वारी नृत्याला प्रतिष्ठा प्राप्त करून देणारे राजूबाबा शेख

Story by  आवाज़ मराठी | Published by  Sameer Shaikh • 6 Months ago
वारी नृत्य सादर करताना राजूबाबा
वारी नृत्य सादर करताना राजूबाबा

 

अध्यात्मातून लोकप्रबोधनाचे काम महाराष्ट्रातील संतांनी केले. याच  परंपरेचे पाईक म्हणजे राजूबाबा शेख. त्यांच्या जीवनकार्याची ओळख करून देणारा हा विशेष लेख… 
 
डोक्यावर घागर घेऊन वारी नृत्य करणारा ७१ वर्षांचा एक वारकरी एकेदिवशी अचानक प्रकाशझोतात आला. निमित्त होते  ‘मराठी पाऊल पडते पुढे’ या टीवी कार्यक्रमाचे. शहरी मध्यमवर्गीय माणसाला त्याच्या कलेचे मोठे अप्रूप वाटले. भल्याभल्यांना अचंबित करणा-या वारकऱ्याचे नाव होते रियाजुद्दीन अब्दुल करीम ऊर्फ राजूबाबा शेख.  

सौजन्याचा आणि विनम्रतेचा मूर्तिमंत पुतळा असे राजू बाबा यांचे वर्णन करता येईल. राम-रहीम एक आहे. अशी शिकवण शेवटच्या श्वासापर्यंत राजू बाबांनी दिली आणि श्रीगोंद्यातील श्री संत शेख महंमद बाबा श्री गोंदेकर यांची परंपरा पुढे सांभाळली. 

राम आणि रहीम कसे एक आहेत, याचे दर्शन संत तुकाराम महाराजांची पालखी देहू वरून पंढरपूरला निघते त्यावेळी देहूच्या परिसरातील अनगडशाह बाबा यांच्या दर्ग्याजवळ स्थिरावते व तेथे अनगडशाह बाबाची पूजा होते या परंपरेचे स्मरण राजू बाबा शेख यांचे वारी नृत्य पाहून होते.

राजू बाबा शेख यांचे पूर्ण नाव रियाजउद्दीन अब्दुलगनी शेख . त्यांचा जन्म १७ एप्रिल १९४२ रोजी बीड जिल्ह्यातील केज या गावात झाला.गावोगावच्या कीर्तन सप्ताहामध्ये तसेच पंढरीच्या वारीमध्ये प्रबोधन घडवणारे राजूबाबा शेख हे जन्माने मुस्लीम आणि  वृत्तीने वारकरी होते. 

मुसलमान असल्याने वारकरी पंथाचा ध्वज हाती धरणे राजूबाबांसाठी सहजसाध्य बाब नव्हती. मराठवाडा मुक्तिसंग्रामात राजूबाबांच्या वडिलांची वडवणी गावात हत्या झाली. आई तीन अपत्यांना घेऊन मामाच्या आश्रयास आली. पाटील-कुलकर्ण्यांच्या शेतात आणि घरादारात काबाडकष्ट करून मुलांचा सांभाळ केला. मुलांनाही पोट भरण्यासाठी शेतीकाम करावे लागले. लहानपणापासून राजूबाबा गुरे राखण्याचे काम करीत होते. महिनाभर कष्ट केल्यानंतर त्यांना अवघा एक रुपया मेहनताना मिळत असे.

जातीने मुस्लीम असल्याने त्यांना गावच्या श्रीराम मंदिरात प्रवेश नसे. परंतु राजूबाबांना भजनाची गोडी आहे, ते मंदिराच्या पायऱ्यांशी बसून भजन ऐकत असतात, असे पाहता मंदिरातील पुजारी शेषाद्री महाराज यांनी त्यांना  मंदिरात बसून काही अंतर राखून मंदिरात भजन करण्याची परवानगी दिली. धर्माच्या वादळात राजूबाबांचा प्रपंच अनेकदा सापडला; पण त्यातून तावूनसुलाखून निघत त्यांनी विठ्ठलनामाची पताका जपली.

