नाशिकच्या चांदोरीतील मुस्लीम समाजाने घेतला 'हा' ऐतिहासिक निर्णय

Story by  आवाज़ मराठी | Published by  Chhaya Kavire • 1 Years ago
हिंदू मुस्लीम बांधव
हिंदू मुस्लीम बांधव

 

आजही धर्मांध भिंतींपलीकडून एकमेकांवर जीवापाड प्रेम करणारे, एकमेकांच्या धार्मिक अधिष्ठानाप्रती आस्था बाळगणारे अनेक लोक ठिकठिकाणी आपणाला आढळतात. त्यातीलच एक ठिकाण म्हणजे ऐतिहासिक गाव असलेले नाशिक जिल्ह्यातील चांदोरी. या गावात अजान व भजन दोन्ही समुदायातील नागरिक तितक्याच श्रद्धेने करतात. ही या गावाची भक्तिमय ओळख आहे.

आपण अनेकदा पाहतो, की काही स्वार्थी लोक आपला केवळ स्वार्थ साधण्यासाठी समाजामध्ये तेढ निर्माण करत असतात. हिंदू-मुस्लिमांमध्ये तेढ निर्माण करणारे आपण अनेकजण पाहतो. मात्र, या सर्व गोष्टींचा चांदोरी येथील ग्रामस्थांना कोणतीही बाधा होत नाही. कारण येथील लोक एकमेकांसोबत एकमेकांच्या धर्माचा आदर करून गुण्यागोविंदाने राहतात.

महाराष्ट्रात सर्वांना प्रिय असलेला गणेशोत्सव येत्या १९ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. गणेशोत्सवाचे १० दिवस मुंबईसह राज्यात मोठा उत्साह असतो. यंदा अनंत चतुर्दशी २८ सप्टेंबरला आहे. त्याचदिवशी मुस्लिम बांधवांची ईद ए मिलाद आहे. हिंदू आणि मुस्लिम दोघांसाठी २८ सप्टेंबरचा दिवस महत्त्वाचा आहे. गणेश चतुर्थीपासून मनोभावे गणपती बाप्पाची पूजा, आराधना केली जाते. अनंत चतुर्दशीच्या दहाव्या दिवशी राज्यभरात गणेश विसर्जन मिरवणुका निघतात.

मोठ्या संख्येने भाविक रस्त्यावर उतरतात. शहरात विसर्जन मिरवणुकीचा मोठा उत्साह असतो. मोठी गर्दी रस्त्यावर असते. हीच बाब लक्षात घेऊन चांदोरीतील मुस्लिम समुदायाने ईद ए मिलाद मिरवणूक पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

चांदोरीतील मुस्लिम बांधव शुक्रवारी (ता. २९) ईद ए मिलाद साजरी करणार आहेत. धार्मिक सहिष्णुता आणि सलोख्याच्या दृष्टीकोनातून हा निर्णय घेतला आहे. याबाबत चांदोरी येथील मुस्लिम पंच कमिटीचे मुश्ताक इनामदार मौलाना शहाबुद्दीन रजवी म्हणाले, "गणेशोत्सव हा आमच्या हिंदू बंधूंचा सण आहे. १० दिवस हा उत्सव असतो. शेवटच्या दिवशी गणेश विसर्जन मिरवणुका निघतात. त्यामुळे ईद मिलाद उन नबीची मिरवणूक २८ सप्टेंबरऐवजी २९ सप्टेंबरला काढण्याचा निर्णय घेतला आहे."

तर, आदर्श युवा प्रतिष्ठानचे संस्थापक सिद्धार्थ वनारसे मुस्लीम बांधवांच्या निर्णयाचे कौतुक करत म्हणाले, "चांदोरी गावची असलेली शांततामय ओळख या निर्णयाने जपली जाणार आहे. मुस्लिम बांधवांचा हा निर्णय कौतुकास्पद आहे." 
 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध झालेल्या धार्मिक सौहार्दाच्या या बातम्याही जरूर वाचा 👇🏻 

 
 
 
 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज, पॉडकास्ट, चर्चा आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -