राजांची मनमोहक मूर्ती, पारंपरिक पालखी, फुलांनी सजविलेला आकर्षक रथ, ढोल-ताशे अन् तुतारी वादनाने भारावलेले वातावरण. पोवाड्यांमधून उलगडणारी शिवाजी महाराजांची शौर्यगाथा अन् भगवे फेटे बांधून शिवजन्मोत्सवात सहभागी झालेले मुस्लीम बांधव. हे दृश्य आहे पुण्यातील मुस्लिमबहुल कोंढवा परिसरातील.
पुणे शहरातील कोंढवा परिसरात असलेल्या ‘मुस्लिम मावळा फाउंडेशन’च्या वतीने सर्वधर्मीय शिवजयंती सोहळा आयोजित करण्यात आला होता. हाजी गफूर पठाण यांच्या नेतृत्वात शिवजयंती सोहळा दिमाखात संपन्न झाला. यावेळी मुस्लिम समाजातील युवक, महिला आणि शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
याप्रसंगी मुस्लिम मावळा फाउंडेशनचे हाजी गफूर पठाण यांनी महाराजांप्रती आपल्या भावना व्यक्त केल्या. छत्रपती शिवरायांच्या नावाचा जयघोष करत ते म्हणाले, “सर्व धर्मियांना समान न्याय देणारे आदर्श राजे छत्रपती शिवाजी महाराजांचे आम्ही मुस्लिम मावळे आहोत. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. शिवाजी महाराजांचे सर्वधर्म समभावाचे विचार समजापर्यंत पोहोचणे गरजेचे आहे.”
ते पुढे म्हणाले, “सालाबादप्रमाणे याही वर्षी कोंढव्यात शिवजयंती सोहळा साजरा झाला. कोंढवा परिसर मुस्लिमबहुल म्हणून ओळखला जातो. या परिसरात हिंदू-मुस्लीम समाजाने एकत्र शिवजयंती साजरी केल्याने समाजाला एकात्मतेचा संदेश दिला आहे.”
शिवजयंती साजरी करणे का गरजेचे आहे याविषयी बोलताना पठाण म्हणाले, “एक आदर्श राज्यकर्ते, एक आदर्श राजा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास समाजापर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. त्यामुळे आम्ही दरवर्षी शिवजयंतीचे आयोजन करत असतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाला वंदन करुया आणि त्यांच्या विचारांना उजाळा देऊया.”
आझम कॅम्पसमध्ये शिवजयंती धुमधडाक्यात साजरी
महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीतर्फे पुण्यात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली. त्याठिकाणी शिवजयंती साजरे करण्याचे यंदाचे २४वे वर्षे होते. याठिकाणी पुण्यातील सर्वात मोठी शिवजयंती साजरी करण्याची परंपरा आहे. या सोहळ्यात अल्पसंख्याक आणि बहुजन समाजातील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात सहभागी होतात. सकाळी साडेआठ वाजता मिरवणुकीला सुरूवात झाली होती. शहरातील विविध जातीय, अल्पसंख्य, बहुजन समाजातील विद्यार्थ्यांची मिरवणूक उत्साहात पार पडली. यामध्ये विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
आझम कॅम्पसचे विश्वस्त डॉ. एन. वाय. काझी यांच्या हस्ते मिरवणुकीस प्रारंभ झाला. संस्थेचे सचिव प्रा. इरफान शेख यांनी मिरवणुकीचे नेतृत्व केले. शाहीद इनामदार, एस. ए. इनामदार, मशकुर शेख, साबीर शेख, सिकंदर पटेल, आसिफ शेख, महंमद गौस सय्यद, कुलगुरू डॉ. लॉरेन्स उपस्थित होते. मिरवणुकीत दरबार ब्रास बॅण्ड, ढोल-ताशांचे पथक, तुतारी, नगारे सहभागी झाले होते.
यंदाचे मिरवणुकीचे २४वे वर्ष होते. पूना कॉलेज, गोल्डन ज्युबिली टेक्निकल इन्स्टिट्यूट, जुना मोटर स्टँड, पद्मजी पोलिस चौकी, क्वार्टर गेट, संत नरपतगीरी चौक, नाना चावडी चौक, अरुणा चौक, अल्पना टॉकीज, डुल्या मारुती चौक, तांबोळी मशीद, सोन्या मारुती चौक, मोती चौक, फडके चौकामार्गे लाल महाल येथे मिरवणुकीची सांगता झाली.
अठरा पगड जातींना एकत्र घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले स्वराज निर्माण केले. शिवरायांच्या साथीला अनेक मुस्लिम मावळे होते. शिवाजी महाराजांनी मशिदींची जपणूक करुन नेहमीच सामाजिक समतेचा संदेश दिला. या संपूर्ण इतिहासाला पुणे शहरातील मुस्लिम मावळ्यांनी पुन्हा एकदा उजाळा देत सामाजिक समतेचा संदेश दिला आहे.