मुंबई। मदनपुरा येथे 'उर्दू मरकझ' सांस्कृतिक संघटनेचे संचालक झुबैर आझमी यांनी हेरिटेज वॉकचे आयोजन केले होते.
साहित्य समाजसुधारणेत मोलाचे योगदान देते.उर्दू आणि मराठीच्या साहित्यिकांनी ते दाखवून दिले आहे. उर्दू आणि मराठीच्या कवी-लेखकांनी एकमेकांची साथसोबत कायम ठेवावी, असे मत अभिनेत्री शबाना आझमी यांनी व्यक्त केले. १४ जानेवारीला असणाऱ्या कैफी आझमी यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे स्मरण करण्यासाठी आज मदनपुरा येथे उर्दू मरकझ या सांस्कृतिक संघटनेचे संचालक झुबैर आझमी यांनी हेरिटेज वॉकचे आयोजन केले होते.
मदनपुरा परिसरातील आपले बालपण, वडिलांसोबतच्या आठवणी, शालेय जीवनातील किस्से यास अभिनेत्री शबाना आझमी यांनी उजाळा दिला. मदनपुरा येथे आयुष्याची सुरुवातीची वर्षे घालवल्यानंतर त्यांनी बॉलीवूडमध्ये पाऊल टाकले. त्यांचे दिवंगत वडील प्रसिद्ध कवी आणि गीतकार कैफी आझमी आणि इतर उर्दू कवी, लेखक मदनपुरा येथे राहत होते. या वेळी शबाना आझमी म्हणाल्या, कम्युनिस्ट पक्षाचा ५० रुपयांचा पगार कुटुंबासाठी खूपच कमी असल्याने कैफी साहेब लहान उर्दू वृत्तपत्रे आणि मासिकांसाठी बालकविता लिहीत असत. त्यातील २० ते ३० वृत्तपत्रांची कार्यालये या भागात होती, तसेच माझे वडील कम्युनिस्ट विचारसरणी मानत होते. तेजमीदाराचा मुलगा होते; परंतु ते ईदचे कपडे घालत नसत. ते म्हणायचे, शेतकऱ्याच्या अंगात कपडा नाही, तर मी कसा घालू ? लहानपणी मलाही इतरांप्रमाणे गोरी बाहुली आवडत होती. माझ्या वडिलांनी बाहुली दिली; पण ती काळ्या रंगाची दिली. तेव्हा मी नाराज झाले. त्यावर काळा रंगही सुंदर असतो, असे वडिलांनी सांगितले.
दरम्यान, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते प्रकाश रेड्डीही या वेळी उपस्थित होते. आमदार अमीन पटेल म्हणाले की, उर्दू मरकझ ही संस्था वर्षाच्या १२ महिने केवळ उर्दूसाठी नाही, तर मराठीसाठीही काम करते.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -