कोल्हापूरमधील मोहरमची एक अनोखी परंपरा

Story by  आवाज़ मराठी | Published by  Pooja Nayak • 1 Years ago
कोल्हापूरच्या कुंभोज येथील ताबूत विसर्जन मिरवणूकीतील एक दृश्य
कोल्हापूरच्या कुंभोज येथील ताबूत विसर्जन मिरवणूकीतील एक दृश्य

 

हिजरी या इस्लामी कालगणनेचे नुकतेच १४४५ वे वर्ष सुरु  सुरु झाले आहे. मोहरम हा नवीन वर्षातील पहिला महिना. मुस्लिमांच्या दृष्टीने या महिन्याला विशेष महत्त्व आहे. विशेषतः त्यातले पहिले दहा दिवस करबलाच्या ऐतिहासिक घटनेमुळे विशेष महत्त्वाचे मानले जातात. मुहम्मद पैगंबरांचे लहान नातू हजरत इमाम हुसैन यांना त्यांच्या कुटुंबियांसह याच दिवशी इराकमधील करबला या शहरात झालेल्या लढाईत शहीद करण्यात आले. त्यांच्या हौतात्म्याच्या स्मरणार्थ मोहरमच्या दहाव्या दिवसापर्यंत म्हणजे 'आशुरा'पर्यंत मुस्लीम दुखवटा पाळतात. त्याला 'मातम'असे म्हटले जाते. यंदा २० जुलैपासून मोहरमच्या महिन्याला सुरुवात झाली. 


महाराष्ट्रातील मोहरम

दक्षिण भारतात विशेषतः महाराष्ट्रात मोहरमची वेगळी सांस्कृतिक परंपरा आहे. मोहरमनिमित्त महाराष्ट्रात ताजीये किंवा ताबूत बसवले जातात. पंजांची स्थापना होते. लोककला सादर केल्या जातात. खिचडा, रोट यांसारखे पदार्थ वाटले जातात. आशुराच्या (दहाव्या) दिवशी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मोहरमच्या मिरवणुका निघतात. या सगळ्या टप्प्यांवर हिंदूंचा लक्षणीय सहभाग असतो. यातून मराठी संस्कृती आणि मोहरम यांचे विशेष नाते तयार झाले. अहमदनगर, कुरुंदवाड, कडेगाव, कोल्हापूर याठिकाणी मोहरमची विशेष परंपरा आहे. त्यापैकी कोल्हापूरमधील मोहरमची ही झलक...


कुदळ मारण्याचा विधी

मोहरम सुरु होण्यापूर्वीच कुदळ मारण्याचा पारंपरिक विधी पार पडतो. प्रतिपदेचा चंद्र पाहून कुदळ मारली जाते. त्‍यानंतर पंजे बांधणीस सुरवात होते.  मोहरमनिमित्त कोल्हापूरातील बाबूजमाल दर्ग्यासह विविध ठिकाणी कुदळ मारण्याचा पारंपरिक विधी झाला. भर पावसात पारंपरिक वाद्यांच्या गजरात विधी झाला. त्यानंतर मानाच्या नाल्याहैदर पंजाची प्रतिष्ठापना झाली. त्यानंतर सर्वत्र पंजे प्रतिष्ठापनेला प्रारंभ झाला. दरम्यान, उद-धुपाबरोबरच पंजांसाठीच्या फेट्यांची बाजारपेठ सजली आहे.


पंजांची स्थापना

अनेक ठिकाणी हिंदू-मुस्‍लिम बांधव एकत्र येवून पंजे बांधणी करतात. मोहरमचा सण दहा दिवसांचा असून पहिल्या पाच दिवसांत सर्वत्र विधीवत पंजे प्रतिष्ठापना होते. पंजेची बांधणी वैशिष्‍टपूर्ण असते. त्यानंतर मोहरमपर्वात काही मुस्लिम बांधवांकडून ताजिया स्थापनेची परंपरा आहे.  त्यानंतर सर्वत्र पंजेभेटीच्या सोहळ्यांना प्रारंभ होतो. कोल्हापुरातील  तालमींतही पंजांची पारंपरिक पध्दतीने प्रतिष्ठापना होते. त्यामुळे या तालमींसह दर्गा आणि पंजे प्रतिष्ठापना होणारा परिसर विद्युत रोषणाईने सजला आहे. यंदा भर मोहरम उत्सवातच पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्व ठिकाणी आवश्यक खबरदारी घेतली आहे.


