सय्यद शाह वाएज
१९२०च्या दशकात महात्मा गांधीच्या आगमनाने काँग्रेसच्या आंदोलनाला गती मिळाली. देशभर राष्ट्रवादाप्रती लोकांमध्ये नवजागरणाने जोर धरला. त्यातच पहिल्या जागतिक महायुध्दामुळे इंग्रजांसमोर अनेक आव्हाने निर्माण झाली होती. त्यामुळे इंग्रज कोणताही धोका पत्करण्यास तयार नव्हते. गांधीच्या नेतृत्वाने उभ्या केलेल्या आव्हानाला तोंड देताना त्यांची दमछाक होत होती. त्यामुळे इंग्रजांनी देशातील राष्ट्रवादी नेत्यांच्या आंदोलनांना रोखण्यासाठी काही महत्वाच्या उपायोयजना केल्या. त्याचाच एक भाग म्हणून रौलेट कायद्याकडे पाहिले जाते.
१८ मार्च १९१९ रौलेट कायदा इंग्रजांनी पारित केला होता. या कायद्यानुसार कोणत्याही आरोपाशिवाय नुसते संशयाच्या बळावर कोणत्याही व्यक्तीस तुरुंगात ठेवण्याचा अधिकार पोलिसांना देण्यात आला होता. या कायद्याविरोधात देशातील जनेतला आंदोलन उभे करण्याचे आवाहन गांधीजी आणि काँग्रेसने केले. त्या आवाहनाला मोठा प्रतिसाद मिळाला. देशभरात निदर्शने, निषेध मोर्चे काढली जात होती. स्वातंत्र्याच्या आंदोलनाचा कणा असणाऱ्या उर्दू कवींनी रौलेट कायद्याच्या निषेध म्हणून शेकडो कविता लिहिल्या. या कविता उर्दू भाषा आणि स्वातंत्र्याच्या इतिहासात महत्त्वाच्या मानल्या जातात. त्यातील काही प्रमुख कवींच्या कवितांचा आढावा घेतला तर या कविता किती महत्त्वाच्या होत्या हे आपल्या लक्षात येईल.
दिल्लीतील आंदोलकांवर इंग्रजांनी गोळीबार केला. या गोळीबारात पाच कामगारांचा मृत्यू झाला. या घटनेने व्यथित झालेल्या मोहम्मद अली जौहर यांनी ‘फुगाने देहली’ या शिर्षकाने एक कविता लिहिली. या कवितेत मोहम्मद अली जोहर लिहितात,
‘‘सरफरोशी के लिए पैर व जवां है तय्यार
आज रौनक पे है, किस दर्जा दुकान ए देहली
संगेजों से ज्यादा नहीं गोली छर्रे
यूं रुकेगा ना कभी सिले रवां देहली’’
मोहम्मद अली जोहर हे गांधींचे अत्यंत घनिष्ठ मित्र होते. त्यांच्या मैत्रीविषयी अनेक पुस्तकंही लिहिली गेली आहेत. १९१९मध्ये गांधी आणि अली बंधूंच्या पुढाकाराने खिलाफत चळवळीची सुरुवात करण्यात आली होती. या चळवळीकडे हिंदू-मुस्लिम एकतेची चळवळ म्हणूनही पाहिले जाते. रौलेट कायद्याच्या विरोधातील चळवळीतही ते अग्रेसर होते. दिवसेंदिवस रौलेट विरोधी रोष वाढत चालला होता.
६ एप्रिल १९१९ रोजी या कायद्याच्या विरोधात देशपातळीवर आंदोलन करण्यात आले. त्यामुळे सरकारने गांधीना ९ एप्रिलला अटक केली. या अटकेने वातावरण अधिक चिघळले. या आंदोलनाच्या अन्य नेत्यांनाही शहरांमधून हद्दपार करण्यात आले. नेत्यांना शहरबंदी केल्याच्या निषेधार्थ अमृतसरमध्ये ३० हजार आंदोलकांचा जमाव उपजिल्हाधिकाऱ्याच्या बंगल्याला घेराव घाण्यासाठी गेला. या जमावाला रोखण्यासाठी पोलिसांनी गोळीबार केला. या गोळीबारात १२ लोकांना आपले प्राण गमवावे लागले. या घटनेनंतर सरकारने सर्व आंदोलनांवर बंदी घातली.
या बंदीच्या विरोधात जालियनवाला बाग येथे १३ एप्रिल रोजी बैसाखी सणाच्या दिवशी आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. त्याला हजारो आंदोलक उपस्थित होते. जनरल डायरने उपस्थितांवर गोळीबार करण्याचा आदेश दिला. त्यात चारशेहून अधिक आंदोलक लोक मारले गेल्याचे सरकारने जाहीर केले. मात्र ही संख्या १३०० हून आधिक असल्याचा दावा पंडीत मदन मोहन मालवीय यांनी केला. गोळीबारात हजारो लोक जखमीही झाले होते. चकबस्त लखनवी हे उर्दू तील महत्वाचे कवी होते. त्यांनी याविरोधात एक कविता लिहिली त्यात ते म्हणतात,
‘‘इन्हे यह फिकर है हरदम नई तरजे जफा क्या है?
हमे यह शौक है, देखें सितम की इंतेहा क्या है?
गुनाहगारों में शामील हैं, गुनाहों से नहीं वाकीफ
सजा को जानते हैं हम खुदा जाने खता क्या है?’’
डॉ. अल्लामा इकबाल हे तत्वज्ञ कवी म्हणून विख्यात आहेत. त्यांनी मजूर, कष्टकरी जनतेवरही काही कविता लिहिल्या आहेत. जालियनावाला बागेत झालेल्या नरसंहाराने ते व्यथित झाले होते. त्यांनी आपल्या व्यथा कवितेच्या माध्यमातून मांडल्या.
