श्रीनगरच्या ऐतिहासिक 'क्लॉक टॉवर'वर फडकला तिरंगा

Story by  Pooja Nayak | Published by  Pooja Nayak • 1 Years ago
क्लॉक टॉवर
क्लॉक टॉवर

 

देशाच्या ७६व्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर आज सकाळी जम्मू आणि काश्मीरमध्ये ऐतिहासिक लाल चौकात राष्ट्रीय ध्वज फडकवण्यात आला. जम्मू-काश्मीरची उन्हाळी राजधानी असणाऱ्या श्रीनगरच्या ऐतिहासिक क्लॉक टॉवरवर हा तिरंगा फडकवण्यात आला.

श्रीनगर महानगरपालिकेचे आयुक्त अतहर अमीर खान यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर एक पोस्ट लिहिली. त्यात ते म्हणाले की, “श्रीनगर येथील लाल चौकात नवीन क्लॉक टॉवरवर (घंटाघर) राष्ट्रध्वज फडकवण्यात आला. यासाठी श्रीनगर महानगरपालिकेचे आणि स्मार्ट सिटी कर्मचाऱ्यांनी उत्कृष्टरीत्या ही जबाबदारी पार पाडली."

लाल चौकातील ‘क्लॉक टॉवर’चा इतिहास :
श्रीनगरच्या लाल चौकात उभा असणारा हा टॉवर तेथील स्थापत्यकलेच्या वारशाचा उत्तम नमुना आहे. १९७८ मध्ये हा टॉवर बांधण्यात आला होता. सध्या G२० च्या निमित्ताने स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत या ऐतिहासिक क्लॉक टॉवरची पुनर्बांधणी करण्यात आली. यात फक्त त्यांनी त्या टॉवरची बांधणी न करता, नवीन डिझाइनचे बांधकाम केले. त्यावर नवे घड्याळ ही लावण्यात आले. ही नवीन घड्याळ समृद्धी, प्रगती आणि आनंदाचे प्रतीक बनायला हवे, अशी अपेक्षा खान यांनी व्यक्त केली.
 
जम्मू-काश्मीरच्या सध्याच्या प्रशासनाने श्रीनगर शहराला आकर्षक बनवण्यासाठी स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत अनेक प्रकल्प हाती घेतले आहेत. यात सायकल ट्रॅक तयार करणे, रस्त्यालगत झाडे लावणे, राष्ट्रीय महामार्गाच्या भिंती रंगवणे, वाय-फाय झोन तयार करणे, आदी कामे करण्यात आली.