ताजीयांची बांधणी

यंदाही मंगळवारी (२५ जुलै - उर्दू ६ तारीख) ताजीयांची स्थापना केली जाईल. या तारखेस काही मुस्लिम बांधवांकडून ताजिया आणि सवारीची स्थापना केली जाते. २८ तारखेला खत्तल तर २९ तारखेला ताबूत विसर्जन करण्यात येईल. दहाव्या दिवशी आशुरा सणाने या पर्वाची सांगता होईल. आशुराच्या दिवशी ताजियाची मिरवणूक काढून विसर्जन करण्यात येते.


मिरवणुकीत सादर केला जातो करबल नृत्यप्रकार

हिंदू-मुस्‍लिम ऐक्‍याचे प्रतिक म्‍हणून मोहरम परिचित आहे. महाराष्ट्रातील अनेक खेड्यांमध्ये सर्व जाती धर्मातील लोक एकत्र येवून मोहरमच्या सणात सहभागी होतात. या मोहरम मिरवणुकीनिमित्त वेगवेगळ्या परंपराही आकाराला आल्या आहेत. करबल नृत्य ही अशीच एक अनोखी परंपरा. नृत्याद्वारे सादर केला जाणारा हा एक एक लोककला प्रकार. हे नृत्य सादर करणारी अनेक मंडळे महाराष्ट्रात आहेत. विविध ठिकाणच्या करबल मंडळांकडून मोहरमची जय्‍यत तयारी सुरु आहे. बकरी ईदनंतर बहुतांश करबल मंडळातर्फे करबल खेळाच्‍या सरावास सुरवात केली जाते.  कोल्हापूरमधील कुंभोज येथे सहा करबल मंडळे कार्यरत असून प्रत्‍येक मंडळात शंभरहून अधिक आजी माजी खेळाडू आहेत. प्रत्‍येक मंडळातर्फे खेळाडूंना मोहरमचे खास किट दिले जाते.


मोहरममधील पारंपारिक वाद्ये

कोल्हापूरमध्येच त्र्यंबोली यात्रांच्या ‘पीऽऽऽ ढबाक'च्या सुरानंतर आता मोहरमनिमित्ताने ‘ढौल्या पी पी’चे सूर घुमू लागले आहेत. मोहरममध्ये ‘ढौल्या पी पी’ चा मान आहे. आहेत. ‘पीऽऽऽढबाक' असो किंवा ‘ढौल्या पी पी’ या वादनातील दोन स्वतंत्र चाली आहेत. मात्र, दोन्हीतही पिपाणी म्हणजेच लहान सुंदरी किंवा सनई आणि डफडं ही दोन वाद्ये असतात. होलार समाजाचे हे प्रमुख वाद्य आहे. त्र्यंबोली यात्रा ही उत्साहाचे प्रतीक आहे आणि त्याचमुळे ‘पीऽऽऽढबाक'मध्ये डफडं खच्चून वाजवलं जाते. डफड्याचा येणारा ‘डब डब डब' हा आवाज म्हणजे कोल्हापुरी भाषेत ‘ढबाक'. पंजे भेटीसाठी बाहेर पडतात त्यावेळी ते नाचवण्याचीही एक विशिष्ट लय आणि ताल आहे, त्याला अनुसरूनच ‘ढौल्या पी पी’ अशी या वाद्याची ओळख झाली असावी, असे या क्षेत्रातील जाणकार सांगतात.