पुणे-मुंबई महामार्गानं देहूरोडपर्यंत गेलो. उजव्या बाजूला देहूकडे जाणाऱ्या रस्त्यावर कमान दिसली, 'जगद्गुरू संत तुकाराम महाराज प्रवेशद्वार'. कमानीवर तुकोबारायांचा विठ्ठलभजनात तल्लीन झालेला पुतळा. कमानीचे खांब वीणेच्या प्रतिकृतीचे. लष्कराच्या हद्दीतून पुढे निघालो. देहूच्या वेशीलगत उजव्या बाजूला चिंचेची दोन झाडं दिसली. त्याखाली अभंग आरती स्थानाची मेघडंबरी. त्या मागं अनगडशाह बाबांचा दर्गा. दोघांमध्ये एक विहीर. दुपारची वेळ. डोक्यावर रखरखते ऊन. झाडाखाली आणि मेघडंबरीत काही जण बसलेले. एक-दोघे वामकुक्षी घेत होते.
आम्ही मोटारसायकल थांबवली. उत्सुकता म्हणून दर्ग्याकडे जायला निघालो. मेघडंबरीत बसलेले पंचाहत्तरीतील आजोबा आमच्या मागं आले. त्यांना विचारलं, "बाबा, दर्गाची देखभाल, पूजाअर्चा कोण करतं?" ते म्हणाले, "आम्हीच." अंगात पांढरा पायजमा, पांढरा नेहरू सदरा. डोक्यावर गांधी टोपी. कपाळी गंध. गळ्यात तुळशीची माळ. म्हणजे ही व्यक्ती हिंदू, आणि दर्गाची पूजाअर्चा कशी काय? मनात पुन्हा गोंधळ वाढला. चेहऱ्यावरील भाव ओळखून ते म्हणाले, "चला सांगतो."
आम्ही दर्ग्या गेलो. दर्गा. हिरवा-पांढरा रंग दिलेल्या भिंती. प्रवेशद्वाराबाहेर उजव्या बाजूला विहीर. तिलाही हिरवा-पांढरा रंग. त्यालगत सहा पताका. त्यातील दोन भगव्या, दोन हिरव्या आणि दोन पांढऱ्या. दर्ग्याच्या गाभाऱ्यात कबर. त्यावर चादर. उर्दू लिपीत कुरआनमधील सूरती आणि आयती छापलेल्या. मोगरा, गुलाब, जास्वंदाच्या फुलांनी सजावट केलेली. एका भिंतीच्या गोखल्यात (छोटी अलमारी) २४ तास तेवणारा तेलाचा दिवा. एका कोपऱ्यात दोन मोरपिसं. प्रवेशद्वारालगत दोन्ही बाजूच्या भिंतीवर चंद्र आणि चांदणीची प्रतिकृती. अगरबत्ती, अत्तर आणि चंदनाचा घमघमाट.
माहिती सांगणारी व्यक्ती होती ७७ वर्षीय पोपट बिरदवडे. ते म्हणाले, "मेघडंबरी आणि दर्ग्याची जमीन आमच्या सासऱ्यांची. बाबूराव परंडवाल यांची वडिलोपार्जित. सासऱ्यांच्या निधनानंतर इथली पूजाअर्जा मी आणि गावातील गोविंद मुसडगे बघतो. दररोज सकाळी आणि संध्याकाळी पूजा होते. आरती करतो. भाविकांनी स्वखुशीनं वाहिलेली देणगी आणि पदरमोड करून अगरबत्ती, धूप, ऊद, शेरा (फुलांची चादर), फुलांसाठी खर्च करतो."
दर्गा वडाच्या झाडाखाली आहे. त्यावर लिहिलंय, 'हजरत सय्यद अनगडशाह बाबा रहै।' त्यासमोर चिंचेच्या झाडाखाली तुकोबारायांची पालखी अभंग आरती स्थान. दर्गा आणि अभंग आरती स्थानाचे फोटो घेऊन आम्ही गोविंदराव मुसडगे यांच्या घरी पोचलो. खडकी अॅम्युनिशन फॅक्टरीतून निवृत्त झालेले ६८ वर्षीय गृहस्थ. ते म्हणाले, "आम्ही रामोशी. आजोबा धाकू नाईक दर्गाची सेवा करायचे. कितीही अडचणी आल्या तरी आम्ही घाबरत नाही. फक्त अनगडशाह बाबांसमोर नतमस्तक होतो. सर्व समस्या चुटकीसरशी दूर होतात, असा अनुभव आहे.
असं म्हणतात की, स्वतःचा उद्धार व्हावा, या आशेनं बाबा पुण्यातून चिंचवडला मोरया गोसावींकडे गेले, मात्र मोरया म्हणाले, "अनगडशाह, तुझा उद्धार इथे नाही, देहूला जा. तुकाराम महाराजांकडे.” "त्यांना ओळखायचे कसे?" अनगडशाहांचा प्रश्न. "ज्या घरातील भिक्षेनं तुझा कटोरा पूर्ण भरेल ते महाराजांचं घर समज," मोरयांनी सांगितलं. बाबा देहूत येऊन भिक्षा मागू लागले. एका घरासमोर थांबले. एक बालिका जात्यातील पीठ घेऊन निघाली. तिच्या आईनं हातावर मारलं. हातातून पीठ खाली पडलं. फक्त दोन बोटात मावेल इतकीच चिमूट शिल्लक राहिली. चिमुरडी धावत आली. कटोऱ्यात चिमूट झटकली. कटोरा भरला. पीठ खाली पडू लागलं. बाबांना कळून चुकलं, हेच तुकोबारायांचं घर. ती चिमुरडी म्हणजे तुकोबारायांची मुलगी भागीरथी आणि तिची आई म्हणजे जिजाबाई. बाबांनी तुकोबारायांचे पाय धरले. शिष्यत्व मागितलं. तुकोबारायांनी तुळशीची माळ अनगडशाहांच्या गळ्यात घातली. तेव्हापासून गावाशेजारच्या ओढ्यापलीकडं झोपडी करून अनगडशाह राहू लागले. ते ठिकाण म्हणजेच आजचा बाबांचा दर्गा.”
मुस्लिम असूनही माळकरी. संत ज्ञानेश्वर महाराजांनी सातशे वर्षांपूर्वी पाया रचलेल्या भागवत धर्माचा कळस उभारलेल्या तुकोबांचा शिष्य अनगडशाह बाबा. या घटनेला आज ४०० वर्ष पूर्ण होत आहेत. तेव्हापासून आजपर्यंत ते हिंदू-मुस्लिमांचे श्रद्धास्थान झाले आहे. याबाबत मुसडगे म्हणाले, "दरवर्षी अक्षय्य तृतीयेच्या वेळी तीन दिवस अनगडशाह बाबांचा उरूस असतो. पहिल्या दिवशी गोपाळपुऱ्यातून संदल निघतो. त्यात सर्वधर्मीय भाविक सहभागी होतात. बाबा माळकरी असल्यानं मुस्लिम बांधव तिथे कुर्बानी देत नाहीत. शाकाहारी गोडधोड पदार्थांचा नैवेद्य असतो. दरवर्षी आम्ही पाच मुस्लिम बांधवांना, फकिरांना घरी जेवायला बोलावतो. रुमाल, टोपी, दक्षिणा देऊन त्यांचा सन्मान करतो. ही परंपरा पणजोबांच्या पूर्वीपासूनच चालत आलेली आहे."
दर्ग्याच्या नित्यनियमाबाबत ते म्हणाले, "दररोज सकाळी साडेसातच्या आत झाडून परिसर स्वच्छ करतो. गुलाबपाणी, अत्तर शिंपडतो. फुलांनी सजावट करतो. धूप, ऊद, अगरबत्ती लावतो. पूजा होते. आरती होते. खडीसाखर किंवा रेवड्यांचा प्रसाद असतो. दिवा विझणार नाही, याची काळजी घेतली जाते. दर्गा २४ तास खुला असतो. दरवाजा बंद केला जात नाही. गावातील मुस्लिम बांधवही दर्शनासाठी येतात."
मुसडगे आणि बिरदवडे यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार शब्बीर मुलाणी यांच्या घराकडे निघालो. देहूतील चव्हाणनगरच्या कमानीलगत त्यांचं घर. त्यांच्या पत्नी शाकिरा यांना विचारलं, "शब्बीर मुलाणी साब यहाँ पे रहते हैं क्या?" त्या म्हणाल्या, "हो. या ना घरात." मी थोडा खजिल झालो. त्या मुस्लिम म्हणून त्यांच्याशी हिंदीत बोललो; मात्र त्या बोलल्या चक्क मराठीत. घरात प्रवेश केल्यानंतर त्यांचे व्याही युसूफ गफूर शेख यांच्यासह सूनबाईही मराठीत बोलल्या. दर्ग्याबाबत मुलाणी म्हणाले, "अनगडशाह बाबा दर्गा जागृत देवस्थान आहे. हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतीक आहे. आषाढी वारीसाठी पंढरपूरला निघालेली तुकाराम महाराजांची पालखी तिथे थांबते. अभंग आणि आरती झाल्यानंतर पुढे जाते. पालखीपुढे ताशा वाजवण्याचा मान आमच्या घराला आहे."
त्यानंतर आम्ही शाकिर अत्तार यांच्या सौभाग्य अलंकार दुकानात पोचलो. देहूतील महाद्वारालगत त्यांचे देवतांच्या फोटो, मूर्ती आणि पूजा साहित्य विक्रीचं दुकान आहे. त्यावर 'जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज प्रसन्न' असं लिहिलं आहे. त्यांची पत्नी दिलशाद आणि मुलगा सोहेल भेटले. अनगडशाह बाबांचा दर्गा, आषाढी वारी आणि अक्षय्य तृतीयेचा संदल याबाबत सोहेल म्हणाला, "दर्ग्याला गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो. त्यावर चढविल्या जाणाऱ्या चादरीवर कुरआनची कलमे आणि सूरते छापलेली असतात. पणजोबांपासून आमच्या घरात परंपरा आहे. आजोबा अबुल मुहंमद अत्तार माळकरी होते. ते एकादशीचा उपवास करायचे. दरवर्षी आषाढी वारीला जायचे. तुकाराम महाराजांवर आमची नितांत श्रद्धा आहे. आम्ही अनगडशाह बाबा दर्ग्यापर्यंत पालखीसोबत चालत जातो. बाबा माळकरी असल्याने दर्यावर बळी दिला जात नाही. संदलच्या वेळी 'बिस्मिल्ला हिर्रहमा निर्रहम्' असे म्हणत कुरआनचे फातिहा अर्थात सूरते, कलमे आणि आयतींचे पठण केले जाते."
अत्तार यांचा निरोप घेऊन महाद्वारात आलो. संत तुकाराम महाराजांचे वंशज दिलीपबुवा गोसावी यांच्या घरी गेलो. इनामदारसाहेब वाड्यात. आषाढीवारी प्रस्थान सोहळ्यानंतर पालखी मुक्कामाचे ठिकाण. दर्गा आणि पालखी परंपरेबाबत बुवा म्हणाले, "तुकाराम महाराज आणि नगरचे शेख महंमद हे समकालीन संत. त्यांच्याविषयी असे सांगितले जाते की, लोहगावला महाराजांचे कीर्तन सुरू असताना मंडपाला आग लागली. याची जाणीव शेख महंमद यांना झाली. त्यांनी तेथूनच मंडप विझवला. त्यांचे शिष्य दुसऱ्या दिवशी लोहगावला आले. मंडपाला आग लागल्याचे त्यांना दिसले. तेव्हापासून आषाढी वारी प्रस्थानापूर्वी शेख महंमद यांची दिंडी नगरहून देहूत येते. नगरप्रदक्षिणा करून परत जाते. त्या दिंडीला हिंदूंच्या घरातील नैवेद्याचा मान आहे. अनगडशाह बाबांचीही अशीच कहाणी आहे. इनामदार वाड्यातून पालखी अनगडशाह बाबा दर्गापर्यंत खांद्यावर उचलून नेली जाते. तिथे अभंग, आरती होते. त्यानंतर पालखी रथात ठेवली जाते. दरवर्षीची ही परंपरा आहे. मुस्लिम बांधवांनाही मान दिला जातो."
अनगडशाह बाबा किंवा अल्लाहबाबत महाराजांचे काही अभंग आहेत का? असे विचारल्यावर बुवा म्हणाले, "हो आहेत.” त्याबाबत उत्सुकता वाढली. महाराजांनी काय म्हटले असेल, याचे विचारचक्र डोक्यात सुरू झाले. घरी पोचलो. संत तुकाराम महाराज संस्थानने प्रकाशित केलेली अभंगगाथा चाळली. त्यातील ४३८ ते ४४४ क्रमांकाचे अभंग हिंदीत आहेत. 'मुंढा', 'डोईफोडा', 'मलंग', 'दरवेस' आणि 'वैद्यगोळी' नावांनी ते प्रसिद्ध आहेत. काहीसे संत कबिरांच्या दोह्यांप्रमाणे त्यांची रचना आहे. त्यातील प्रत्येक शब्द मार्मिक आहे.
अल्ला करे सो होय बाबा करतारका सिरताज।
गाऊ बछरे तिस चलावे यारी बाघो न सात ।।
ख्याल मेरा साहेबका बाबा हुवा करतार।
व्हांटे आघे चढे पीठ आपे हुवा असिवार।।
जिकिर करा अल्लाकी बाबा सबल्या अंदर भेस।
कहे तुका जो नर बुझे सोहि भया दरवेस ।।
अशा पद्धतीने 'कहे तुका' म्हणत केलेल्या रचनांचा आशय आळंदी येथील वारकरी शिक्षण संस्थेतील अध्यापक आणि वारकरी महामंडळाचे सचिव, ज्येष्ठ कीर्तनकार नरहरी महाराज चौधरी यांच्याकडून समजून घेतला. तेव्हा कळले की, तुकोबारायांच्या हिंदीतील रचनाही खूपच मार्मिक आहेत.
"पंढरीचा पांडुरंग अर्थात विठ्ठल आणि महंमद पैगंबर अर्थात अल्लाह एकच असून तेच सर्वश्रेष्ठ आहेत. त्यांच्यात भेदभाव नाही. वाईट विचार सोडून द्या, केवळ प्रभूचे नामस्मरण करा, असाच भाव या अभंगांमधून ध्वनित होतो," असे नरहरी महाराजांनी सांगितले आणि मनातील शंका-कुशंकांचे निरसन झाले. त्यातून हिंदू-मुस्लिम सलोख्याच्या, समता आणि बंधुभावाच्या, ममतेच्या, एकात्मतेच्या पाऊलखुणा दिसून आल्या. त्याही ४०० वर्षांपूर्वी तुकोबारायांनी अभंगरूपाने मांडून ठेवलेल्या.
- पितांबर लोहार
(पूर्वप्रसिद्धी - सकाळ विठाई विशेषांक २०१९)