पुण्यासह महाराष्ट्राच्या वैभवी गणेशोत्सवाची सांगता उद्या मंगळवारी होणार आहे. या काळात शहरात अनेक ठिकाणी हिंदू मुस्लीम एकतेचेही दर्शन घडले. अशाच एका कृतीमुळे कोथरूडकरांनी समाजासमोर वेगळा आदर्श निर्माण केला आहे. कोथरूडच्या 'समस्त गावकरी मंडळा'च्या एका परंपरेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
१९४४ मध्ये कोथरूडच्या ग्रामस्थांनी समस्त गावकरी मंडळाची स्थापना केली. यंदा या मंडळाचे ८१ वे वर्ष सुरु आहे. या मंडळाद्वारे दरवर्षी गणेशोत्सव काळात एक दिवस गणपतीची आरती मुस्लिम बांधवांच्या हस्ते करण्यात येते.
असा आहे कोथरूडच्या ग्राम गणपतीचा इतिहास
समस्त गावकरी मंडळाचा एक इतिहास सांगितला जातो… त्यावेळी व्ही शांताराम हे पुण्याला शुटींगसाठी येत असायचे. आज पुण्यात FTII आहे तिथे पूर्वी महान चित्रपट दिग्दर्शक व्ही शांताराम यांचा प्रसिद्ध स्टुडीओ होता. त्याठिकाणी शुटिंगसाठी लागणारे सगळे साहित्य ते कोथरूड गावच्या ग्रामस्तांकडून घेत असत. त्यामुळे त्यांचे आणि गावातील लोकांचा जिव्हाळ्याचे नाते झाले होते. गावातील लोकांनी व्ही शांताराम यांच्याकडे गणपती मंडळ तयार करण्याची इच्छा बोलून दाखवली होती. त्यावेळी व्ही शांताराम यांनी स्वतःच्या स्टुडीओमधून लाकडी गणपतीची मूर्ती बनवून गावकऱ्यांना दिली होती. अशाप्रकारे कोथरूडला ग्रामगणपती मिळाला. ही मूर्ती आजही समस्त गावकरी मंडळात पाहायला मिळते.
मंडळाने अशी जपली आहे हिंदू मुस्लिम सलोख्याची परंपरा
समाजाला सर्वधर्मसमभाव आणि एकतेचा संदेश देण्याचा मंडळाचा प्रयत्न असतो. वर्षानुवर्षे चालत आलेल्या मुस्लिम बांधवांच्या हस्ते आरतीच्या परंपरेबद्दल बोलताना मंडळाचे अध्यक्ष रोहन मांढरे सांगतात, “कोथरूडच्या ग्रामस्थांनी या गणपती मंडळाची स्थापना केलेली आहे. आमच्या या मंडळात सगळे कोथरूडकर सहभागी असतात. कोथरूडमध्ये पूर्वीपासून वास्तव्यास असलेले मुस्लीम बांधवदेखील याला अपवाद नाहीत. ते सुद्धा मंडळाच्या कार्यक्रमांमध्ये हिरीरीने पुढाकार घेतात. दोन्ही समाजाचे सण-उत्सव आम्ही तेवढ्याच उत्साहाने साजरे करतो. मुस्लिम बांधवांच्या हस्ते आरती करण्याची मंडळाची परंपरा आम्ही अखंड सुरु ठेवणार आहोत. यामुळे समाजातील हिंदू-मुस्लीम एकतेचे बंध अधिक घट्ट होण्यास मदत होईल.”
सामान्य कुटुंबातील मुस्लिम तरुण गणपतीची आरती करण्यासाठी येताना प्रसाद आवर्जून घेऊन येतात. आरती झाल्यानंतर सर्व गणेशभक्तांना प्रसादाचे वाटप केले जाते. तेथील रहिवासी फिरोज सय्यद सांगतात, “या भागातील सर्व समाजातील नागरिक गुण्यागोविंदाने राहत आहेत. आम्ही कोथरूडचे गावकरी प्रत्येक सण प्रेमाने, एकोप्याने साजरे करतो आम्हाला या गोष्टीचा अभिमान आहे.”
या मंडळाद्वारे केवळ गणेशोत्सवच नाही तर इतर सणही मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरे होतात. याबाबत बोलताना रहिवासी इम्तियाज काझी म्हणतात, “कोथरूड म्हणजे, हिंदू-मुस्लीम एकतेचे आहे. दोन्ही समुदाय एकत्र येऊन गणेशोत्सव, ईदसारखे सण उत्साहाने साजरे करतात. सामाजिक उपक्रमाद्वारे इथे एकतेची भावना वाढवली आहे. आम्ही अगदी घरच्यासारखे एकमेकांकडे जाऊन आनंदोत्सव साजरे करतो.”
थोडक्यात पुण्यातील गणेशोत्सवाचे मूळ केवळ धार्मिक कल्पनांशी जोडलेले नाही. या उत्सवामुळे विविध जाती- धर्माचे आणि समाजातील विविध घटक एकत्र येतात. अशा प्रकारे गणपती मंडळे एकत्र येऊन समाजकार्याचा वसा घेतात. कोथरूडचे समस्त गावकरी मंडळ देखील समाजकार्यात आघाडीवर आहे. अनाथ व अंधशाळेस मदत, गरजूंना विनामूल्य ऑक्सिजन मशिन, नैसर्गिक आपत्तीच्या वेळी अत्यावश्यक मदत, ग्रामदैवत म्हातोबा उत्सव व कीर्तन अशा प्रकारचे उपक्रम मंडळाच्या वतीने वर्षभर राबवले जातात.
२०२३ मधील आरतीचे मानकरी युसूफभाई
मुस्लीम बांधवांच्या हस्ते होणाऱ्या या आरतीचा मान गेल्या वर्षी युसूफ भाई यांना मिळाला होता. तर यंदाच्या आरतीसाठी इम्तियाज काझी, फिरोज सय्यद, समीर सय्यद, जमिल सय्यद, मोसान सय्यद, जावेद सय्यद, मुविन काझी, हनुमंत पाटील, शिवाजी गाढवे, माऊली मोकाटे आणि आदी उपस्थित होते.