समाजाला समतेची वाट दाखवणाऱ्या वारकरी संप्रदायाचा एक धागा आहे, सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरमध्ये. येथील संभुआप्पा आणि बुवाफन दर्गा हे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान गेली साडेतीनशे वर्षे एकोप्याचा विचार पुढे नेत आहे. इथं दर्शनाला येणारा प्रत्येक भाविक श्रद्धेनं या दोन्हीही संतांचे दर्शन घेतो. फक्त एकाचंच दर्शन घेतलं तर ते दर्शन अधुरं राहिल्याचं मानलं जातं.
इस्लामपूर हे ९० हजारांच्या घरात लोकसंख्या असलेलं निमशहरी गाव. त्याच्या शेजारी पूर्वी उरुण गाव होतं. या दोन्ही गावांच्या मधोमध उरुणावती देवीचं मंदिर होतं. कालांतरानं ही दोन्ही गावं जोडली जाऊन उरुण-इस्लामपूर हे एकच गाव झालं. साडेतीनशे वर्षांपूर्वी या एकतेचं बीज रोवलं गेलं ते श्री संभुआप्पा-बुवाफन उरसातून.
माझ्या वाळवा गावापासून इस्लामपूर १४ किलोमीटरवर. संभुआप्पा-बुवाफन हे संत त्यांच्या प्रसिद्ध उरसामुळेच सर्वांना, विशेषतः तरुणांना माहिती. तसंच मलाही. कारण या उरसात महाराष्ट्र, कर्नाटक, गोव्यातून भाविक येतात.
'सलोख्याची वारी'च्या निमित्तानं या संतांच्या, त्यांच्या स्थळाच्या मागचा सामाजिक इतिहास, आशय समजून घेण्यास सुरवात केली तेव्हा पहिल्यांदा भेटले इस्लामपूर हायस्कूलमध्ये मुख्याध्यापक असलेले अनिल खटावकर. ते म्हणाले, "सुमारे साडेतीनशे वर्षांपूर्वी, ज्या काळात समाजात अस्पृश्यता बोकाळली होती, हिंदू-मुस्लिमांमध्ये द्वेषाची बीजे पेरली जात होती, अशा काळात संभुआप्पा येथे वास्तव्यास आले.
संभुआप्पा यांनी त्यांच्याही आधी ३०० वर्षे होऊन गेलेल्या बुवाफन यांना गुरू मानलं. कारण त्यांना तसा दृष्टांत मिळाला. कोल्हापूरला जाताना वाटेत ते इस्लामपुरात थांबले ते कायमचे इथलेच झाले. हातमागावर कापड विणून ते विकण्याचा त्यांचा व्यवसाय होता. संभुआप्पा आणि बुवाफन यांचं नातं गुरु-शिष्याचं. संभुआप्पा हे लिंगायत कोष्टी समाजातील सत्पुरुष, तर बुवाफन हे संभुआप्पांचे गुरू मुस्लिम समाजातील.
वारकरी संप्रदायानं अठरा पगड जाती-जमातींना एका पंक्तीत आणलं. संभुआप्पा-बुवाफन जोडीनंही तेच कार्य केलं. ही जोडी कबीर- कमाल या गुरुशिष्य जोडीचा अवतार मानली जाते. महाराष्ट्रातील संतांच्या भेटीसाठी संत कबीर काशीहून म्हणजे उत्तर भारतातून पंढरपुरात आले. महाराष्ट्राशी त्यांचे भावबंध जुळले. कबिरांचा मुलगा कमाल यांची समाधीही पंढरपुरात आहे आणि पंढरपूरचे नाते इस्लामपूरशी आहे. बुवा म्हणजे साधू आणि फन म्हणजे फकीर.
मानवता धर्माची स्थापना हेच त्यांचे कार्य असते. दोघेही मूळ मालगाव (ता. मिरज) येथील. खरं तर संत महात्म्यांना जात-धर्म नसतो. असतो तो एकच मानवताधर्म. याच धर्माचं पालन उरुण इस्लामपूरचे नागरिक गेली साडेतीनशे वर्षे गुण्यागोविंदानं करीत आहेत. बंधुभाव जपणाऱ्या अनेक प्रथा-परंपराही त्यांनी टिकवल्या आहेत. या शहरात आजतागायत जातीय आपत्ती नाही की, दंगल नाही. तेही केवळ या हिंदू-मुस्लिम एकोप्यामुळंच."
पंढरपूरनंतर पांडुरंगाचं वास्तव्य इस्लामपुरात असतं, अशी इथली श्रद्धा. त्याचा धागा स्पष्ट करताना खटावकर म्हणाले, "वैराग्य धारण केलेले संभुआप्पा वाळवा किल्ले तालुक्यातील मच्छिंद्रगडावरील मच्छिंद्रनाथांचं दर्शन घेऊन कोल्हापूरकडे जात असताना वाटेतल्या इस्लामपूरमध्ये थांबले. इथं भेटलेल्या खेलजी पाटील यांच्या मदतीनं संभुआप्पांनी खऱ्या अर्थानं इस्लामपूरचं पंढरपूर केलं. हळूहळू लोक त्यांना येऊन भेटू लागले. त्यात सर्वसामान्य भाविक असत. संभुआप्पा त्यांना मानवतेचे विचार सांगत.
एकदा संभुआप्पांकडं आलेल्या काही लोकांनी गावातले, शेजारपाजारचे लोक पंढरपूरला गेले, पण आम्हाला परिस्थितीमुळं जाता आलं नाही, अशी खंत व्यक्त केली. संभुआप्पा तत्काळ उठले आणि त्या लोकांना जवळच्या भांडारमाळावर घेऊन गेले. तिथं सर्वांना भावसमाधी लागली. त्या अवस्थेतच त्यांना चंद्रभागा स्नान आणि श्री विठ्ठलाचं दर्शन झाल्याची अनुभूती आली. शेजारपाजारचे पंढरपूरला गेलेले लोकही त्यांना त्या अवस्थेत भेटले. हा अनुभव त्यांनी एकमेकांना सांगितला. ही आख्यायिका अजूनही इस्लामपुरात प्रसिद्ध आहे.
पंढरपूरमधील श्री विठ्ठलाचं दर्शन काही मोजक्याच लोकांना आपण घडवलं. ते सर्वांना घडवायला पाहिजे, या विचारातून त्यांनी पंढरपूरनंतरचा सर्वांत मोठा गोपाळकाला इस्लामपुरात सुरू केला. तो उत्सव अजूनही मोठ्या उत्साहानं साजरा होतो. गोपाळकाल्याच्या उत्सवाला वारकऱ्यांमध्ये मोठं महत्त्व आहे. सप्ताह किंवा धार्मिक सोहळ्यानंतर गोपाळकाला होतो. ही कल्पना मूळची श्रीकृष्णाची. कुठलाही भेदाभेद न पाळता सर्व जातीधर्मांच्या सवंगड्यांना एकत्र घेऊन श्रीकृष्ण यमुनेच्या काठावर एकत्रित भोजन करत. परस्परांमधील बंधुभाव दृढ व्हावा, हा त्यामागचा उद्देश.
वारकरी आषाढी वारीला जातात तेव्हा वारीच्या शेवटच्या कार्यक्रमात अर्थात गोपाळकाल्यात सहभागी झाल्याशिवाय माघारी येत नाहीत. गोपाळकाल्यात ते एकमेकांना लाह्यांचा प्रसाद भरवितात. हीच परस्परप्रेमाची गोपाळकाल्याची प्रथा मोठ्या दूरदृष्टीनं संभुआप्पांनी इथं सुरू केली.
आषाढी पौर्णिमा, ज्याला आपण गुरुपौर्णिमा किंवा व्यास पौर्णिमा म्हणतो, त्या दिवशी गावातील विविध समाजांच्या दिंड्या भजन करत एकत्र येतात. भांडारमाळात गुरूंचे दर्शन घेतात. सर्व दिंड्या मिळून झालेली मोठी दिंडी उरुण भागाला प्रदक्षिणा घालते. मग त्या ठिकाणी दहीहंडी म्हणजेच वारकरी परंपरेतील एकोप्याचे प्रतीक असणारा गोपाळकाला होतो. आपण पंढरपूरच्या दिंडीतच सहभागी झाल्याचा आनंद प्रत्येक जण अनुभवतो. यातील विशेष असं की, संभुआप्पांनी सर्व जातीधर्माचे लोक दिंडीच्या रूपानं एकत्र आणले. यातून त्यांनी माणुसकी जोपासण्याचा संदेश दिला.
उरसाच्या वेळी जो मंडप चढवला जातो, यात बाराही बलुतेदारांना सन्मान दिलेला आहे. हेही चंद्रभागेच्या वाळवंटात जमणाऱ्या वैष्णवांच्या मेळाव्याप्रमाणंच. जुन्या काळातील भेदीक परंपरा इथं आजही जपण्याचा प्रयत्न केला जातो. मठामध्ये ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन केले जाते. बहुजनांच्या संस्कृतीशी एकजीव झालेली ही एकजिनसी अशी परंपरा आहे."
इथला उरूस हा पश्चिम महाराष्ट्रातील सर्वांत मोठा उरूस मानला जातो. पंधरा ते वीस दिवस चालणारा हा उरूस विशेषत्वाने बैल बाजारासाठी प्रसिद्ध आहे. यात्रा काळात कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते.
संभुआप्पा-बुवाफन मठाचे मुख्य प्रवेशद्वार
या उरसाविषयी मठाचे अकरावे मठाधिपती मिलिंद मठकरी यांना विचारलं. ते म्हणाले, "कार्तिक पौर्णिमा हा श्री संभुआप्पांचा जन्मदिवस मानला जातो. पौष मास वद्य नवमी शके १६६२ रोजी संभुआप्पांनी जिवंत समाधी घेतल्यानंतर त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी इरुबाई आणि पुत्र श्री बाबुआप्पा यांनी मठाचा कार्यभार पाहण्यास सुरवात केली. त्यांच्या काळापासूनच उरूस भरविण्याची प्रथा सुरू झाली.
कार्तिक शुद्ध दशमीस पाच चांदण्या (भाग) असणारा नक्षीदार कापडी मंडप उभारून आणि गूळ (सध्या साखर) वाटून उरसाला सुरवात करण्याची प्रथा आजही जोपासली जाते. या वेळी सर्व जातीधर्मांचे लोक एकत्र येतात. सर्व जण सन्मानपूर्वक आपली परंपरागत सेवा बजावतात. एकदिलाने मंडप चढवून आनंदोत्सव साजरा करतात. मंडप उभारणीसाठी वापरले जाणारे मोठे लाकडी खांब म्हणजे विविध जातीधर्मांचे प्रतीकच. या वेळेपासून पौर्णिमेपर्यंत मंडपाखालचे रोजे (उपवास) करण्याची प्रथा आजही भाविक मोठ्या श्रद्धेने जपत आहेत. याच दिवशी सायंकाळी मठातील मानाचे समजले जाणारे महंत 'फकीर' होतात. तसेच मठाधिपती परिवारातील कुटुंबीयांना 'फकीर' केले जाते.
पुढे कार्तिक पौर्णिमेपर्यंतचे सलग तीन दिवस लोक श्रद्धेने फकीर होतात. या वेळी त्यांच्या गळ्यात निळ्या रंगाची कफनी आणि हातात गुलाबी दोरा (अटी) बांधला जातो. प्रसाद म्हणून मातीच्या कुंड्यातून भात आणि आवळ्याचे लोणचे दिले जाते. भात शिजविण्याचा मान माळी समाजाला असतो. मठातील विविध धार्मिक विधींचा मान वेगवेगळ्या समाजाला आहे. कार्तिक पौर्णिमेला शहरात सर्व घरांमध्ये किमान पाच फकीर संभुआप्पाचे रूप समजून पुजले जातात. दक्षिणा दिली जाते.
खटावकर म्हणाले, "संभुआप्पा उरूस हा सर्वसामान्यांचा उत्सव आहे. कार्तिक वद्य प्रतिपदेस मानाचा पहिला गलफ (वस्त्र) शासनाच्या वतीने उरुणातील पोलिसपाटील घालतात. तुलसी विवाहादिवशी श्री संभुआप्पा आणि बुवाफन यांच्या दोन्ही घुमटांना एकत्रित जोडणारे वस्त्र (ध्वज) बांधण्याची प्रथा आहे. यात्राकाळात गलफ घालणे, दंडस्नान घालणे, पाच नारळांचे तोरण बांधणे, फकीर पुजणे, मलिदा, पेढे वाटणे याद्वारे यथाशक्ती भक्ती अथवा नवसफेड केली जाते."
फकीर करणे किंवा फकीर होणे ही मोठी सन्मानाची बाब असते. याबाबत मठकरी म्हणाले, "उरसावेळी मंडप चढलेल्या दिवशी सायंकाळी 'फकीर' करण्याचा कार्यक्रम असतो. डोंगरे आणि वायचळ तसेच मठकरी यांच्या घराण्यातील लोकांना फकीर केले जाते. तीन दिवस नवसाचे फकीर करणे सुरू असते. फकीर होण्यासाठी महाराष्ट्र, कर्नाटकातून लोक येतात. विविध धार्मिक विधींमध्ये माळी, शिंगाडे (चौधरी), पाटील, पवार, चांभार, शिंपी, हरिजन यांना विशिष्ट असा मान आहे. संदल (गंधरात्र) हा अत्यंत महत्त्वाचा विधी आहे. वर्षातून चार वेळा संदल होते. कार्तिक पौर्णिमेच्या आदल्या दिवशी, पौष वद्य नवमी (संभुआप्पा समाधी दिन), अनंत चतुर्दशी (श्री संभुआप्पा उरुणात प्रथम आले तो दिवस), माघ वद्य एकादशी. प्रत्येक गंधरात्रीनंतर दुसऱ्या दिवशी पाकाळणी (समाधी स्थाने आणि परिसर स्वच्छ धुणे) होते. महंत, फकीर, मानकरी उपस्थित असतात. महाशिवरात्रीच्या आदल्या दिवशी मानकरी, ग्रामस्थांना भोजन दिले जाते."
वळू होणे अर्थात मठामध्ये आठवडाभर स्वयंसेवक होऊन राहणे आणि फकीर होणे सन्मानाचे मानले जाते. ज्यांची इच्छा अथवा नवस पूर्ण झालाय असे लोक पाच दिवस घरी न येता सेवेत वाहून घेतात आणि फकीर होणारे नंतरचे काही दिवस साधूवृत्ती अंगिकारून कार्यरत राहण्याचा संदेश देतात. फकीर करणे, दिवा लावणे, उदी फिरवणे असा मान असलेले श्याम खुळे हे गेली ६० वर्ष पुण्यात स्थायिक आहेत. शासकीय सेवेत आहेत. वर्षानुवर्षे चालत आलेल्या परंपरेचे पाईक आहेत.
श्याम खुळे म्हणाले, "पिढीजात चालत आलेली बांधिलकी जपणे आणि सेवेची संधी म्हणून आम्ही हा मान जपतो. फकीर होण्याचा पहिला मान वायचळ कुटुंबीयांकडे आहे. तेही गेली ४० वर्ष कोल्हापुरात राजारामपुरीत राहतात; पण या मठाने त्यांना इस्लामपूरच्या संस्कृतीशी नेहमी जोडून ठेवले आहे. मूळपुरुष मुंजाप्पा वायचळ यांच्यापासून गेल्या दहा पिढ्या ही परंपरा जपण्याचे काम करत आहेत. यामुळे आपणाला मोठे करणाऱ्या पांढरीशी आपण इमान राखतो, अशी भावना निर्माण होते."
प्रार्थनेतून मानवकल्याणाचा संदेश देणाऱ्या 'फात्या देणे' या विधीचा मान गेली अनेक वर्षं मुबारक मुल्ला आणि बाबू कासम खाटिक यांना आहे. वंशपरंपरेने आलेल्या या मानाबद्दलची कृतज्ञता व्यक्त करताना खाटिक म्हणाले, "हिंदू-मुस्लिम एकोप्याचा संदेश टिकविणाऱ्या या परंपरेत सहभागी होण्याची संधी आम्हाला मिळाली. आमच्या आयुष्याचे सार्थक झाले."
पोलिस पाटील असलेले बाळासाहेब पाटील यांना त्यांच्या घराण्याचं या मठाशी असलेलं नातं विचारलं, तेव्हा ते इतिहासात हरवले. ते म्हणाले, "गलेफचा पहिला मान पोलिसपाटलांना असतो. आमचे पूर्वज खेलजी पाटील संभुआप्पांचे मित्र होते. त्यांची समाधी आजही आहे. खेलजी पाटील मोठे जमीनदार होते. त्यांनी त्या काळी १०० एकर जमीन मठाला दिली. वतनदार म्हणून आणि पोलिसपाटील म्हणून आजही आम्हाला मान दिला जातो. सर्व मतभेद, भांडणतंटे विसरून सारा समाज एकत्र येतो. दसऱ्याला मोठा उत्सव असतो. या श्रद्धा समाजाला एकत्र बांधतात. इस्लामपुरात संभुआप्पांसह राजेबागेस्वार आणि मेहबूबसाब ही ठिकाणे हिंदू-मुस्लिम एकोप्याचीच उदाहरणे समाजाला एकोप्याच्या वाटेने जाण्यासाठी प्रवृत्त करतात."
संभुआप्पांबद्दल अनेक आख्यायिका आहेत. संभुआप्पा फक्त इस्लामपुरातच प्रसिद्ध आहेत असं नाही. त्यांची अन्यत्रही स्थानं आहेत. त्यामध्ये मालगाव (ता. मिरज), शिरोळ, इचलकरंजी, पेठवडगाव, काले तसेच बावासफा आणि संभुआप्पा (ता. कऱ्हाड), बेळगाव, कवलापूर यांचा समावेश होतो. त्यांच्या सलोख्याच्या विचारांचा प्रभाव या भागांवर आहे. सांगली, सातारा, कोल्हापूर तसेच कर्नाटकातील लाखो भक्तगण आणि दूर असणारे उरुण- इस्लामपूरवासीय आवर्जून उरसाला येतात, फकीर होतात, तोरण बांधतात आणि 'संभुआप्पा-बुवाफन की दस्तूर धीन...' असा गजर करतात.
मठ परिसराचा विकास झाला पाहिजे, असं अनेकांना वाटतं. त्यापैकी एक असलेले सामाजिक कार्यकर्ते गजानन पाटील. ते म्हणाले "इस्लामपूर शहर वसण्याच्या आधीचा हा मठ आहे. हा वारसा जपला, टिकवला पाहिजे. येणाऱ्या भक्तांसाठी निवासाची व्यवस्था होणे अपेक्षित आहे. जुन्या विहिरीच्या जीर्णोद्धाराची गरज आहे. नगरपालिकेने विशेष निधी देऊन २४ तास पाण्याची सुविधा, सभामंडप आणि महत्त्वाच्या वास्तूंची डागडुजीही केली पाहिजे.”