रानात काम करताना शाळेत जाणारी मुले त्यांना भेटत असतं . या मुलांकडे राजूबाबांनी  शिकण्याची इच्छा प्रकट केली. मुले सकाळी जाताना पाटीवर अक्षरे लिहून द्यायची. राजूबाबा ही अक्षरे गिरवत पाठ करायचे. अशा प्रकारे अक्षर ओळख करून घेतली. 

विष्णू महाराज कोल्हापूरकर यांचेकडे अवघे आठ वर्षाचे असताना ते कीर्तन शिकले.राजूबाबा नदीला पाणी भरायला जाताना ते घागरीचा तोल सांभाळीत त्यातूनच पुढे डोक्यावर पाण्याची भरलेली घागर घेऊन, मुखी हरिनाम घेत नृत्य करू लागले. त्यांचे हे नृत्य गुजरात आणि राजस्थानमधील भवारी नृत्यासारखे होते. ‘मी एकलव्यासारख्या सर्व गोष्टी शिकत गेलो, असे ते म्हणायचे.   

राजूबाबा संतांचे अभंग व गवळणी पाठ करू लागले. मामासाहेब दांडेकरांच्या अभंग मालिका वाचू लागले . गावातील लोक आधी उपेक्षा करायचे परंतु एक दिवस गावकरी म्हणाले, कार्यक्रम करून दाखवा, मग राम मंदिरात कीर्तन करण्यास गावातील लोकांनी त्यांना परवानगी दिली.

१५ वर्षांचे असताना त्यांनी पहिला कार्यक्रम सादर आला. सर्वाना कार्यक्रम आवडला. गावकऱ्यांनी राजूबाबांना ८० रुपये बिदागी दिली. एक रुपयासाठी महिनाभर त्यांना गायी सांभाळाव्या लागत. परंतु त्या दिवशी एकदम ऐशीं रुपये हातात पडले. ते ताबडतोब पंढरपूरला आले आणि त्यांनी घागर, घुंगरू, पराती अशी खरेदी केली. पुढे पंचवीस वेळा चारधाम यात्रा केली. 

पंढरपूरच्या वारीत बाबांच्या कीर्तनाचे अनेक कार्यक्रम झाले. कष्टकरी जनता कीर्तन ऐकतानाच पेंगत असल्याने बाबांना फार वैषम्य वाटत होते. कीर्तनात सर्वसामान्यांना स्वारस्य वाटावे यासाठी त्यांनी चंग बांधला. थाळी नृत्य, समई नृत्य आणि प्रसिद्ध घागर नृत्याचा समावेश करून बाबांनी कीर्तनाला नवा आयाम दिला. या अद्भुत कीर्तनाची ख्याती राज्यभर पोचली.


वारी विशेष : 'आवाज मराठी'वर प्रसिद्ध झालेले हे लेखही जरूर वाचा - 


श्रीरामपुरला सुमतीबाई लांडे यांनी त्यांचे कीर्तन ठेवले. त्यावेळी राजूबाबा प्रथम प्रकाशझोतात आले. त्यांची ख्याती ऐकून सहयाद्री वाहिनीवर 'दिंडी' या मालिकेत विजय तेंडुलकर यांनी राजूबाबांचे कीर्तन ठेवले वारीतील चक्री भजनाची कला राजूबाबा यांनी लहानपणीच अंगीकारली. चक्री भजन म्हणजे विशिष्ट प्रकारचे भजन. त्यामध्ये भजनातील घटना गायनासोबतच नृत्यानेही सादर कराव्या लागतात. या कलेद्वारे त्यांनी जनतेची मने जिंकली.  महाराष्ट्रातील पारंपारिक वारी कीर्तन किंवा चक्री भजनातील प्रसिद्ध कलाकारांपैकी एक म्हणून त्यांना गौरवले जाऊ लागले.

