लातूरने सातत्याने हिंदू मुस्लिम ऐक्याचे दर्शन दाखवून दिले आहे. या वर्षी देखील हे ऐक्याचे दर्शन पहायला मिळत आहे. या वर्षी गणेश विसर्जन व ईद-ए-मिलाद हे दोनही सण ता. २८ सप्टेंबर रोजी एकाच दिवशी आले आहेत. त्यामुळे या दिवशी ईद-ए-मिलाद साजरी न करता ता. २९ सप्टेंबर रोजी साजरी करण्याचा निर्णय लातूर जिल्हा ईद-ए-मिलादुन्नबी समितीने घेतला आहे. या निमित्त काढली जाणारी कौमी एकता रॅली रद्द करण्याचाही निर्णय समितीने घेतला आहे.
लातूर जिल्हा ईद-ए-मीलादुन्नबी समितीची येथे बैठक झाली. या बैठकीत लातूर जिल्हा ईद-ए-मिलादुन्नबी समितीच्या अध्यक्षपदी हाजी शेख नासर गफुरसाब यांची तर उपाध्यक्षपदी सय्यद महेबूब शफियोदिन काझी व शेख अरबाज अब्दुल सतार यांची निवड करण्यात आली. सचिव म्हणून अॅड. सरफराज पठाण यांची निवड करण्यात आली.
यावर्षी गणेश विसर्जन व ईद-ए-मिलाद हे ता. २८ सप्टेंबर रोजी एकाच दिवशी आले आहेत. येथे गणेश विसर्जनाच्या मोठ्या मिरवणुका निघतात. रस्त्यावर गणेश भक्तांची मोठी गर्दी राहते. रात्री उशिरापर्यंत हा मिरवणुका सुरु राहतात. शहारातील सर्वच रस्ते गर्दीने फुलून जातात. तर दुसरीकडे ईद-ए-मिलाद या सणाच्या निमित्ताने मुस्लिम बांधवांकडून देखील विविध धार्मिक सामाजिक, सांस्कृतिक उपक्रम घेतले जातात.
दोनही सण एकत्र आल्याने अधिकच गर्दी होवू शकते. पण हे दोनही सण उत्साहात व शांततेत पार पडावेत या करीता समितीने ता. २८ ऐवजी ता. २९ सप्टेंबर रोजी ईद-ए-मिलाद साजरा करण्याचा निर्णय घेत सामाजिक ऐक्याचे दर्शन घडवले आहे. या बैठकीत कलीम रजा कुरेशी, हाजी शफियोद्दीन, यासीन कच्छी, सरफराज मणियार, अफजल कुरेशी, रियाज कुरेशी, अय्याज पठाण, सलीम घंटे, शेख जफर नुरअली, मुस्तफा शेख, सरफराज पठाण, इम्रान गोंद्रीकर व संस्थापक सचिव उमरदराज खान आदी उपस्थित होते.
प्रशासनाच्या विनंतीला मान
जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे आणि पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या विनंतीला मान देऊन गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमिवर ईद-ए-मिलाद ता. २९ सप्टेंबर रोजी घेण्याचा निर्णय या समितीने घेतला आहे. तसेच या वर्षीची कौमी एकता मोटारसायकल रॅली रद्द करण्यात आली आहे. शहरातील शांतता व सुव्यवस्था अबादित राहण्याकरिता व सामाजिक सलोखा राखण्यास व समाजकार्यात ही समिती नेहमीच अग्रेसर असते. हेही यावेळी समितीने दाखवून दिले आहे.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध झालेल्या धार्मिक सौहार्दाच्या या बातम्याही जरूर वाचा 👇🏻
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज, पॉडकास्ट आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -