ख्रिश्चन धार्मिक चळवळीची सुरुवातीपासूनच इस्लामशी वैचारिक नाते राहिले आहे. इस्लामने मोहम्मदांपुर्वीच्या प्रेषितांमध्ये ख्रिश्चन धर्माचे संस्थापक येशू ख्रीस्तांना महत्वाचे स्थान दिले आहे. हे स्थान इतके महत्त्वाचे आहे की मोहम्मदांप्रमाणेच येशू ख्रिस्त यांना ईश्वराचे प्रेषित मानण्यावर कुराणने जोर दिला आहे. त्यामुळेच खिलाफतीच्या काळापासून भारतातील वसाहतपूर्व काळातील मुघल व अन्य सत्तांच्या काळात ख्रिश्चन धर्म, त्याचा इतिहास व विचारधारा याचा अभ्यास मुस्लीम विचारवंतांनी सातत्याने केला आहे.
अकबर बादशहाच्या काळात ख्रिश्चन धर्माशी संबंधित साहित्य भाषांतरित करण्याचा प्रयत्न झाला होता. अकबराचा वारसा पुढे दाराशुकोहने चालवला. त्याने आखलेल्या भाषांतरांच्या योजनांमध्ये बायबलचा देखील समावेश होता. १८५७ ला मुघल सत्तेचा अस्त होईपर्यंत ख्रिश्चन आणि मुस्लीम ज्ञानविश्वामध्ये हा वैचारिक संवाद कायम होता. मुघल सत्तेचा अस्त झाल्यानंतरही त्याचा सांस्कृतिक आणि सामाजिक प्रभाव विसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत कायम होते. त्यामुळेच उर्दू भाषा ही हिंदीच्या तुलनेत जनभाषा म्हणून संपर्काची आणि संवादाची ठरली. मेकडॉनल्ड्ने प्रयत्नपूर्वक उर्दूचे प्रशासकीय भाषा म्हणून असणारे महत्व कमी करेपर्यंत तिला राजकीय महत्वदेखील होते.
उर्दूचे हे सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय महत्व लक्षात घेऊन एका बाजूला उर्दू भाषेवर अन्याय करत असतानाच दुसऱ्या बाजूला इंग्रजांनी ख्रिश्चन धर्माच्या प्रसारासाठी उर्दूत ख्रिश्चन धर्मीय साहित्य निर्माण करण्याला चालना दिली. उर्दूत ख्रिश्चन धर्मीय साहित्याचा संदर्भ १८३९ पासून सापडतो.
इंग्रजांच्या आगमनापासून खिश्चन धर्म खऱ्या अर्थाने भारतात पसरण्यास सुरुवात झाली. इंग्रजांनी सत्ताधीश म्हणून ख्रिश्चन धर्माच्या प्रसारासाठी किती हातभार लावला, हा संशोधनाचा विषय आहे. पण त्यांच्या प्रेरणेतून, मिशनरी कार्यातून ख्रिस्ती धर्माच्या प्रसारासाठी साहित्यनिर्मिती मोठ्या प्रमाणात झाली. त्यासाठी त्यांनी अनेक भाषा उपयोगात आणल्या.
राष्ट्रीय स्तरावरील भाषा म्हणून हिंदीपेक्षा उर्दू भाषेत ख्रिस्ती साहित्य मोठ्या प्रमाणात निर्माण करण्यात आले. ख्रिस्ती धर्माच्या प्रसारासाठी अनेक वर्तमानपत्रे उर्दू भाषेत चालवली जात होती. त्यातील प्रमुख वर्तमानपत्रे म्हणून 'खैरख्वान ए हिंद' (संपादक-पाद्री आर. सी. माथूर, मिर्झापूर, १८८६ पर्यंत हे वर्तमानपत्र सुरु होते.), 'खैरख्वाह आहे ए खल्क' (सन १८६२ मध्ये आठ्याहून सुरु करण्यात आले होते.), 'मखजन ए मसिही' (इलाहाबाद, १८६८), 'रिसाला मवाईज ए उकबा' दिल्ली, १८६७), 'कोकब ए इसवी' (१८६८). 'मासिक हकायक ए इरफान' (संपादक पाद्री अमादुद्दीन, अमृतसर १८६८), 'सद्रुल अखबार' (आग्रा, १८४६), 'कोकब ए हिंद' (संपादक पाद्री क्रीयोन, कलकत्ता, १८६९), 'शम्सुल अखबार', (कलकत्ता, पाद्री रज्जब अली), 'रिसाला ए मसी' (लाहोर, १९०७), 'रिसाला ए मसिही तजल्ली' (लाहोर), 'मासिक रिसाला ए तरक्की' (लाहोर, १९२४), 'रिसाला ए मायदा' (संपादक-मुसा खां, लाहोर), 'अश्शाहीद' (संपादक-पाद्री के. एल. नासिर, श्रीगोदा), 'अकुव्वत' (संपादक एफ.एम. नजमोद्दीन, लाहोर, याचे १९४६ चे अंक उपलब्ध आहे.) या वर्तमानत्रांचा उल्लेख केला जातो.
वर्तमानपत्रानंतर साहित्यनिर्मितीतही ख्रिश्चन पाद्रींनी मोठ्या प्रमाणात काम केले. उर्दूतील ख्रिस्ती ज्ञाननिर्मितीचा इतिहास १८३९ पासून उपलब्ध आहे. 'किताब ए मुखद्दस का आखरी हिस्सा' या नावाने पहिला ख्रिस्ती ग्रंथ उर्दूत कलकत्ता आणि अमेरिकेतील धार्मिक संस्थांच्या मदतीने प्रकाशित करण्यात आला. १८३९ मध्ये याची पहिली आवृत्ती निघाली. 'हमारे खुदावंद येशू मसिह का नया वसिका' हे अनुवादित पुस्तक १८४१ साली कलकत्ता येथून प्रकाशित झाले. किताबुल खुस खंड १ आणि २ यातील पहिला खंड १८४२ मध्ये, तर दुसरा १८४३ मध्ये कलकत्त्याहून प्रकाशित झाला.
'किताब ए मुकद्दस' नावानेच एक पुस्तकही याच काळात प्रकाशित झाले. ही काही महत्वाची ख्रिश्चन धर्मावरील उर्दू पुस्तकं आहेत. त्याशिवाय उजेर अहमद यांनी विस्तारीत माहिती त्यांच्या पुस्तकात दिली आहे. यामध्ये फक्त बायबलचे २० अनुवाद आहेत. तौरातचा एक अनुवाद आहे. त्याशिवाय बायबलचे विश्लेषण असणारे १९ ग्रंथ आहेत. ख्रिश्चन धर्मावरील वेगवेगळे ५० ग्रंथ आहेत. शिवाय ख्रिस्ती उर्दू कवितासंग्रहांची संख्या १४ आहे. याशिवाय बालसाहित्यावरील १४ पुस्तकं देखील आहेत.
ख्रिश्चन धर्मियांप्रमाणेच हिंदू, शीख, बौद्ध, जैन धर्मियांचे साहित्यही मोठ्या प्रमाणात उर्दू भाषेत आहे. महाभारत, रामायणासारख्या ग्रंथांची वीसहून अधिक भाषांतरे उर्दूमध्ये उपलब्ध आहेत. आर्य समाजाकडून तर प्रदेशनिहाय तब्बल १० मुखपत्र उर्दू भाषेतून चालवली जात होती. त्यामुळे वसाहत काळातील उर्दूचे जनभाषा म्हणून असणारे महत्व अधोरेखित होते. उर्दू ही जनभाषा असल्यामुळेच तिच्या भाषिक मूल्यांमध्ये धर्मनिरपेक्षता आढळते.
उर्दूने निधर्मी मुल्यानिष्ठ जपतानाच आधुनिक काळातील ज्ञानविश्वाशी आपले नाते मजबूत केले. त्यामुळेच कार्ल मार्क्सच्या दास कॅपिटलचे भारतीय भाषांमधील पहिले भाषांतर उर्दूतून प्रसिद्ध झाले. त्याशिवाय आधुनिक वैद्यकीय शिक्षण स्थानिक भाषांमध्ये पहिल्यांदा उर्दूतून उपलब्ध झाले. त्यामुळेच उर्दूचे हे ऐतिहासिकत्व लक्षात घेऊन ख्रिश्चन मिशनरी व इंग्रज अधिकाऱ्यांनी उर्दूतून ख्रिश्चन धर्मीय साहित्य निर्मितीला प्रोत्साहन दिले.
सरफराज अहमद