प्रज्ञा शिंदे
भारत हा बहुधर्मी देश आहे. अगदी प्राचीन काळापासून सर्वधर्मसमभावचे तत्व प्रत्येक भारतीय अनुभवत आला आहे. विशेषतः गंगा यमुना संकृती म्हणजेच हिंदु मुस्लीम भारतच्या धार्मिक एकतेचे प्रतीक आहे. भारतात प्रत्येक व्यक्ती स्वतःचे सण स्वतःच्या चालीरीती आणि परंपरा इतरांच्या स्वातंत्र्याला बाधा न आणता जोपासत असतो. इथे हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन प्रत्येक भारतातील धर्मीय आपले सण एकत्रितपणे आणि उत्साहात साजरा करत असतात.
धार्मिक एकता दर्शवणाऱ्या अनेक सणांपैकी एक सण म्हणजे नवरात्र. नुकतीच नवरात्रीला सुरुवात झाली आहे. याच निमित्ताने वाचा राजस्थानच्या एका अनोख्या दुर्गा मंदिराविषयीचा हा विशेष लेख...
हिंदूंच्या असंख्य देवतांपैकी माता दुर्गा ही एक मुख्य देवी आहे. त्यामुळे दुर्गा मातेचे मंदिर म्हटलं की ब्राम्हण पुजारी असणारच. पण जर आम्ही तुम्हाला सांगितलं की या मंदिरात एकही हिंदू - ब्राम्हण पुजारी नाही तर आश्चर्य नक्कीच वाटेल. पण मग या मंदिरात पुजारी नाही का ? तर आहेत. मात्र या मंदिरात मुस्लिम पुजारी आहेत. एक किंवा दोन नव्हे तर तब्बल ६०० वर्षांपासून हे मुस्लिम पुजारी कुटुंब देवीची सेवा करत आहेत.
राजस्थानातील जोधपुर मधील भोपाळगड तालुक्यातील बगोरिया गावातील हे मंदिर सामाजिक एकता आणि धार्मिक सलोख्याचा दीपस्तंभ ठरत आहे. या मंदिरात माता दुर्गेची पूजा करण्यासाठी सर्व जाती-धर्माचे लोक मोठ्या संख्येने मंदिरात येतात. मंदिराचे मुख्य पुजारी जलालुद्दीन खान आणि त्यांचे कुटुंब मंदिरात प्रार्थना ही करतात आणि मस्जिदमध्ये नमाज ही पढतात.या अनोख्या पुजारी आहेत.
जलालुद्दीन खान सांगतात, "गेल्या सहाशे वर्षांपासून माझे कुटुंब आणि पूर्वज या मंदिरात मुख्य पुजारी म्हणून सेवा करत आहेत. सर्व समाजातील भाविक या ठिकाणी प्रार्थना करण्यासाठी येतात. ते आम्हाला त्यांच्या घरीदेखील विधी करण्यासाठी बोलावतात. इतर भाविकांप्रमाणेच आमचीही दुर्गादेवीवर अपार श्रद्धा आहे."
जलालुद्दीन खान यांच्या नंतर त्यांचा मुलगा मेहरुद्दीन खान मुख्य पुजारी बनेल असे त्यांनी घोषित केले आहे. याविषयी मुलगा मेहरुद्दीन खान म्हणतो, "भक्तीपासून कोणताही धर्म तुम्हाला रोखत नाही. त्यामुळे आमचे कुटुंबीय मंदिरात विधी करतात आणि मस्जिदमध्ये नमाजही अदा करतात." जलालुद्दीन खान आणि त्यांच्या पूर्वजांचा दुर्गा मंदिराशी असलेला संबंध हिंदू धर्मातील कोणत्याही पौराणिक कथेप्रमाणेच आहे.
काय आहे मंदिराची आख्यायिका
जलालुद्दीन खान यांचे पूर्वज सिंध प्रांतातील असल्याचे सांगितले जाते. त्यावेळी प्रचंड दुष्काळामुळे कुटुंबासह अन्न आणि निवारा शोधत मध्य भारतात ते स्थलांतरित झाले. जेव्हा कुटुंबातील सदस्य भारतामध्ये येत होते तेव्हा त्यांचे दोन उंट जखमी झाले आणि त्यांना वाळवंटाच्या मध्यभागीच थांबावे लागले. कुटुंबातील सर्व सदस्यांना अन्नपाण्यांना वाळवंटात अनेक दिवस राहावे लागले. केव्हा हे सगळे मृत्यूच्या मुंबई ठावर होते तेव्हा दुर्गा माता त्यांच्या पूर्वजांपैकी एकाच्या स्वप्नात आले आणि तिने त्यांना जवळच्या विहिरीचा रस्ता दाखवला. त्यामुळे या संपूर्ण कुटुंबाचे प्राण वाचले. तेव्हा पासून हे पूर्ण कुटुंब दुर्गा मातेची सेवा करत आहेत.
त्याचबरोबर अशीही आख्यायिका आहे की प्रत्यक्षात दुर्गा मातेने स्वप्नामध्ये येऊन खान यांच्या पूर्वजांना विहिरीच्या तळाशी असलेल्या तिच्या मूर्तीची पूजा करण्याचे निर्देश दिले होते. तेव्हा खान यांच्या पूर्वजांनी मूर्ती विहिरीतून बाहेर काढली आणि तिची पूजा करण्यास सुरुवात केली. तेव्हापासून समृद्धी आणि भरभराट झाली असा त्यांचा विश्वास आहे. त्यामुळे त्याच ठिकाणी देवीचे पुजारी म्हणून सेवा देण्याचा निर्णय खान यांच्या पूर्वजांनी ६०० वर्षांपूर्वी घेतला आणि आजही जलालुद्दीन खान यांनी ती परंपरा जपली आहे.