राजूबाबा अनेक कीर्तन सप्ताहात वारी नृत्याचे कार्यक्रम करू लागले. १९९८मध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात राजू बाबांनी वारी नृत्याचा कार्यक्रम केला. २००४ मध्ये नांदेड येथे आयोजित झालेल्या लोकोत्सवामध्ये राजूबाबांनी वारी नृत्य सादर केलं.

लोकरंग सांस्कृतिक मंच या संस्थेतर्फे आयोजित झालेल्या, लोककला संमेलनामध्ये राजूबाबांनी वारी नृत्याचा कार्यक्रम सादर केला. प्रतिष्ठित राष्ट्रीय नाट्य विद्यालया (नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा) तर्फे सन २००० मध्ये नवी दिल्लीत आयोजित झालेल्या भारतरंग महोत्सवात राजूबाबांना कार्यक्रम सादर करण्याची संधी प्राप्त झाली. 

१९८८ मध्ये बालगंधर्व स्मृती पुरस्कार त्यांना प्राप्त झाला. त्यांना सन २००० मध्ये महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक पुरस्कार ही प्राप्त झाला. तसेच सन २०१३ मध्ये भारत सरकारचा अतिशय प्रतिष्ठेचा  संगीत नाटक अकादमी पुरस्कार तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते त्यांना प्राप्त झाला आहे.  
 
 होय होय वारकरी
 पाहे पाहे रे पंढरी 

असा संदेश राजू बाबा शेख यांनी आपल्या वारी नृत्यातून दिला. अनेक वेळा राजू बाबा शेख यांचा कार्यक्रम पाहण्याचा योग आला. त्यांना राज्य सांस्कृतिक पुरस्कार मिळाला त्यावेळी त्यांनी वारी नृत्य सादर केले होते. त्यानंतर निरगुडकर फाउंडेशन तर्फे पुणे जिल्ह्यातील तुळापूर येथे आयोजित झालेल्या भक्ती संगीत महोत्सवात राजू बाबा शेख यांनी वारी नृत्य सादर केले होते. त्यानंतर आमच्या लोक रंग आणि महाराष्ट्र कला संस्कृती मंच या संस्थेतर्फे आयोजित दिवाळी पहाट लोकोत्सव या कार्यक्रमात राजू बाबा शेख यांचे वारी नृत्य आम्ही आयोजित केले होते.

राजुबाबांनी कीर्तन आणि वारी नृत्याला वाहून घेतले होते. एक तप त्यांनी भारत भ्रमण केले. शेवटी आईच्या इच्छेखातर वयाच्या चाळीसाव्या वर्षी त्यांनी लग्न केले. राजूबाबा  यांच्या पत्नीचे नाव सायराबानू बेगम. त्यांना शाहिदा, मुमताज, निशा आणि यास्मिन या  चार  मुली तर दिलदार, जाहेद ही दोन मुले आहेत.  

राजूबाबा शेख यांनी वारी नृत्याला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. हिंदू मुस्लिम ऐक्याची भावना त्यांनी जनमानसात रूढ केली. एकीकडे त्यांनीशेवटच्या श्वासापर्यंत वारकरी संप्रदायाची परंपरा जपली. दुसरीकडे दररोज नमाजही सुरू असायची. ९ फेब्रुवारी २०१८ रोजी राजूबाबा यांचे निधन झाले,  मात्र त्यांनी जपलेल्या सौहार्दाच्या परंपरेच्या रूपाने ते जनमानसात अजरामर झाले आहेत.

~ शैला खांडगे

(लेखिका लोककला आणि संतसाहित्य यांच्या अभ्यासक असून त्यांचे 'अंतरीचे धावे - मनोगत लोककलावंतांचे' हे पुस्तक प्रसिद्ध आहे.)

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -