हिंदू-मुस्लीम सौहार्दाची साक्ष देणारे नगरचे विशाल गणपती मंदिर

Story by  Fazal Pathan | Published by  Fazal Pathan • 2 Months ago
अहमदनगरचे विशाल गणपती मंदिर
अहमदनगरचे विशाल गणपती मंदिर

 

फजल पठाण 

आपला भारत देश धार्मिक आणि सांस्कृतिक विविधतेने नटलेला आहे. याच विविधतेत एकता आणि बंधुभाव निर्माण करण्यासाठी महाराष्ट्रात गणेशोत्सवाची सुरुवात झाली. या गणेशोत्सवाची परंपरा आजही सार्वजनिक मंडळे जपत आहेत. अहमदनगरचे विशाल गणपती ट्रस्ट हीच परंपरा जपण्याचे काम करत आहे.      

बेंबीवर फणाधारी नाग, डोक्‍यावर पेशवेकालीन पगडी आणि साडेअकरा फूट उंचीची भव्य मूर्ती…. अहमदनगरच्या विशाल गणपतीची ही वैशिष्ट्ये. अहमदनगरचे ग्रामदैवत आणि नवसाला पावणारा गणपती म्हणून श्री विशाल गणपतीची राज्यभर ख्याती आहे. 

विशाल गणपतीचा इतिहास 
विशाल गणपती अहमदनगर शहराचे ग्रामदैवत असले तरी येथे संपूर्ण राज्यभरातून भक्त दर्शनासाठी येतात. साडेसातशे ते आठशे वर्षांपासून विशाल गणेश अस्तित्वात असल्याचे पुरावे मोडी लिपीत आढळून आले आहेत. हे दस्तावेज नगरमधील उद्योजक व हॉटेल व्यावसायिक विनायक नामदेवराव कोके पाटील यांच्याकडे उपलब्ध आहेत. सध्याचे विशाल गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अभय आगरकर गणपतीच्या इतिहासाबद्दल सांगतात, “गणेश पुरानामध्ये विशाल गणपतीचे उल्लेख आढळत असल्याचे ज्येष्ठ पत्रकार श्रीपाद मिरीकर सांगतात. याबद्दल मंडळाकडे लिखित पुरावे नसले तरी शोकडो वर्षांपासून गणपती अस्तित्वास असल्याचे आमचे जाणकार मंडळी सांगतात.” 
 

अशा आहेत आख्यायिका 
वास्तु जेवढी पुरातन त्याबद्दल तितक्याच आख्यायिका प्रचलित असतात. विशाल गणपती देखील याला अपवाद नाही. आवाज मराठीने याबद्दल विचारले असता अभय आगरकर सांगतात, “या गणपती विषयी दोन आख्यायिका सांगितल्या जातात. या मंदिरातील विशाल गणपतीची मूर्ती स्वयंभू मानली जाते.ही मूर्ती दररोज तीळाएवढी वाढते, त्यामुळेच ती एवढी मोठी झाली. ही मूर्ती वाढतच राहिली तर अडचण निर्माण होऊ शकते. त्यामुळे या मूर्तीच्या डोक्‍यावर खिळा ठोकण्यात आला. त्यामुळे मूर्तीची वाढ थांबली. परंतु याला कोणताही पुरावा नाही.”

ते पुढे सांगतात, “यासोबतच दुसरी आख्यायिका सांगितली जाते ती औरंगजेब नगरमध्ये आला असताना त्याने या गणेशाची अवहेलना केली होती. याचा त्याला त्रास झाला यानंतर त्याने मंदिराच्या दिवाबत्तीची व्यवस्था केल्याचे काही इतिहासकारांचे म्हणणे आहे.”  

नवसाला पावणारा बाप्पा म्हणून विशाल गणपती प्रसिद्ध आहे. नवस बोलणाऱ्यांची आणि तो पूर्ण झाल्यानंतर फेडणाऱ्यांची या मंदिरात दररोज दर्शनासाठी मोठी गर्दी असते. याठिकाणचे जुणे लोक सांगतात की अनेक मुस्लिमही श्री विशाल गणेशाचे भक्त आहेत. अगदी निवडणुक प्रचाराचा शुभारंभ असो किंवा लग्नकार्य अहमदनगर शहरातील कोणत्याही शुभ कामाची सुरूवात श्री विशाल गणेशापासूनच होते. कित्तेक वर्षांची ही परंपरा आजही स्थानिक जपत आहेत. 
 
 

गणेश पूजेची परंपरा  
देवाची पूजाअर्चा हा भाविकांच्या अस्मितेचा विषय असतो. साधारणतः दिवा लावून, लाडू, मोदकाचा प्रसाद दाखवून गणपतीची पूजा केली जाते. श्री विशाल गणेशाचे पुजारी हे नाथपंथीय असून सुरवातीपासूनच नाथपंथीय पूजाऱ्यांकडून गणेशाची पूजा केली जाते. 
या परंपरेविषयी माहिती देताना अभय आगरकर म्हणतात, “शेकडो वर्षांपासून याठिकाणी गणेश मूर्ती अस्तित्वात असल्याचे म्हटले असले तरी एका नाथपंथीय सत्पुरूषाने या मंदिराची स्थापना केली होती. त्या नाथपंथीयाची आई ही गणेश भक्त होती म्हणून त्यांनी हे मंदिर स्थापन केले. त्यांची संजीवन समाधी मंदिराच्या गाभाऱ्याच्या पाठीमागे पाहायला मिळते. मंदिरात पूजेपासून सर्वच धार्मिक विधी हे नाथपंथीयांप्रमाणेच होतात. येथे नगाऱ्यासह केली जाणारी गणेशाची आरती मंत्रमुग्ध करणारी असते.गेंडानाथ महाराज यांचे शिष्य संगमनाथ महाराज सध्या पुजारी म्हणून काम करत आहेत.”  
 
 

मुस्लिम कारागीर करत आहेत मंदिराचा जीर्णोध्दार
अभय आगरकर यांच्या वडीलधाऱ्यांनी विशाल गणपती ट्रस्टची स्थापना १९५३ मध्ये केल्याचे ते सांगतात. यानंतर अनेक लोकांनी या ट्रस्टचे अध्यक्ष म्हणून काम केले. आगरकर कुटुंबियांची तिसरी पिढी  म्हणजेच अभय आगरकर सध्या या ट्रस्टचे प्रमुख आहेत. गेल्या १८ वर्षांपासून या गणेश मंदिराच्या नूतनीकरणाचे काम खालिद शेख हे मुस्लिम कारागीर करत आहेत. 

मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम खालिद शेख यांना कसे देण्यात आले असे विचारले असता ते सांगतात, “खालिद भाई यांनी यापूर्वी अनेक मंदिरांची उभारणी केली आहे. या गणेश मंदिराचे काम देखिल त्यांच्या नेतृत्वात होत आहे ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. आमच्या वडिलांची आणि बिर्ला मंदिर ट्रस्टच्या काही अधिकाऱ्यांची ओळख होती. त्यावेळी त्या अधिकाऱ्यांनी वडिलांना खालिद भाई यांचे नाव सुचवले. नंतर मग आम्ही खालिद भाई यांना काम सोपवले.”   
      
 
गणेश मंदिराच्या उभारणीसाठी खालिद शेख जीव तोडून मेहनत घेत असून आहोरात्र काम करत आहेत. अभय आगरकर खालिद भाई यांच्या कामाची वैशिष्ट्ये सांगताना म्हणतात, “खालिद भाई फार मोठे कलाकार आहेत. आपण त्यांना ज्या पद्धतीच्या डिझाईन देऊ ते त्याच पद्धतीने काम करतात. मंदिराच्या ऐतिहासिक संस्कृतीपासून ते नाक्षीकामापर्यंत सर्व माहिती खालिद भाईंना असते. आपण त्यांना दिलेल्या सर्व डिझाईन ते अगदी हुबेहूब साकारतात.”  

पुढे ते म्हणतात, “श्री विशाल गणेश देवस्थानला दानपेटी शिवाय उत्पन्नाचे दुसरे साधन नाही. भाविकांनी दिलेल्या देणगितूनच मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम सुरू आहेत. बऱ्याचदा असे होते की आमच्याकडचे पैसे संपतात. परंतु खालिद भाई कधीही त्यांचे काम थांबवत नाहीत. खालिद भाई आणि त्यांचे सहकारी अत्यंत कष्टाळू आणि प्रामाणिक असून गेल्या अनेक वर्षांपासून ते गणेश मंदिरासाठी सेवा देत आहेत.” 

मुस्लिम धर्मीयाकडून काम करून घेत असताना त्या मागच्या भावनांबद्दल अभय आगरकर सांगतात, “आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपण आठवला पाहिजे. आपला इतिहास आपल्याला सौहार्द जपण्यासाठी सांगतो. हिंदू मुस्लिम अस काही नाही.  देशभक्तीशी नाळ जोडलेले आणि भारत मातेशी इमान असणारे सर्व धर्मीय आपलेच आहेत.”

मंदिराचा जीर्णोध्दार करणारे खालिद भाई 
देशभरातील विविध प्रसिद्ध मंदिरांना आपल्या कलेतून साकारणारे खालिद शेख गेल्या अनेक वर्षांपासून कारागीर म्हणून काम करतात. कोणताही जात धर्म न पाहता देवांच्या घरांमध्ये कलेच्यारूपाने सौंदर्य भरण्यात ते समाधान मानतात. कलेला कोणताही जात धर्म नसतो हेच त्यांनी उभारलेल्या मंदिरातून दिसते.   
  
 
विशाल गणपती मंदिराचे काम करण्यामागच्या भावना विचारले असता कारागीर खालिद शेख म्हणतात, "जयपुरमध्ये मी बिर्ला मंदिराचे काम करत होतो त्यावेळी विशाल गणपती ट्रस्टचे पदाधिकारी माझ्याकडे आले होते. यावेळी त्यांनी अहमदनगर मध्ये गणपती मंदिराचे काम करायचे आहे आणि तुम्ही याल का असे विचारले. यानंतर मी नगर मध्ये येऊन मंदिराचे काय काम करायचे आहे, ते कशा पद्धतीने करायला हवे ते पाहिले. कामासंदर्भात पूर्ण चर्चा झाल्यानंतर मी मंदिराच्या कामासाठी होकार दिला आणि अहमदनगरमध्ये येत कामाला सुरुवात केली."

पुढे ते म्हणतात "अशा मोठमोठ्या मंदिरांचे काम करण्यासाठी सातत्य महत्त्वाचं असते. हे सातत्य टिकून राहण्यासाठी कामाच्या ठिकाणी कौटुंबिक वातावरण निर्माण होणे महत्त्वाचे आहे. गेले कित्येक वर्षापासून सुरू असलेल्या कामात हिंदू बांधवांनी आम्हाला कोणतीही अडचण येऊ न देता मोठी मदत केली. या ठिकाणी कौटुंबिक वातावरण निर्माण केले. केवळ हिंदू बांधवांच्या आणि ट्रस्टच्या कार्यकर्त्यांच्या प्रेमामुळे आम्ही या ठिकाणी काम करू शकलो. विशाल गणपती मंदिराचे काम करत असताना हिंदू बांधवांनी दिलेले प्रेम आणि सहयोग पाहून मला आनंद होतो." 

हिंदू मुस्लिम असं काही नसतं.....
हिंदू मुस्लिम बांधवांचे सामाजिक सौहार्द आताचे नसून ते पूर्वीपासूनचे आहे. विविध सणसमारंभात ते विशेष पाहायला मिळेत. हिंदु मुस्लीम बांधवांच्या एकोप्या विषयी बोलताना खालिद भाई म्हणतात, "समाजातील काही घटकांमुळे दोन्ही समाजांमध्ये कटूता निर्माण होत आहे. हिंदू आणि मुस्लिम असं काही नसतं. हिंदू मुस्लिम यांच्यात खूप प्रेम आहे. आपण सर्वजण माणसेच आहोत. इतक्या वर्षात काम करत असताना मला कधीही जाणवले नाही की मी मुस्लिम आहे ते हिंदू आहेत." 

कलेला जात धर्म नसतो....
आपल्या कामाबद्दल सांगताना खालिद भाई सांगतात, " 'कारागीर की कला का कोई जात धरम नही होता, कला हाच एक धर्म आहे'. मंदिर, मस्जिद हे ईश्वराचे घर आहे हीच भावना ठेवून आम्ही काम करतो. काम करत असताना कशाप्रकारे हे मंदिराच्या नक्षीकामांमध्ये सौंदर्य भरता येईल हेच मी पाहतो."
 

विशाल गणपती जरी अहमदनगरचे ग्रामदैवत असला तरी तो महाराष्ट्रातील भाविकांचे श्रद्धास्थान बनला आहे. गणेश चतुर्थी आणि गणेशोत्सवात असणारी गणेश भक्तांची रिघ याची साक्ष देते. खालिद शेख यांच्या कलेतून उभारत असलेले हे भव्य मंदिर त्यांनी उभारलेल्या अन्य मंदिरांप्रमानेच उत्कृष्ठ असणार यात शंका नाही.

- फजल पठाण 


'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter