तब्बल चौदाशे वर्षांपासून एकत्र राहूनही मुस्लिम समाजातील धार्मिक परंपरा, महापुरुष, त्यांचा धार्मिक आणि सामाजिक इतिहास यांच्याविषयी सर्वसामान्यांना फार कमी माहिती असते. हिंदू-मुस्लिम यांच्यातील अविश्वासाचे आणि संघर्षाचे हे ही एक मह्त्त्वाचे कारण आहे. कोणत्याही मुस्लीम राजाचा उल्लेख झाला की आपल्यासमोर पहिल्यांदा औरंगजेबच येतो. पण चांगली आणि वाईट माणसे सर्व समाजात नेहमीच अस्तित्वात असतात आणि यापुढेही राहतील. मुस्लिमांमध्येही परोपकारी व्यक्ती, महान योद्धे, सत्प्रवृत्त आत्मा आणि न्यायप्रेमी सम्राट झाले आहेत. एखाद्या समाजातील महापुरुषांच्या चरित्रांचा अभ्यास त्या समाजाविषयी आत्मीयतेला जन्म देतो यात शंका नाही. हिजरी या इस्लामी कालगणनेनुसार नुकतेच मुस्लीमांचे नवे वर्ष सुरु झाले आहे. मोहरम हा त्यातील पहिला महिना. जगभरातील मुस्लिमांच्या दृष्टीने या महिन्याला विशेष महत्त्व आहे. विशेषतः त्यातले पहिले दहा दिवस करबलाच्या ऐतिहासिक घटनेमुळे विशेष महत्त्वाचे मानले जातात. याच पार्श्वभूमीवर 'आवाज मराठीवर' १० मोहर्रम म्हणजे २८ जुलैपर्यंत या विषयाशी संबंधित विशेष लेख प्रसिद्ध होणार आहेत. मोहरमच्या इतिहासाचा धावता आढावा घेणारा हा लेख...
मोहरम म्हटले, की रंगीबेरंगी विविध आकारांच्या विविध उंचीच्या ताबुतांच्या मिरवणुका. या ताबुतांबरोबरच निघणाऱ्या पंजे, सवारी व निशाण यांच्या मिरवणुका. बंधुभाव वाढीस लागावा म्हणून सर्वांनी एकत्र बसून खायचा खिचडा. मिरवणुकांमध्ये प्रसादरूपाने वाटण्यात येणारे सरबत व रोट. घरामध्ये चोंगे व रोट या गोड पदार्थांची रेलचेल, खरे तर हे सर्व मोहरमचे बाह्य स्वरूप होय. मोहरमचे अंतर्गत स्वरूप आपणास समजून घ्यायचे असल्यास मोहरमचा नेमका इतिहास समजून घ्यायला हवा.
मोहरम हा चांद्र वर्षाचा पहिला महिना आहे. इस्लामच्या पूर्वी आणि नंतरदेखील हा महिना पवित्र व श्रेष्ठ मानला जातो. मोहरमच्या या दहा तारखेला इस्लामच्या इतिहासात बऱ्याच महत्त्वाच्या घटना घडल्या. इस्लामपूर्व कालखंडातील काही घटनांचा येथे उल्लेख करणे आवश्यक आहे. आदम जे अल्लाचे पहिले पैगंबर होते, त्यांनी याच दिवशी त्यांच्याकडून घडलेल्या प्रसंगाबद्दल अल्लाची क्षमायाचना केली व परमेश्वराने त्यांना माफ केले. याच दिवशी इब्राहिम यांची बादशहा नमरुद याने अग्निपरीक्षा घेतली व अल्लाने त्यांचे अग्नीपासून संरक्षण केले. याच मोहरमच्या दहाव्या दिवशी मुसा यांनी इजिप्तच्या नाईल नदीतून मार्ग काढून अल्लाने त्यांना सुरक्षितपणे नदीच्या दुसऱ्या किनाऱ्यावर पोचविले, तर त्यांचा पाठलाग करणाऱ्या फिरऔनच्या सैनिकांना जलसमाधी दिली. याच पवित्र दिवशी नूह यांच्या काळात प्रचंड जलप्रलय होऊन त्यात पापी व दुष्ट लोक बुडाले व नूह आपल्या काही निवडक अनुयायांसह जूदी नदीच्या पर्वतावर आपल्या होडीच्या साह्याने सुखरूप पोचले.
मुसा हे फिरऔनच्या अत्याचारापासून मुक्त झाले, म्हणून ज्यू किंवा यहुदी लोकांप्रमाणेच मुस्लिमांनीही मोहरमच्या दहाव्या दिवशी उपवास करावा, असा आदेश मोहंमद पैगंबर यांनी दिला, त्याला 'आशुरा' असे म्हणतात. मोहंमद पैगंबर यांच्या जीवनात हा 'आशुरा'चा दिवस आनंदोत्सव म्हणून साजरा करण्यात येत असे; परंतु दुर्दैवाने या शुभ महिन्याच्या दिवशी एक अशी अत्यंत अमंगल व शोकपूर्ण घटना घडलीं, को त्या घटनेच्या केवळ स्मरणाने प्रत्येक मुस्लिम दुःखी होतो व त्याची मान शरमेने खाली झुकते. ती दुःखद घटना म्हणजे मोहंमद पैगंबर यांची कन्या फातिमा यांचे द्वितीय सुपुत्र इमाम हुसैन यांना याच आशुराच्या दिवशी म्हणजे मोहरमच्या दहाव्या तारखेस म्हणजेच २२ ऑक्टोबर ६७५ इसवी रोजी हौतात्म्य प्राप्त झाले.सुन्नी
त्या काळी खिलाफतचा म्हणजेच इस्लामी शासनाचा प्रमुख प्रणेता खलिफा यजीद होते. यजीद यांनी त्यांचे वडील ह. मोव्हिया यांच्यानंतर राजेशाही मार्गाने हे खलिफापद मिळविले होते. राजेशाही मार्ग अंगीकारल्यामुळे त्यांचा हेतू प्रदेश जिंकणे, लोकांकडून खंडणी वसूल करणे, संपत्ती मिळविणे आणि इहलोकी विलासी जीवन व्यतीत करणे, हा होता. यजीद यांच्या या वृत्तीमुळे ज्या उदात्त हेतूने इस्लाम धर्माचे प्रणेते व ईश्वराचे दूत मोहंमद पैगंबर यांनी इस्लामची मूलभूत वैचारिक बैठक किंवा घटना राज्यकार्यासाठी दिली होती, ती बैठकच मोडीत निघाली होती. म्हणून मोहंमद पैगंबर यांचे नातू इमाम हुसैन यांनी या यजीद यांच्या घटना फेरबदलाला तीव्र आक्षेप घेतला. प्रस्थापित व भक्कम राजेशाहीविरुद्ध आवाज उठविला व जे वाईटात वाईट परिणाम भोगावे लागतील, त्या परिणामांस सामोरे जाऊन आणि त्यातून उद्भवणारा धोका पत्करून या अनिष्ट फेरबदलाला रोखण्याचे प्रयत्न करायला हवेत, म्हणून इमाम हुसैन यांनी यजीदचे नेतृत्व अमान्य केले आणि आपली बायकामुले, जवळचे नातेवाईक यांच्यासह मदिना शहर सोडून कुफा शहराकडे प्रयाण केले.
इमाम हुसैन यांना फसवून कुफा या शहरात बोलाविण्यात आले होते. कर्बलाच्या मैदानावर खलिफा यजीद यांच्या सैन्याने त्यांच्यावर अचानक हल्ला केला व कर्बलाचे रणकंदन घडले. अत्यंत हालहाल करून इमाम हुसैन यांच्या कुटुंबीयांना ठार मारण्यात आले. इमाम हुसैन यांच्या या बलिदानाच्या घटनेच्या स्मरणार्थ काही लोक मोहरममध्ये 'ताजिये' (ताबूत) 'अलम' म्हणजे निशान, सवारी यांच्या मिरवणुका काढतात. 'मातम' म्हणजे शोक आणि 'सीना कोबी' म्हणजे 'छाती बडवणे' वगैरे कृत्ये करतात; तसेच मोहरमचे दहाही दिवस शोक सभा आयोजित करून हज. इमाम हुसैन यांच्या हौतात्म्याबद्दल शोक व्यक्त करतात व रडतात. हा शोक पुढील महिना म्हणजे सफर महिन्याच्या २० तारखेपर्यंत चालतो. कारण त्या दिवशी चेहलम (चाळीस दिवसांचे श्राद्ध) असतो.
मोहरमचे सर्वाधिक प्रस्थ इराक, इराण या शियाबहुल देशांमध्ये आहे. भारतात लखनौ येथे, तर महाराष्ट्रात नगर, पुणे, मिरज, खानापूर व कडेपूर येथे आहे. 'सांगली जिल्ह्यातील खानापूर व कडेपूर येथे तर हिंदू बांधव फार मोठ्या संख्येने मोहरममध्ये भाग घेतात. भारत आणि इतर देशांतील मोहरमच्या प्रथेमध्ये फरक जाणवतो. काही ठिकाणी ताबुतांना प्राधान्य देण्यात येते, तर काही ठिकाणी शोक प्रदर्शन अधिक असते. त्यातही शोक प्रदर्शनाच्या भित्र भिन्न तन्हा असतात. वरील सर्व बाबींची प्रथा शिया बांधवांमध्ये अधिक असते.
सुन्नी मुसलमान मात्र सामूहिकरीत्या शोक प्रदर्शनात भाग घेताना फारसे दिसत नाहीत. त्यांचा दृष्टिकोन शिया बंधूंपेक्षा भिन्न आहे. इमाम हुसैन यांचे हौतात्म्य - म्हणजे अतुलनीय शौर्य, पौरुष व पराक्रमाचे अनुपम कृत्य मानतात. हुसैन व त्यांच्या अनुयायांवर झालेल्या निर्दयी हत्येचा निषेध करतात; परंतु शिया बंधूंप्रमाणे शोक प्रदर्शन करत नाहीत. सुन्नी मुस्लिम इमाम हुसैन यांच्यासाठी 'दुआ' मागत फिरत, अर्थात अल्लाहजवळ. मृतात्म्यास चिरशांती लाभो, अशी ते प्रार्थना करतात व त्यांना 'इसाले सवाब' म्हणजे 'पुण्यकर्माचे फळ मिळो' यासाठी प्रार्थना करतात.
इमाम हुसैन यांचे बलिदान म्हणजे सत्यासाठी प्रसंगी प्राण अर्पण करणे, पापी लोकांविरुद्ध दंड थोपटून उभे राहणे आणि दुष्टांचा नायनाट करताना प्रसंगी जिवावरही उदार होणे, असा होय. त्यांचा हा संदेश आजही खेड्यापाड्यातून शहराशहरांतून मोहरमच्या ताबुतांच्या मिरवणुकांच्या माध्यमातून जनसामान्यांपर्यंत पोचतो आहे. या मिरवणुकांमध्ये हिंदू बांधव मोठ्या प्रमाणात हिरिरीने भाग घेताना दिसतात. राष्ट्रीय एकात्मतेचा जणू तो हृद्य सोहळाच असतो. मोहरम म्हणजे हिंदू-मुस्लिमांचे ऐक्य साधणारा उत्सवच असतो.
- डॉ. एस. एन. पठाण
(लेखक माजी उच्च शिक्षण संचालक व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाचे माजी कुलगुरू आहेत.)