‘‘हर जाहीर ए चमन से यह कहती है, खाक ए बाग
गाफील न रह जहां में गर्दूंकी चाल से
सिंचा गया है, खून ए शहीदां से इसका तुखम
तूं आंसूंओं का बुखल न कर इस निहाल से’’
इकबाल हे पंजाब प्रांतातच त्या काळात वास्तव्याला होते. पंजाबमधील अनेक घटनांची ते आपल्या कवितेत दखल घेतात. इकबाल यांनी केलेल्या अनेक भाषणांतही या घटनेचा उल्लेख आढळतो. जालियानवाला बागेनंतर पंजाबच्या काही प्रमुख शहरांमध्ये मार्शल लॉ लावण्यात आला. मार्शल लॉच्या काळात पंजाबमध्ये अनन्वित अत्याचार करण्यात आले. या अत्याचाराविरोधातही उर्दू कवींनी आपली लेखणी चालवली. जफर अली खान यांनीही कविता लिहिली. मार्शल लॉ के अय्याम की याद या कवितेत ते म्हणतात,
‘‘बसे जाकर जेल में और खाईए अरहर की दाल
मेहमां रहे जरां सरकार के घर आप भी।
फिर यह कहीए मार्शल लॉ हशर तक कायम रहे
वरना होंगे मुन्कर जर्नल डायर आप भी।’’
या कवितेशिवाय जफरअली खान यांनी ‘जनरल डायर की याद में’ नावाची एक कविता लिहिली. या कवितेत जनरल डायरने केलेल्या अत्याचाराची तुलना त्यांनी हलाकू खानने केलेल्या अत्याचारासोबत केली.
‘‘विलायत में खुला जब नाम ए आमाल डायर का
तराजे नामा था नामें गिरामी ओ डायर का
हलाकू को हबसे तारीख में बदनाम करते हैं
बेचारे ने नेहत्ते पर दिया कब हुकूम फायर का’’
त्रिलोकचंद महरूम यांनीही जालियानवाला बागेवर अनेक कविता लिहिल्या. त्यांच्या काही कविता गाजल्या. त्यासंदर्भात उर्दू बरीच चर्चाही झाली. ‘शिकवा ए सय्याद’, ‘डायर और नादीर दोनों के कत्ल ए आम का मुकाबला’, ‘मनाजीरा शेख सादी और डायर’, ‘ताजियाना’ या त्यांनी जालियानवाला बागेवर लिहलेल्या कवितांपैकी गाजलेल्या कविता आहेत. एका कवितेत ते लिहितात,
‘‘डायरने ये सादी से कहा
किशोर ए पंजाब के फरमांरवां
दिलमें कुछ खुदा का खौफ कर
इस कदर जहांमें हुकूमत में ना आ
बेखताओं पर ना ढा जोर व सितम
रख रदां इनपर न जोर ए नारदां’’
महरूम यांच्याप्रमाणे अहमक फफुंदवी यांनीही रौलेट कायदा, जालियानवाला बाग आणि स्वातंत्र्य चळवळीतील इतर महत्त्वाच्या घटनांवर कविता लिहिल्या आहेत. त्यातील जलियानवाला बागेवरील कविता महत्त्वाची आहे. त्यात ते लिहितात,
‘‘जिगर के दाग दिल के जखम तरफा रंग लाए हैं।
जमीं जलियांवाला की मेरे सनि पे हैरां है।’’
अन्य एका शेर मध्ये मार्शल लॉविषयी अहमक लिहितात,
‘‘मेरी इस इज्जत का खाका जो अदद के दिल में है।
मार्शल लॉ में है, या थोडासा रौलेट बील में है।’’
बेताब बनारसी यांनीही रौलेट कायदा आणि जलियानवला बागेवर कविता लिहिल्या आहेत. त्यांनी विद्रोहाचा नारा देताना जलियानवाला बागेचा मुद्दा घेऊन देशप्रेम चेतवण्याचा प्रयत्न केला. एका कवितेत ते लिहितात,
‘‘जुल्म डायर को जो दिखलाऊं तो बागी हूं मैं
अपने बच्चों को जो समझाऊं तो बागी हूं मैं
क्या खता थी जो पंजाब हुआ यूं घायल
मरना इन भाईंयों का जब मुझे याद आता है।
एक अंधेरा सा मेरी आंखो में छा जाता है।’’
जालियानवाला बाग, मार्शल लॉ आणि रौलेट कायद्याविषयी कविता लिहिणाऱ्या उर्दू कवींमध्ये शेवटचे कवी म्हणून सरजू यांचा संदर्भ येतो. त्यांनी लिहिलेल्या कवितेची उर्दू काव्यप्रेमींनी चांगलीच दखल घेतली. त्या कवितेत सरजू म्हणतात,
‘‘बेगुनाहोंपर बमों की बेखतर बौछार की
दे रहे हैं धमकीयां बंदूक की तलवार की
बाग ए जलियां में निहत्तों पर चलायीं गोलीयां
पेट के बल भी रंगाया जुल्म की हद पार की
हम गरीबों पर किए जिसने सितम बेइंतेहा
याद भुलेगी नहीं उस डायर बदकार की
या तो हम ही मर मिटेंगे
या तो लेंगे स्वराज’’
अशा प्रकारे, स्वातंत्र्याच्या आंदोलनाचा कणा असणाऱ्या उर्दू कवींनी आपल्या कवितेतून इंग्रजी जुलूम आणि दडपशाही यांच्याविरोधात भारतीयांच्या विद्रोहाला आवाज दिला. त्यांच्यातील क्रांतीची मशाल धगधगत ठेवली.
- सय्यद शाह वाएज