलून गेल्याचे चित्र आहे. भाविकांची गैरसोय होऊ नये याकरिता तुळजाभवानी मंदिर संस्थानकडून देखील जय्यत तयारी करण्यात आली आहे.
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात भाविकांची गर्दी
आज पासून संपूर्ण देशभर नवरात्र उत्सवाची सुरुवात होत आहे. त्या पार्श्वभूमीवर साडेतीन शक्तीपीठ पैकी एक असणाऱ्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात पहाटेपासूनच भाविकांनी देवीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केलेली आहे. नवरात्र उत्सवाची पहिली माळ आहे. करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील गाभाऱ्यात धार्मिक मंत्रोच्चारामध्ये घट बसवण्यास सुरुवात झालेली आहे. सकाळी साडेआठ वाजेपर्यंत घटस्थापना झाल्यानंतर तोफेची सलामी देऊन करवीर नगरीला नवरात्र उत्सवाची सुरुवात झाल्याचा निरोप देण्यात येतो. पहाटेपासूनच अंबाबाई मंदिरात भाविकांनी मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी गर्दी केलेली आहे.
पुण्यात दर्शनासाठी भाविकांची गर्दी
शारदीय नवरात्र उत्सवाला प्रारंभ झाला आहे. आश्विन शुद्ध प्रतिपदा ते आश्विन शुद्ध नवमी या काळात देवीची उपासना केली जाते. नवरात्रोत्सवासाठी शहरातील सर्व देवींची मंदिरे सज्ज झाली असून, पुण्यासह उपनगरांतील मंदिरांमध्ये पहाटेच पारंपरिक पद्धतीने घटस्थापना झाली. त्यानंतर मंदिरे दिवसभर भाविकांसाठी खुली करण्यात आली आहेत. ग्रामदेवता तांबडी जोगेश्वरी मंदिरामध्ये पहाटे सहा वाजता घटस्थापना झाली. घटस्थापनेनंतर भाविकांच्या दर्शनासाठी मंदिर रात्री साडेबारापर्यंत खुले राहणार आहे. उत्सवादरम्यान दररोज देवी विविध रूपांमध्ये आणि वेगवेगळ्या वाहनांवर आरूढ झालेली पाहता येणार आहे.
माहूर गडावर नवरात्रोत्सवाला प्रारंभ
साडेतीन शक्ती पीठांपैकी एक पूर्ण पीठ असलेल्या नांदेड जिल्ह्यातील श्री रेणुका मातेच्या माहूर गडावर देखील नवरात्र उत्सवाला प्रारंभ झाला असून आज पहिली माळ असणार आहे. श्री रेणुका मातेची शासकीय महापूजा, त्यानंतर साडेनऊ वाजता घटस्थापना, घटस्थापनेनंतर नवरात्र उत्सवा सुरुवात होईल. मंदिर संस्थानकडून नऊ दिवस गडावर विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नऊ दिवस माहूर गडावर श्री रेणुका मातेच्या दर्शनासाठी देशभरातून लाखो भाविक येत असतात. मंदिर संस्थांनकडून येणाऱ्या भाविकांसाठी सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
नाशिकचं ग्रामदैवत असलेल्या कालिका मातेच्या मंदिरातही आज परंपरेप्रमाणे घटस्थापना करण्यात आली. कालिका मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे या मंदिरात एकाच ठिकाणी श्री कालिका, श्री महालक्ष्मी, श्री सरस्वती अशा तीन स्वरूपात देवी विराजमान आहे. आज घटस्थापनेनिमित्त श्री कालिका, श्री महालक्ष्मी, श्री सरस्वती मातेला रेशमी वस्त्रं आणि सुवर्ण अलंकार परिधान करण्यात आलेत. तर गाभार्यातही फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे.
अमरावतीच्या अंबादेवी मंदिरात भाविकांची गर्दी..
विदर्भाची कुलस्वामिनी असलेल्या अमरावतीच्या अंबादेवी मंदिरात आजपासून शारदीय नवरात्री उत्सवाला सुरुवात झाली आहे, या अंबा देवीला विदर्भाचे कुलदैवत म्हणून संबोधले जाते. विदर्भातील प्राचीन शहर असलेल्या अमरावती शहराची पौराणिक दृष्ट्या ओळख आहे. श्रीकृष्ण काळापासून हे मंदिर अस्तित्वात असून आजही अमरावती शहरातील तिचं स्थान जागृत समजले जाते.याच अंबादेवीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाची सुद्धा पत्रिका आली होती, याच अंबादेवी संस्थानमध्ये आता नऊ दिवस नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.
तुळजापुरातही शारदोउत्सवाचा उत्साह..
तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त आई राजा उदो उदोच्या जयघोषात मातेच्या दरबारातून भवानी ज्योत नेण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून नवरात्र महोत्सव मंडळाचे कार्यकर्त्यांनी गर्दी केली आहे. तुळजाभवानी मातेच्या दरबारातुन भवानी ज्योत प्रज्वलित करुन ती अनवाणी पायांनी पायी चालत नेण्यासाठी प्रथा आहे. त्यामुळे तुळजापूरात नवरात्र महोत्सव मंडळाचे कार्यकर्ते मोठी गर्दी करताना पाहायला मिळत आहे. आज दुपारी 12 वाजता घटस्थापना होणार आहे.