फजल पठाण
महाराष्ट्राला मोठी सांस्कृतिक परंपरा लाभली आहे. याठिकाणी प्रत्येक सण मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने पार पडतो. त्यापैकी सर्वांत महत्त्वाचा सण म्हणजे गणेशोत्सव. सार्वजनिक मंडळांसह घरोघरी गणरायाचे आगमन झाले. राज्यात गणपतीची अनेक मंदिरे असून या गणपती मंदिरामागे रंजक इतिहास आहे. यापैकी एक मंदिर म्हणजे धुळे शहरातील इंग्रज काळातील खुनी गणपती. हिंदू- मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या गणपतीचा इतिहास सांगणारा हा विशेष लेख..
खूनी गणपतीचा इतिहास
जुने धुळ्यातील मनाचा गणपती म्हणून खूनी गणपतीची ओळख आहे. याविषयीची आख्यायिका सांगताना माजी आमदार प्रो. शरद पाटील म्हणतात, “अशी आख्यायिका आहे की, जुने धुळे परिसरात पांजरा नदी आहे. या नदीला पुर आला होता त्यावेळी खूनी गणपतीची मूर्ती या पुराच्या पाण्यात वाहून आली. २०० वर्षांपूर्वी पांजरा नदी काठी हे मंदिर वसवण्यात आले. तेथे या मूर्तीची स्थापना केली.”
१२७ वर्षांची परंपरा असणाऱ्या हा खूनी गणपतीच्या नावाचा इतिहास सांगताना मंडळाचे कार्यकारी सदस्य सेवालाल ढोले सांगतात, “याठिकाणी गणेशोत्सवाला सुरुवात झाल्यानंतर १९०४ मध्ये धुळे शहरातील जुन्या शाही जामा मस्जिदीवरुन गणपती विसर्जनाची मिरवणूक जात होती. त्यावेळी या गणपतीच्या मिरवणुकीला काही मंडळींनी विरोध केला. या विरोधाचे रूपांतर आधी भांडणात आणि काही वेळात हाणामारीमध्ये झाले. यावेळी ब्रिटीश पोलिसांनी जमावावर गोळीबार केला. त्यामध्ये काही लोक मृत्यूमुखी पडले. यानंतर धुळ्यातील स्थानिक लोकांमध्ये गणपती मिरवणुकीवेळी मस्जिदीच्या परिसरात खून होतात, अशी समजूत रुढ झाली. या चर्चांमधून धुळ्यातील या गणपतीचे नाव ‘खुनी गणपती’ पडले.”
‘खूनी गणपती’च्या उत्सवाची सुरुवात
१८६५ मध्ये खूनी गणपतीची स्थापना झाल्याचे मानले जाते. १८९५ मध्ये म्हणजेच ब्रिटिश राजवट लागू झाली. लोकमान्य टिळक यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली. याविषयी बोलताना सेवालाल ढोले म्हणतात,“इंग्रजांच्या काळात लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाला सुरुवात केली. आमच्या येथे खांबेटे गुरुजी नावाचे स्वातंत्र्य सैनिक होते. टिळकांच्या प्रेरणेतून समाजाला जोडण्यासाठी खांबेटे गुरुजींनी धुळ्यात सार्वजनिक गणेशोत्सव सुरु केला.”
धुळे शहरातील मध्यवर्ती ठिकाणी खुनी गणपतीची स्थापना केली जाते. हा उत्सव आजही अविरतपणे सुरू आहे. गणेशोत्सवासाठी शहरातील सर्वसमाज बांधव एकत्र येतात. खुनी गणपतीच्या आगमनाची मिरवणूक टाळ मृदुंगच्या गजरात काढली जाते.
खूनी गणपतीच्या आगमन मिरवणुकी विषयी बोलताना सेवालाल ढोले सांगतात, “मारुतीच्या मंदिरासमोर पाच भजन केल्यानंतर खूनी गणपतीच्या मिरवणुकीला सुरुवात होते. ज्ञानोबा आणि तुकाराम यांचा जयघोष करत टाळ मृदुंगच्या गजरात मिरवणूक निघते. विशेष म्हणजे गणपतीचे आगमन होत असताना त्यावर कोणत्याही गुलालाची उधळण केली जात नाही. पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढली जाते.”
मिरवणुकीचे स्वागत मुस्लिम बांधवांकडून
या गणपती मिरवणुकीला हिंदू-मुस्लीम संघर्षाचा इतिहास होता. मात्र पुढच्या पिढ्यांनी एकमेकांच्या धर्माचा आदर करत नवा इतिहास रचला. पूर्वी मस्जिदसमोरून मिरवणूक निघाली म्हणून गोळीबार झाले. आता मात्र हा ‘खुनी’ इतिहास पुसला गेलाय आणि इथे सौहार्दाचा नवा इतिहास लिहिला गेलाय.
खूनी गणपतीची विसर्जनाची मिरवणूक जामा मस्जिद समोरून जात असताना मस्जिदीमधील मौलाना स्वतः मस्जिदीच्या प्रवेशद्वारावर या खुनी गणपतीचे स्वागत करतात. त्याठिकाणी मिरवणूक आल्यावर मुस्लिम बांधव फुलांची उधळण करीत मिरवणुकीचे स्वागत करतात. यावर मस्जिदमधील मुस्लिम कार्यकर्ते सांगतात, “गेल्या अनेक वर्षांपासूनची ही परंपरा आहे. अल्लाहच्या कृपेने आम्ही दोन्ही समाज बांधव हा सण आनंदाने साजरा करतो. याठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडत नाही. “
मस्जिदसमोर आरती झाल्यानंतर गणपती मिरवणूक विसर्जनासाठी मार्गस्थ होते. धुळ्यातील अनेक स्थानिक लोकांच्या मतानुसार मस्जिदीसमोर आल्यानंतर गणपतीची मुर्ती जड होते. या आगळ्या वेगळ्या परंपरेमुळे हा गणपती हिंदू मुस्लिम एक्याचे प्रतीक बनला आहे.
मिरवणुकीत टाळ मृदुंग आणि बारा पावली
अनंत चर्तुदशीला गणपतीची विसर्जन मिरवणूक पालखीतूनच निघते. यावेळी पारंपारीक टाळ-मृदुंगाच्या गजरात तिनपावली, बारापावली नृत्य भाविकांकडून सादर केली जातात. विशेष म्हणजे मिरवणुकीत कधीही बॅण्ड पथक अथवा डीजेचा वापर आजपर्यंत केला गेलेला नाही.
५००० लोकांना होते प्रसादाचे वाटप
सण समारंभ आणि देव म्हणले की प्रसादही आलाच. गणपतीला नैवेद्य दाखवण्यासाठी मोदक दिले जातात. खूनी गणपती मंडळ तब्बल पाच हजार भाविकांना प्रसादाचे वाटप करते. याविषयी बोलताना सेवालाल ढोले म्हणतात,” गेल्या अनेक वर्षांपासून या गणपतीच्या ठिकाणी हिंदू मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात भंडाराचे (प्रसादाचे) आयोजन करतात. गणारायच्या आशीर्वादाने आणि मुस्लिम बांधवांच्या मदतीने दरवर्षी किमान ५००० भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात येते.”
आज अनेक गोष्टींवरून समाजात तेढ निर्माण होताना आपण पाहतो. परंतु आजही महाराष्ट्रात अशी सार्वजनिक मंडळे आहेत जे धार्मिक सलोखा जपण्याचे काम करत आहे. रक्तरंजित इतिहास असलेल्या खूनी गणपती आणि तेथील हिंदू-मुस्लीम कार्यकर्त्यांनी इतिहासातून बोध घेत धार्मिक सलोख्याची दाखवलेली नवी वाट सर्वांनाच प्रेरणादेणारी आहे.
- फजल पठाण
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -
Awaz Marathi WhatsApp Group
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter